Literature

वैशाख शुद्ध त्रयोदशी

देव आहे काय ? हा प्रश्न मुळांतच विचित्र व हा प्रश्न करणारेही पुष्कळच ! सत्यत्वानें बाह्यदृष्टीकडे पहाणारे व विचारी असून संशयात्मकदृष्टीनें विचार करणारे असेच हे लोक असूं शकतात.

या सर्वांच्या दृष्टीनें ‘ देव कुठला नि धर्म कुठला ? ‘ स्वर्ग नरक या सर्व कल्पनाच होत ; जे दिसतें त्याचा अनुभव घेणें हेंच आपलें काम. डोळ्यांनी न दिसणा-या अशा वस्तूंबद्दल कांहीतरी विचार मनात बाळगून प्रत्यक्ष दिसणारें सुख त्यागणे किंवा विसरणे कसें शक्य आहे ! ‘ असेही प्रश्न उद्भवतात. साधारणत: दुर्मार्ग प्रवृत्त असणारेच वरील नास्तिक विचार बाळगतात. कारण देवधर्माची कल्पना केल्यास त्यांच्या स्वेच्छाचारी प्रवृत्तीस अडथळा येईल.

या समोरच्या जनसमुदायांत आस्तिक जास्त असून कांही नास्तिकही असतील ! असोत बिचारे ! परमेश्वर आहेच असा निश्चय करून वागणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये या प्रश्नानें जिज्ञासा उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि स्वामीकडून या प्रश्नाचे काय उत्तर दिलें जातें, याबद्दल कुतुहल वाटणें साहजिक आहे. पण नास्तिकांना मात्र आपले विचार स्वामी कसे मांडतात, याबाबत अनादर असणेही शक्य आहे. एकंदरित आस्तिक व नास्तिक यांच्यापुढे या प्रश्नाचा विचार होणे अवश्य असून त्याची योग्यप्रकारे शहानिशा होणे दोघांच्याही दृष्टीने लाभप्रद व हितकर होय.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img