जगाबद्दलची वासनाच ' प्रवृत्ती ' व ती वासना नाहीशी करणेच ' निवृत्ती ' होय. जगाच्या विभिन्न कल्पना नष्ट
करून एकात्मदृष्टीने नितीपथाने पाऊले टाकणे हेच अमरप्रभा-प्राप्तीचे साधन होय. गृहस्थाश्रमात विधीयुक्त
साधनांद्वारे विषयवासनांचा उपयुक्त असाच उपभोग घेतल्यावर त्यांना नाहीशा करून ज्ञानवैराग्यपुर्वक
परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हेच परंपरागत प्रवृत्तीमार्गाचे लक्षण आहे. प्रवृत्तीमार्गाचे ध्येय निवृत्तीमार्गाची
प्राप्ती हे असून निवृत्तीमार्गाचे ध्येय किंवा अमरप्रभेची प्राप्ती म्हटले जाते.
अविनाशी अशी एकच वस्तु असून ती म्हणजे आत्मस्वरूप. जे उत्पन्न होते ते अविनाशी नसते.
आत्मस्वरूपाशिवाय इतर पदार्थ रूपात्मक आहेत व रूप हे उत्पत्तिशील आहे यालाच ' दृश्य ' किंवा ' रूप '
म्हणतात हे आकृतीविशिष्ट असून जगद्रूपात ते दृग्गोचर होते. या जगास रूप असल्यानेच त्यास दृश्य
म्हणतात व म्हणूनच ते जन्य म्हणजे उत्पन्न होणारे आहे. हे जग कोणत्यातरी अजन्य वस्तुपासून उत्पन्न झाले
असून ती अजन्य अविनाशी वस्तूच अमरप्रभा होय.
जी व्यक्ती अशा जन्ममरणरहित अमर, अविनाशी वस्तूस न पहाता जागतिक सुखामध्ये विश्वास ठेवून
आत्मतत्त्वापासून अपरिचित रहाते ती व्यक्ती सर्व प्रकारे हीन, दीन, कृपणच म्हटली पाहिजे. अशा या
अविनाशी तत्त्वास ओळखून न घेता जो देह त्यागतो तो अतिमुर्खच म्हणावा लागेल.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*