Literature

श्रावण वद्य षष्ठी

संसारी मनुष्याला विशेष करून परमार्थाची जास्त आवश्यकता आहे व तो साधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न
करणे अगत्याचे आहे. ' भवरोग ' म्हणजेच संसाररूपी व्याधी नष्ट करण्यास एकमेव उपाय म्हणजेच ' सत्
संगति ' हे पहिले साधन आपणास समजल्यास त्याच्या अनुरोधाने संसाररूपी व्याधी नष्ट करण्याचे प्रथम

साधन म्हणजे ' सत् सहवासच. ' त्याखेरीज इतर कोणतेही साधन नाही. हा भवसागर तरून जाण्यासाठी योग्य
नाव म्हणजेच ' सत् संग. '

हा नरदेह दुर्लभ आहे, पशुप्रमाणे विषयसुखासाठी देहावर प्रेम करणे म्हणजे नरकमार्गाप्रत जाणेच.
यासाठी विषयसुखाच्या लालसेस्तव देहास महत्व देऊ नये. विषयसुखकामनेसाठी देहप्रीती ही पारमार्थिक
सुखाच्या दृष्टीने निषिध्द आहे म्हणून या देहाचा गौरव किंवा प्रेम निंद्य होय. मानवदेह विषयसुखाचे साधन
नव्हे. तो परमार्थासाठीच उत्पन्न झाला आहे म्हणून पारमार्थिक सुखाचे साधन म्हणूनच त्याचा उपयोग केला
पाहिजे. विषय तर सर्वत्र आहेच. त्यासाठी नरदेहाचीच आवश्यकता आहे असे नाही. अशन, पिपासा इत्यादी
पशुंनाही आहेतच. परंतु गुरूकृपेच्या आधाराने भगवंताची कृपा संपादून या संसारजालातून मुक्त होणे हेच
नरदेहाचे वैशिष्ठ्य आहे. ' हा देह संसारसमुद्र पार करणारी सुंदर अशी नाव आहे व ती नाव चालविणारे
नावाडी सद्गुरूच होत. ' असे श्रीमद्भागवतामध्ये म्हटले आहे. ही नाव योग्य रितीने परतीरास नेण्याकरतां
सद्गुरूची कृपा अत्यावश्यक आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img