अमरप्रभा म्हणजे नाशरहित प्रकाश. मग अमर प्रकाश कोणता ? हा प्रश्न पुढे येतो. तो सुर्यप्रकाश असू
शकत नाही. कारण सुर्यप्रकाशास उदय व अस्त आहे. सुर्यप्रकाश सर्व जगतास प्रकाशीत करीत असला तरी
तो शाश्वत नाही. हीच स्थिती चंद्रप्रकाशाची. हे दोन्ही प्रकाश डोळे उघडे ठेवल्याने दिसतात पण डोळे बंद केले
तर दिसत नाहीत. डोळे उघडले किंवा बंद केले तरी ही मनासह सर्व इंद्रियांना प्रकाश देणारा निर्विकार,
उदयास्तरहित असा ज्ञानप्रकाश होय. त्या प्रकाशालाच अमर प्रकाश किंवा अमरप्रभा म्हटलें जाते. सुर्य, चंद्र,
अग्नि यांचा प्रकाश कितीही विशाल असला तरी तो सर्व ठिकाणी एकसारखा अनुभूत होत नाही. या
प्रकाशासमोर आपण आपले डोळे मिटून घेऊ शकतो. परंतु अमरप्रभेमुळे मिटवूं शकत नाही. यावरून सुर्य,
चंद्र, अग्नि यांच्या प्रकाशापेक्षा निराळा शाश्वत असा प्रकाश आहे हे विचारांती सिध्द होते.
प्रपंचाचे बाह्य व अंतः असे दोन प्रकार आहेत. दृग्गोचर होणाऱ्या बाह्य, इंद्रियग्राह्य सर्व बाह्य वस्तु व
त्यांचे परिणाम हे बाह्य प्रपंचामध्ये मोडतात आणि मनांत उद्भवणारे सर्व विचार तरंग व त्यापासून
उद्भवणारे मानसिक परिणाम अंतरिक प्रपंच होय. या अंतर्बाह्य प्रपंचास प्रकाशित करणारा आत्मप्रकाश
होय आणि त्यालाच अमरप्रभा म्हणतात.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*