Literature

श्रावण शुद्ध दशमी

वर्णाश्रमधर्मानुसार वागण्याचा प्रयत्न करावा. जिवनावश्यक व्यवहार करून परमार्थासाठी झटावे. जीवंत
रहाण्यासाठीच आहार आहे पण आहाराकरतांच जगावयाचे नसते. आपले सर्व व्यवहार परमार्थाकरतांच
असून निव्वळ जगण्यासाठीच नाहीत. आपले जगणे निव्वळ व्यवहाराकरता नसून आत्मसुख, खरे सुख
प्राप्त करण्यासाठी आहे व ते मिळवावयाचे म्हणजे विषयसुखाचा त्याग आलाच. अनेक जन्माच्या
संस्कारामुळे ते एकदम जमणे शक्य नाही, तर क्रमाक्रमाने ते साध्य करता येईल. परमात्म्याच्या ठिकाणी
निस्सीम अकृत्रिम प्रेमरूप भक्ती केल्याने, कृच्छ्रचांद्रायणादी प्रायश्चित्ते घेतल्याने आणि विवेक-वैराग्याने
विषयसुखाचा त्याग करणे शक्य आहे. भावनेमूळे भासणारे विषयसुख ती भावना संपताच नष्ट होते.

परमात्म्याच्या दिव्य भावनेने विषयसुखभावनेचा नाश करून विषयसुखाचा त्याग करणे सुलभ आहे.
आता अत्यंत विषयासक्त असणाऱ्यास परमात्मसुखाची भावना उत्पन्न होणे शक्य आहे काय ? असा प्रश्न
पुढे येतो व तो अगदी साहजिकच आहे. अशांना परमात्मभावना उत्पन्न होणे कठीणच. कारण त्यांचे
अंतःकरण परवश झालेले असते. त्यांच्यासाठी श्रुतीनी निरनिराळ्या प्रार्थना सांगितल्या आहेत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img