Literature

श्रावण शुद्ध पौर्णिमा

स्वप्रकाशाने स्वतः नित्य प्रकाशित होणारी वस्तु ' आत्मा ' होय. या जगातील सर्व प्राणिमात्र
सुखप्राप्तीसाठी आपापल्या भावनेनुसार निरनिराळे प्रयत्न करीत असतात. परंतु परिणामी त्यांना कष्टच
प्राप्त होतात. ते या भ्रामक प्रपंचात सुख आहे असे समजून ते मिळवण्याच्या निमित्ताने अखेर सुख कोणते हे
विसरून दुःखच भोगत असतात. अंतदृष्टीने न पाहता केवळ बाह्य दृष्टीने कार्य करीत राहिल्यास यंत्राप्रमाणे
मानवासही कधीच अंतर्ज्ञान होणार नाही. इंद्रिये व मन यांचा प्रेरक व प्रकाशक शाश्वत असा एकमेव
आत्मप्रकाश कानाचा कान, मनांचे मन, वाणीची वाणी, प्राणाचा प्राण आणि नेत्राचा नेत्र असून त्याला
ओळखणारास अमृतत्त्व प्राप्त होते असे श्रुतिवचन आहे.

उत्पत्ति व नाश असणाऱ्या वस्तुंना अविनाशी म्हणता येणार नाही. गुणधर्म आणि आकारविकाररहीत
उत्पत्तिविनाशशुन्य असा आनंदमात्र स्वयंप्रकाशयुक्त आत्माच अमरप्रभा होय. परमात्म्याचा हा अमर प्रकाश
बाह्यदृष्टीने प्राप्त होत नाही. डोळे व दृष्टी ही त्यांचाच अंश असली तरी त्याच्या मुलाधाराचा पत्ता लावण्याचा
प्रयत्न करतांच ती त्यांतच एकरूप होतात. तेथे दृश्य, दृष्टी व द्रष्टा ही त्रिपुटी राहूच शकत नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img