Literature

श्रावण शुद्ध प्रतिपदा

मीपणाची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव घेत घेत
मीपणाची जाणीव शिल्लक राहिली म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला असे म्हटले जाते. दुःखाची
जाणीव न होता देहभावाचा अभाव होऊन कुठलिही चिंता न रहाता केवळ एक आनंदाचाच अनुभव
शिल्लक रहाणे म्हणजेच जीवनमुक्ती होय. यालाच कैवल्य किंवा मोक्ष असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची
शेवटची सिध्दी होय. हेच आत्मज्ञानाचे प्राप्त होणारे शेवटचे फळ होय. सिंधुमध्ये पडलेला बिंदु सिंधरूपच
होतो, त्याप्रमाणे सर्व विषयसुखजाणीवरूपी जीव अनंत सुखरूपी परमात्म्यांत एकरूप होऊन म्हणजेच
सायुज्यता प्राप्त करून आपले मूळस्वरूप प्राप्त करून घेतो त्यालाच मोक्ष म्हणतात. सुखासाठी संसारामध्ये
आलेला जीव सर्व विषयांची दुकाने हिंडून तेथे सुखप्राप्ती न झाल्याने शेवटी परमात्म्यावर निष्ठा ठेवून
त्याच्याच कृपेने श्रीसद्गुरूंच्या मुखाने आत्मज्ञानप्राप्ती करून, संसारसुखातून बाहेर पडून आपल्या
मूळस्वरूपांत म्हणजेच परमात्म्यात केवळसुख-आनंदरूपांत विलीन होतो म्हणजेच तो स्वतः केवळ आनंदच

होतो. यालाच मोक्ष म्हणतात. अज्ञानरूपी धुकें नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्व ठिकाणी परिपूर्ण असणे
यालाच मोक्ष म्हणतात. ज्यांच्यात कोणतेही दुःख नसून केवळ आनंदच असतो त्यासच मोक्ष म्हणतात.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img