Literature

श्रीगुरुमहिमा

श्रीगुरु सर्वापेक्षां श्रेष्ठ आहेत. सर्वापेक्षा जास्त शक्तिमान, सर्व शक्तींत मोठे, सामर्थ्यसंपन्नांमध्ये सामर्थ्यवान असणारांपेक्षांहि परमश्रेष्ठ असे श्रीगुरूच होत. श्रीगुरु हे सर्व देवतांपेक्षाहि श्रेष्ठ आहेत असेच म्हटले जाते. सर्वसारभूत तत्त्वज्ञान, सत्त्ववान, विशेष अशा विभूती, विशेष शक्तिशाली व्यक्ति अशांनाच आपण गुरु म्हणून संबाधीत असतो. सर्वापेक्षा श्रेष्ठत्व व सत्त्व असणें हेंच त्यांचे वैशिष्ट्य असते. ह्या दृष्टीने विचार केल्यास गुरु शब्दाचा अर्थ ‘सर्वापेक्षां श्रेष्ठ’ हाच आहे असें म्हटलें तरी चालेल. सर्वापेक्षा गुरु शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे असें ठरल्यानंतर श्रीगुरुमहिम्यावर प्रवचन करतांना सहजच ‘गौरवत्वात् गुरुः ।’ हे डोळ्यासमोर आपोआपच येते.

गुरू हे सर्वश्रेष्ठ म्हटल्यानंतर त्यांचीच आराधना मुख्य होय अशी कल्पना करून घेऊन प्रचलित देवदेवतांची आराधना सोडून द्यावयाची की काय ? असे कोणीहि विचारील म्हणून त्याचे निरसन आवश्यक आहे.

आदिनारायणापासून गुरूपरंपरा सुरू झाली. ‘नमो ब्रह्मादिभ्यो विद्यासम्प्रदायकर्तृभ्यो वंशऋषिभ्यो नमो महद्भयो नमो गुरुभ्यः । ब्रह्मादि सर्व देवता ब्रह्मविद्या संप्रदाय प्रवर्तक होत. ब्रह्मविद्या समजून घेणाऱ्या ऋषीमुनींना नमस्कार असो. कारण ते सर्व गुरुस्वरूपच होत. श्रीशंकराचार्य संप्रदायांतहि ‘नारायणं पद्मभवं वसिष्टं शक्तिं च तत्पुत्रपाराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकवार्तिकम् ।’ असा संप्रदाय लक्षात येतो. श्रीशंकर संप्रदायांतहि ‘नारायणश्च गुरुः ।’ असे म्हटले आहे. श्रीसमर्थ संप्रदायातहि ‘आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुम् ।’ असे म्हटले जाते. ह्या दृष्टीने विचार केल्यास आदिनारायणापासूनच गुरुपरंपरा निर्माण झाली हे सहजच लक्षांत येतें. देव, ऋषि, आचार्य हे सर्व गुरूपासून भिन्न नाहीत.

‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः गुरूः साक्षात्महेश्वरः ।’ गुरुरेव जगत्सर्वं तस्मै श्रीगुरवे नमः || ”

ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या त्रिमूर्ती गुरूच होत. आदिशक्ती ब्रह्मस्वरूपी होऊन तिलाही गुरुपद प्राप्त झाले आहे. ‘का त्वं ?’ अहं ब्रह्मस्वरूपिणी’ मी ब्रह्मस्वरूपिणी आहे असे म्हटले आहे. ‘त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमात्स्वं ब्रह्म भूर्भुवःस्वरोम् ।’ अशी गणपतीची प्रार्थना आहे. ह्यावरून सर्व देवता ब्रह्मस्वरूपी होत व म्हणूनच ह्या सर्व गुरु होत हे उघड होते. देहदृष्टीने विचार केल्यास मानवाच्या पूर्वी देवता निर्माण झाल्या. गुरूच्या हाती ज्याप्रमाणे मोक्ष आहे तद्वतू देवतांच्या हातात अभय देण्याचे शस्त्र आहे. दुष्टांचा संहार करून भक्तांचा मार्ग सुकर करण्यासाठीच देवतांनी शस्त्रें धारण केली आहेत. आपणांस ज्ञात होऊ शकणारी ब्रह्मविद्या श्रीगुरुपासूनच समजू शकते. असे असल्याने ह्या जगांत सर्वप्रथम ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा आदिनारायणस्वरूपी गुरूच होय. वैष्णव नारायण श्रेष्ठ मानतात. तर शेव शिवतत्त्व श्रेष्ठ, शाक्त जगदंबाच श्रेष्ठ, सौर सूर्यच श्रेष्ठ व गाणपत्य गणपतीच श्रेष्ठ आहे असे म्हणतात. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीने योग्यच आहे आणि ते सर्व श्रेष्ठ असल्याने ते गुरुस्वरूपीच होत. पूर्वीपासून देवतांची आराधना गुरु म्हणूनच करीत असल्याचे आढळून येते. आजहि त्याच गुरुरुप दृष्टीनें देवता आराधनेकडे पाहिले जाते.

गुरु म्हणजे कोणी लुंग्यासुंग्या नव्हे. ब्रह्मोपदेश म्हणजेच वस्तुस्थिती. जगाची यथार्थ कल्पना घेऊन आपल्या ब्रह्मस्वरूपाचे दिव्य ज्ञान देणारा जो कोणी आहे तोच सद्गुरु होय.

गुकारस्त्वंधकारस्यात् रुकारस्तद्विनाशकृत् अन्धःकारविनाशित्वात् गुरुरित्यभिधीयते ।”

गुकार हा अज्ञानरूपी अंधःकाररूप असून रुकार त्या अंधःकाराचा नाश करणारा असल्याने तेजोमय अग्निबीज आहे. अज्ञान नष्ट करून ज्ञानज्योतीचे ज्ञान देणारी महान् शक्ती म्हणजेच सद्गुरु होत. ही ज्ञानज्योत जेथे जेथे प्रकाशते ते सर्व सद्गुरूच होत.

विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मा व ब्रह्माच्या ललाटापासून रुद्र उत्पन्न झाला. ‘हिरण्यगर्भः समवर्तताग्रे ।’ ह्या क्रमाने ब्रह्मविद्येचा संप्रदाय सुरू झाला. अगदी सुरुवातीस ‘हिरण्यगर्भ’ उत्पन्न झाला व त्यापासून सृष्टी उत्पन्न झाली. त्याच वेळी हिरण्यगर्भात सर्वप्रथम मीपणाची जाणीव झाली. ‘बहु’ व्हावयास हवे म्हणूनच सुरवातीस मीपणाची स्फूर्ती झाली. ही स्फूर्ती व स्वसंवेदना ह्यांचे ज्ञान आपणास कोणत्या अवस्थेत हग्गोचर होते ? जागृती किंवा स्वप्नावस्थेतच की नाही ? ‘मी’ असे सर्वांकडून सांगितले जाते, त्यावेळी स्वसंवेदना असतेच. स्वप्नातसुद्धा मीपणाची स्फूर्ती असते. जागृती व स्वप्नावस्था ह्याखेरीज गाढ झोपेत असतांना ‘मी’ पणाची जाणीव उरत नाही. सद्गुरुकृपेने समाधिसुख लाभल्यास त्यावेळीहि मीपणाची जाणीव शिल्लक नसते. मीपणाची स्फूर्ती स्वप्नात भावनारूपाने व जागृतावस्थेत स्पष्टरूपाने दिसून येते. सुपृप्तीत मात्र ती अव्यक्त असते आणि समाधत तर विरघळूनच जाते. सर्वप्रथम हिरण्यगर्भात मीपणाचे स्फुरण झाले. त्यानंतर ‘बहु’ होण्यासाठी त्याने अनेक रूपे धारण केली. त्याचे बहुत्वरूप म्हणजेच विराटपुरुषाचे रूप होय असे म्हटले जाते. मीपणाचे स्फुरण झालेले हिरण्यगर्भाचे स्वरूप व्यक्त व अव्यक्त अशा दोन प्रकारचे आहे. म्हणजेच तो व्यक्तहि आहे व अव्यक्त तर आहेच आहे. ‘व्यक्ताऽव्यक्तवपुः ।’ मीपणाच्या जाणिवेस रूप नाही. ती जाणीव अव्यक्त असली तरी स्फुरणरूपानेच व्यक्त होत असते. यामुळेच मीपणाची जाणीवहि होते. हीच महतूतत्त्वाची जाणीव होय. म्हणून ह्या रूपास हिरण्यगर्भ असे संबोधून वेदामध्ये त्या संबंधात ‘भूतस्य जातः परितरेकऽआसीत् ।’ असे म्हटले आहे. गाढ झोपेत मीपणाची जाणीव असून नसल्यासारखीच असते. त्याचप्रमाणें ब्रह्मांडास कारण असलेले ‘अहं ब्रह्माऽस्मि ।’ ह्यामध्येहि व्यक्तरूप आढळून नाही. बुद्धि अगोचर आणि अनुभवजन्य आहे, तशीच स्वसंवेद्यहि आहे. अव्यक्त असलेले ज्ञानस्वरूप हिरण्यगर्भामुळेच मीपणाच्या जाणिवेने व्यक्त झाले आहे. ह्या मीपणाच्या स्फूर्तीमुळेच सर्व गुरुसंप्रदाय चालत आलेले आहेत. ब्रह्मा, विष्णु, महेश आदि सर्वाच्या मीपणाच्या जाणिवेस हिरण्यगर्भव कारणीभूत होय. म्हणजेच आदि नारायण हे ज्ञान तीन मुखांनी त्रिमूर्तिरूप झाले आहे.

अष्टदिक्पालहि ज्ञानीच आहेत. कठोपनिषदांत यमधर्माने नचिकेतास ज्ञानोपदेश केला आहे तर छांदोग्योपनिषदात ब्रह्मदेवाने इंद्रास ज्ञान दिले आहे. ह्यावरून हे सर्व गुरुच होत ह्याबद्दल शंका घेण्याचे कारणच रहात नाही. मानवांमध्येही असंख्य व्यक्तींनी आजपावेतो गुरुपदप्राप्ती केली असल्याचे आपणा सर्वांना माहीत आहे. आजपावेतो ज्या ज्या व्यक्ती गुरु होऊन गेल्या त्यांचे मूळकारण उपासना मार्गानें ज्ञानप्राप्ती करून घेणें हेच आहे. हे ज्ञान परमात्मकृपेशिवाय प्राप्त होत नाही. गुरु ह्या भावनेस किंवा ह्या पदास हिरण्यगर्भच मूळ कारण आहे. ‘यो ब्रह्माणं विदधाति पूर्व यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै ।

तं ह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षूर्वे शरणमहं प्रपद्ये । (श्वेता उ.) ह्यामध्ये हिरण्यगर्भास नमस्कार केला आहे. हिरण्यगर्भाचे स्वरूप हणजेच विष्णु. हिरण्यगर्भाचा अवतार म्हणजेच विष्णुरूप. ईश्वररूप म्हणजेच रुद्र. सृष्टीच्या उत्पत्तीपासून ज्याने वेदांचे ज्ञान दिले त्या परमात्म्याची मृमृक्षु असलेला मी प्रार्थना करतो की, तो माझ्यातील आत्मबुद्धीस प्रकाशित करणारा असल्याने मी त्याचा आश्रय घेत आहे. ह्याच ह्या वरील श्लोकाचा अर्थ आहे. गुरूच्या कृपाकटाक्षानें व दिव्य सान्निध्यानें शिष्यहि गुरु होऊ शकतात. परीस कधीही लोखंड होत नसतो. परिसाच्या स्पर्शाने लोखंड मात्र सोने होऊ शकते. पण लोखंड परीस होऊ शकेल काय ? कदापीहि नाही. शिष्यावर गुरूंचा अनुग्रह झाल्यास तो गुरुनाथ होऊ शकतो. म्हणूनच परिसापेक्षाहि गुरू श्रेष्ठ होत. तसेच गुरूने शिष्यास बोध केल्यावर तो शिष्य गुरु होऊन ती परंपरा वाढत वाढत शिष्य, प्रशिष्य हे सर्वजण गुरुपदवीस प्राप्त होतात. अशा तऱ्हेने आतापर्यंत झालेले सर्वज्ञानी उपासनाकृपेमुळेच किंवा उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे गुरुपद प्राप्त करून घेऊन आपल्या गरूकडून ज्ञानोपदेश मिळवून मुक्त झाले आहेत. हे सर्व गुरूच होत. म्हणूनच ह्या सर्वांची पूजा करावी. गुरु, परमगुरु, परमेष्टिगुरु, परात्परगुरु अशारीतीनें आपण गुरूस संबोधू शकतो. अशा प्रकारे विचार केल्यास आदिनारायणापर्यंत सर्व गुरूच होत. म्हणूनच देवतांची आराधना करावयाची असते. श्रुतीमध्ये ज्यांचे वर्णन केले आहे त्या सर्वांची आराधना करून ज्ञानप्राप्ती केली पाहिजे. साधनेशिवाय कृपा प्राप्त होऊ शकत नाही. मालकसुद्धा आपल्या नोकराकडून संपूर्णपणे काम करून घेतल्याशिवाय त्याचा संपूर्ण पगार देत नाही. त्याचप्रमाणे पूर्णपणें भक्ति झाल्याशिवाय देवाची कृपाहि होत नाही. नाहीतर संपूर्ण महिना भरण्यापूर्वीच पगाराची मागणी करणाऱ्या नोकराच्या पदरी जशी निराशा येते त्याप्रमाणे पूर्णपणे भक्ति न करता देवाजवळ वर मागणाऱ्याचीहि गत होते

देवदर्शनास जाणाऱ्या श्रीमंतांनाहि देवापुढे एक, दोन रुपये ठेवण्याची कधीच इच्छा होत नाही. पण स्वतःस आवश्यक वाटणारे वर मात्र तो मागत असतो. अतिशय श्रीमंतांना ‘तुम्ही देवास अर्पण करण्यास काय देऊ शकाल’ असे विचारले तर ‘महाराज माझ्याजवळ देण्यासारखे कांहीही नाही’ असे म्हणून तो आपले दारिद्र्य दाखवितो. अशालोकांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण होणार ?

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमांगतिम् । अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः || ‘

जो नेहमी माझे स्मरण करतो त्याला मी सुलभतया प्राप्त होतो असे परमात्म्याने म्हटले आहे.

‘अनन्यान्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याश्चिभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥’

अनन्यतेने परमात्म्याचे भजन करणाऱ्या भक्तांची सर्व जबाबदारी परमात्मा स्वतःवर घेतो. अनन्य म्हणजे अन्य कोणी नाही असा. ‘अन्याश्रयाणां त्यागे अनन्यता ।’ दुसरा कोणताहि आश्रय आहे अशी कल्पना केली तर ती अनन्यता होत नाही. म्हणून अनन्यतेमध्ये गर्क होऊन देहाची सुद्धा विस्मृती झाली पाहिजे.

श्रीगुरूकडे किंवा देवदर्शनास जाणारा प्रत्येक मनुष्य आपली अनेक दुःखे सांगून त्यांच्या निवृत्तीचा मार्ग विचारीत असतो. त्याच्या व्यवहारात आलेली विघ्नें श्रीगुरु किंवा श्रीदेवतेच्या कृपेने निवारण करून घेऊन आपली कार्ये ते सिद्धीस नेऊ शकतात. मात्र काम झाल्यावर देव गुरु-सामर्थ्याचे महत्त्व विसरून ‘मी यंव केले, मी त्यंव केले’ अशी प्रौढी करीत असतात. उत्तम वकील दिला म्हणूनच मी न्यायालयात यशस्वी झालो व निष्णात वैद्याच्या औषधामुळेच माझा रोग बरा झाला अशा तो चल्लाना करतो. ह्या कारणाने परमात्म्याचाहि त्याच्यावरचा विश्वास उडून तो क्रमाक्रमाने दरिद्री बनतो.

परमात्मा भक्तांच्याविषयी अतिशय दयार्द्र आहे. ‘कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ।’ ह्या समर्थोक्तीप्रमाणे परमेश्वर भक्ताविषयी कृपादृष्टी ठेवूनच अल्पस्वल्प परीक्षां घेत असतो. अशा ह्या लहानशा परीक्षेतसुद्धां भक्त उत्तीर्ण न झाल्यास त्याला जबाबदार कोण ? एखाद्या फळावी परीक्षा करताना ते पिकले आहे की नाही हे पहावे लागतेच की नाही ? परमात्म्याचा अनुग्रह हा सर्वश्रेष्ठ अनुग्रह आहे. परमात्मा म्हणजे पर + आत्मा = परमात्मा असे असल्याने त्याचा अनुग्रहहि श्रेष्ठ प्रतीचाच असतो. मोठ्याकडून देण्यात येणारे दानहि मोठेच असणार. एखाद्या राजास कोठेहि दान करावयाचे असल्यास तो भोपळा किंवा २-४ पैसे देईल काय ? असे करणें हा राज्यपदाचा अपमानच नव्हे काय ? ह्यासाठी मोठे लोक आपल्या स्थानास अनुसरूनच योग्य असे दान देत असतात. सद्गुरू सर्वश्रेष्ठ होत. त्यांना त्यांच्या पदाचा अभिमान आहे. तसा अभिमान नसल्यास ही सृष्टीच नाश पावेल.

‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् । किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ॥

अनन्यपणें माझा आश्रय घेतलेल्या स्त्री, शूद्र, वैश्यादि सर्वांना श्रेष्ठगति प्राप्त होते. मग आपल्या कर्मानुसार योग्यप्रकारे धर्मपालन करणाऱ्या ब्राह्मण किंवा राजर्षी ह्यांच्याबद्दल काय सांगावयाचे, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. ‘मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।’ माझ्या ठिकाणी चित्त एकरूप करून एकाग्रतेने माझी आराधना केलीस तर तुझी सर्व दुःखे नष्ट होतील. असे भगवंतांचे सांगणे आहे. म्हणूनच आराधना करणाऱ्या भक्तास कोणत्याहि बंधनाची किंवा विघ्नांची बाथा न होता तो दिव्य पद प्राप्त करून घेऊन आनंदित होतो. पण आपण सर्वजण अशी भक्ति करू शकतो काय ? भूक लागल्याशिवाय आपल्या तोंडात परमेश्वराचे नाव येते काय ? राग आल्यावर परमेश्वराची आठवण होत नाही. असे असल्यामुळे परमेश्वराची कृपा कोठून होणार ? कोणत्याहि विकारास बळी न पडता भक्तांमध्ये परमात्मभावनाचे असेल तर अगदी लवकरच त्याचे अभिष्ट सिद्ध होते व ईप्सित प्राप्ती होते. सांगावयाची मुख्य गोष्ट म्हणजे मनुष्यानें परमात्म्यासाठीच जगले पाहिजे. वाचा, मनाने तदेकचित्त होणे म्हणजेच भक्ति. काया,

‘बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ।’ अशा दृष्टीने भक्तिमूलक विचारशील होऊन पुढे जाणाऱ्या भक्ताच परमात्म्याचे ज्ञान होते. तो परमात्मा आनंदमय अद्वितीय असून नित्यतृप्त आहे.

जे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, जेथे वेगळेपणा नाही, जे एकस्वरूप होऊन प्रकाशते असे दिव्य आनंदस्वरूप गुरुरूप असल्यामुळे ते रूप जेथे जेथे प्रकट होते तेथे तेथे नित्य, परिशुद्ध गुरूरूपच आहे असे मानण्यास कांहीच अडचण नाही. हे जे परमपवित्र स्वरूप तेच गुरुस्वरूप होय. एकंदरीत अचल अशा अनन्यभक्तीने परमात्मकृपा संपादन करून तन्मूलक ज्ञान मिळवून कृतकृत्य होणें हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे. ‘स योह वै परमं वेवितव्यं ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति ।’ ह्या वचनाप्रमाणं समजले असता मानव तद्रूपच होतो असे जे ब्रह्मस्वरूप त्याचे ज्ञान करून घेतल्यास तो ब्रह्मस्वरूपच होतो अशी ही सर्वश्रेष्ठ वस्तु सर्वांनी प्राप्त करून घेतली पाहिजे.

‘गुरुशुश्रुषया विद्या ।’ गुरूंच्या सेवेमुळे गुरुकृपा व ब्रह्मविद्या प्राप्त होते. ह्या कलियुगात गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी व आशीर्वाद मिळविण्यासाठी आग्रह केला जातो ते अयोग्य आहे. सद्गुरूंच्या तोंडून निःस्वार्थ – संतृप्त मनाने सहजगत्या स्फुरण पावलेले शब्द म्हणजेच आशीर्वाद. शक्ति, भक्ति व श्रद्धा ह्यांनी संतुष्ट झालेल्या गुरूंचा एक आशीर्वाद असला की पुरे. सेवेशिवाय प्रसाद घेणें विद्वानांना योग्य वाटत नाही. परंतु आमचे पुष्कळ शिष्य पैसे मिळविण्यासाठीच आग्रही होतात. भिक्षुकांचे तर विचारूच नका ! निष्कपटपणें मनापासून सेवा केल्यास तोच तुमचे संरक्षण करील. पण ह्या काळात जास्तीत जास्त एक नारळ व दोन फुले ठेवताक्षणीच आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. असे असूनहि ‘साधवो दीनवत्सलः ।’ ह्या म्हणीप्रमाणे महात्मे कृपा करीत असतातच. पण ही मंडळी काम झाल्यानंतर केलेले नवस सोयीस्करपणे विसरून जातात. गुरुकृपा विसरून जाऊन ह्या किंवा त्या मंत्राने कार्यसिद्धी झाली असे म्हणणे हे कांही खन्या सेवेचे लक्षण नव्हे. ‘सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः।’ सेवाधर्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे हे विसरूं नये. सद्गुरुसेवा ही महान् उपासना होय.

home-last-sec-img