Literature

श्रीरामाचा विवेक-विचार

आपल्याला अयोध्येला परत घेऊन जाण्याकरितां बंधू भरत येत आहे भरत म्हणजे भ्रातृप्रेमाची एक आदर्श मूर्तीच होय, ही जाणीव श्रीरामाला होती. कैकेयीवरच्या रागाने तिचा हा मुलगा असा संबंध लावून हन्तुं समभ्येति ‘आम्हांला मारून निष्कंटक पृथ्वीचे राज्य भोगण्याकरितां हा भरत ससैन्य सज्ज होऊन येत आहे अशी भावना लक्ष्मणाने करून घेतली ‘युद्धाकरितां सन्नद्ध होत असलेल्या लक्ष्मणाला पाहून श्रीरामाच्या मुखारविंदांन बाहेर पडलेले ते विवेकपूर्ण उद्गार या ठिकाणी उद्धृत करून त्याचा विचा करूं. मनुष्याच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या विवेकाचा या ठिकाण आविष्कार झाला आहे.

किमत्र धनुषा कार्यमसिना वासचर्मणा । 

महेष्वासे महाप्राज्ञे भरते स्वयमागते ।। २ ।।

पितुः सत्यं प्रतिश्रुत्य हत्वा भरतमागतम् । 

किं करिष्यामि राज्येन सापवादेन लक्ष्मण ॥ ३ ॥ 

यद् द्रव्यं बांधवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् । 

नाहं तत्प्रतिगृण्डीयां भक्षान्विषकृतानिव ॥ ४ ॥ 

नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागरांबरा | 

न हीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ ७ ॥ 

यद्विना भरतं त्वां च शत्रघ्नं चापि मानद । 

भवेन्मम सुखं किंचिद्भस्म तत्कुरुतां शिखी ॥ ८॥

(वा. रा. अ. स. ९७ )

-भ्रातृप्रेमानें विवश होऊन येणाऱ्या या भरताकरितां धनु बाणाची व त्या ढालतरवारीची आवश्यकता ती काय आहे, लक्ष्मणा सत्यसंध पित्याला वचनभंगाच्या पातकांत लोटून स्वतः पित्राज्ञाभंगाचे पातक पत्करून, बंधुप्रेमानें आलेल्या भरताचा कपटानें वध करून, बंधुघातकी म्हणवून घेऊन मिळणारें तें राज्य विषामिश्रित पक्वान्नाप्रमाणेच त्याज्य व् का ! असें अपवादात्मक राज्य कोणास पाहिजे ? पित्राज्ञेनें प्राप्त झालेले राज्य उपभोगीत असतांना भरताचा वध करून श्रीरामानें अयोध्येचें राज्य बळकावले असा अपवाद आल्याशिवाय राहील काय ? बंधु-मित्रांच्या रक्तानें माखलेलें तें राज्य कोणाला सुखावह होईल ? (‘ करावें तसे भरावें’ या म्हणी प्रमाणे ) मी दुसऱ्याचा वध करून मिळविल्याप्रमाणे माझा वध करून दुसरा कोणीतरी हे राज्य की नाही मिळविणार ? मी पित्राज्ञेचें उल्लं घन केल्याप्रमाणे माझी मुलेंहि माझ्या आज्ञेचें उल्लंघन कां नाही करणार ? अधर्मानें मिळविलेली राज्यसंपत्ति कोणालाहि शांतिसुखप्रद होत नाही. पापानें पापच वाढते. ‘यथा राजा तथा प्रजा माझी प्रजादेखील असेंच माझ्याप्रमाणे करावयाला लागून अधर्मी बनेल. या न्यायानें संबंध राज्यच पातकी होईल. परिणामी त्याचे काय होईल ? किती भयंकर दृश्य तें ! राज्य नसलें तरी पत्करलें. अशा राज्यापेक्षां कंदमुळांच्या आहाराची व पवित्र अरण्यवासाची ती निर्दुष्ट दिव्यानंददायी मुनिवृत्ति किती पटीनें तरी उच्च ठरेल ! मनांत आणले तर सर्व पृथ्वी हस्तगत करण्यास मला एक क्षण नको. या पृथ्वीचेच काय पण त्या इंद्राच्या अमरावतीचे राज्यहि जर मला अधर्मानें मिळत असेल तर तेंहि मी पत्करणार नाही. भरताला, तुला व शत्रुघ्नाला सोडून राज्य करण्याची थोडीदेखील जर मला इच्छा असेल तर या क्षणीच माझा हा देह जळून भस्म होवो. आम्हांपैकी कोणालाच अशी बुद्धि नाही. तुझ्याप्रमाणेच भरताचेंहि निःसीम प्रेम माझ्यावर आहे. आजपर्यंत तो कधीं माझ्याविरुद्ध गेला आहे का ? सत्यस्थितांचे परिज्ञान करून न घेतां अनाठायीं कल्पना करून झालेल्या विपरीत भावनेमुळेहि कित्येकदां वितुष्ट माजतें, खडाजंगी होते, मारूं का मरूं येथपर्यंत येऊन बेततें. पूर्वापर विचारानें सत्यस्थिति जाणून यथायोग्य वर्तण्याचें चातुर्य अंगीं बाणले असलें म्हणजे स्वतःला व तसेच दुसऱ्यालाहि सुख होतें. ओघानें या ठिकाणी ‘ सहसा विदधीत न क्रियामविवेकः परमा पदांपदम् ‘ या वचनाचें स्मरण होते. यांत पुष्कळच शिकण्यासारखे आहे. कानांनी ऐकलें आणि डोळ्यांनी पाहिले तरी त्याच्या बुडाशी काय याचा खोलवर विचार करूनच मग काय ते ठरवावें लागतें. नाहीतर एकदम वृत्ति बेफाम होऊन पुष्कळ वेळां कांहींचे कांहींच होतें. ‘ दिसतें तसे नसतें’ अशी एक म्हणहि पण आहे.

home-last-sec-img