चिद्धिदं सर्वं-काशते काशते च । (नृ. उ. ता. सं. ७) चिद्रूपं ब्रह्म । जगंदांतरी अनुसंधान । बरें पहाणें हेंचि ध्यान।
ध्यान आणि तें ज्ञान एकरूप ।। (दा. २०-४-१२) प्रगट रामाचे निशाण । आत्माराम ज्ञानधन । विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥१४॥‘ अशी श्रीरामोपासना म्हणजे ब्रह्मोपासनाच श्रीसमर्थांनी सांगितली. उपासनेच्या ठिकाणी ब्रह्मभाव ठेवून ‘सोऽहं भावेन पूजयेत्‘ ते आपले शुद्धरूप आहे म्हणून उपासना करावी, असा तत्वप्रधान श्रुतिशास्त्रांचा मूलग्राही उपदेश आहे. तत्सद्यत्परं ब्रह्म रामचन्द्रश्चिदात्मत्कः सोऽहमों तद्रामभद्रपरं ज्योती: सोऽहमोमित्यात्मानमादाय मनसा ब्रह्मणैकी कुर्यात् ॥ (श्रीराम उ. ता. उ.) ज्ञानधन श्रीरामचंद्र जें एक अविनाशी परब्रह्म आहेत तेच मी ओंकारलक्ष्य सर्वप्रकाशक श्रेष्ठ स्वयं ज्योतिस्वरूप श्रीरामचंद्ररूप आहे. अशी ऐक्यरूप श्रीरामरायांची उपासना करविण्याविषयीं श्रीरामोत्तरतापिनींत सांगितले आहे. सदा रामोऽहमस्मीति तस्वतः प्रवदन्ति ये । न ते संसरिणो नूनं राम एव न संशयः ॥ ( श्रीराम उ. ता. उ.) तात्विक सत्य ओळखून जे सदेव मी तें परब्रह्मरूप श्रीराम आहे असे म्हणतात, ते खरोखरच निःसंशय श्रीरामच, ते प्राणिमात्राचें शुद्धरूप पर ब्रह्मच होऊन असतात, असेंहि पण पुढच्या मंत्रात आले आहे. • रमन्ते योगिनो यस्मिन्नित्यानंदे चिदात्मनि । इति रामपदेनासौ परं ब्रह्माभिधीयते ।‘ काही ठिकाणी रमन्ते योगिनोऽनंते नित्यानंदे चिदात्मनि ।‘ (श्रीराम पू. ता. १-६) असे आहे. एकंदरीत महान् योगी ज्या एका अविनाशी, अपार आनंदधन, संविन्मात्र अशा आत्मरूपाच्या ठिकाणी अखंड रममाण झालेले असतात. तेच श्रीरामाचे यथार्थरूप असल्यामुळे श्रीराम प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत, असे श्रीरामपूर्वतापिनीत आले आहे. श्रीरामरहस्यातहि असाच एक मंत्र आला आहे तो हा- ‘राम एवं परं ब्रह्म राम एवं परं तपः । राम एव परं तत्त्वं श्री रामो ब्रह्मतारकम् ।‘ (श्रीरामरहस्य उ. १-६), गर्भजन्मजरामरणसंसारमहद्भयात्संतारयतीति । तस्मादुच्यते तारकमिति । ( श्रीराम उ. ता. २) श्रीरामाला तारकब्रह्म म्हणून कां म्हटलें या प्रश्नाचें उपनिषत् ‘श्रीराम गर्भ, जन्म, म्हातारपण, मरण इत्यादिकांनी युक्त असणाऱ्या संसाराच्या महद्भयापासून भक्तांना तारतात म्हणून त्यांना तारकब्रह्म अथवा श्रीगुरु असे म्हणतात‘ याप्रमाणे उत्तर देऊन समाधान करते.
उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचे समाधान । येणें रितीं ॥‘ (दा. २०-४-२२) श्रीराम या शब्दांत हरिहरैक्य आहे म्हणून व शैव तसेंच वैष्णव या दोघांनाहि श्रीराम आपले उपास्यदैवतच आहेत हे समजावें म्हणून फोड करून उपनिषत् असे सांगतें; ‘नारायणाष्टाक्षरे च शिवापञ्चाक्षरे तथा । सार्थकार्णद्वयं रामो रमन्ते यत्र योगिनः ।‘ ( रामरहस्य उ. ५-३) ‘ॐ नमो नारायणाय’ आणि ‘ॐ नमः शिवाय‘ या दोन मंत्रांतील सारार्थगर्भित असे महत्त्वाचे ‘रा‘ आणि ‘म‘ हे दोन शब्द घेऊन ‘राम‘ हा मंत्र झाला आहे. ‘आद्यो ‘रा‘ तत्पदार्थ:स्यात् ‘म‘कारस्त्वं पदार्थवान् । तयोः संयोजनमसीत्यथ (मुनयः) तत्वविदो विदुः ॥‘ ( रामरहस्य उ. ५-१३). राम हा मंत्र सर्वांना ‘तें परब्रह्म तूं आहेस,’ ‘तत्त्वमसि‘ म्हणून उपदेश करतो, हे या वचनानें व्यक्त केले आहे. आद्य ‘रा‘ तत्पदवाच्य परमेश्वर आणि नंतरचें ‘म‘ हे त्वंपदवाच्य जीव अशा या दोन नावांना कारणीभूत होणाऱ्या माया आणि अविद्या या दोन उपाधि यांच्यांतून काढून टाकल्यानंतर यांच्या ठिकाणी जें एक चिदानन्द परब्रह्म सर्वाधिष्ठानरूप उरतें तेंच तूं आहेस असा अर्थ ज्या असि पदाने होतो तें रा आणि म या दोन अक्षरांच्या एकदम उच्चाराने झालेल्या ऐक्यांत आहे असे हा मंत्र सांगतो. रा हे स्वयंप्रकाश परब्रह्मरूप आहे आणि म मायारूप आहे. प्रथम अग्निबीजरूप (रं) रा उच्चारले जाऊन नंतर (मं) म चा उच्चार होत असल्यामुळे स्वयंप्रकाश चिदग्निरूप परब्रह्मांत, राम नामाचा उच्चार केल्याबरोबर, म कारानें लक्षित होणारी माया हुत होते, यामुळे मायानाशक हे नाम आहे. या नामांत प्रकृतिपुरुषांचे ऐक्य होऊन उच्चाराअंती प्रगटणाऱ्या मौनांत निःशब्द परब्रह्माचा साक्षात्कार होतो. मायाबीज आणि ब्रह्मबीज या मंत्रांत असल्यामुळे मोक्षाचीहि प्राप्ती होते आणि इच्छित्यास वैभवाचीहि प्राप्ती होते. म्हणून हा मंत्र, हें नाम, भुक्तिमुक्ति देणारे अभ्युदयनि:- श्रेयसात्मक आहे, इत्यादि अनेक प्रकारांनी रामरहस्याच्या शेवटच्या विभागांत ‘राम‘ नामाचा विचार केला आहे.