Literature

श्री बद्रीनारायण स्तोत्रम्‌

पूर्वपीठिका

श्रींनी श्रीसमर्थ गुरुमाऊलीच्या आज्ञेनुसार संन्यासाश्रमाचा स्वीकार 1942 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर केला. तत्पूर्वी शिगेहळ्ळी मठाचे श्री शिवानंद स्वामी यांनी 1932 सालीच श्रींना संन्यास देण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी आपला समर्थसंप्रदाय आहे श्रीसमर्थांची तशी आज्ञा झाल्यास संन्यास घ्यावा हे उत्तम असे मनात येऊन “पुढे पाहू आपली कृपा असावी” असे निवेदन श्रींनी केले होते. श्रींच्या मनात असे विचार यावेळी आले आहेत हे ओळखून “असं होय! बरं ! पुढे श्रीसमर्थांची आज्ञा तुमच्या इच्छेप्रमाणे होऊन याच मठात तुम्हाला पूर्ण संन्यास होईल त्यावेळी हा देह नसेल नसेल यासाठी आता मी तुम्हाला अर्ध संन्यास देतो” असे म्हणून आपली रेशमी भगवी छाटी व संन्यास संप्रदायाचा एक कमंडलू श्री शिवानंद स्वामी महाराजांनी श्रींना दिला होता. त्यांच्या भाकिताप्रमाणे पुढे झाले. संन्यास घेतल्यानंतर च्या पहिल्या गुरुपौर्णिमेचे रात्री भावावेशात असताना बद्रिकाश्रमाच्या नरनारायण पैकी “नर” येऊन श्रींना त्यांनी नारायणाकडे नेले. त्यावेळी श्री नारायण निर्विकल्प समाधीत होते नर यांनी नारायणा कडे बोट करून हे तुझे संन्यासाचा गुरू म्हणून श्रींना सांगितले. आपणास योग्य गुरु लाभले म्हणून श्रींना समाधान वाटले पण… असा विचार डोकावतो आहे तोच, अंतरंगातून “महावाक्याचा उपदेश पूर्व आश्रमातच श्रीसमर्थांनी कडून झाला आहे; वेदांताच्या सर्व प्रक्रियांचा हृदयपरिवर्तनात्मक अभ्यास पूर्वाश्रमातच झाला आहे; या पुढचा निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाचा उपदेश मात्र “अवंचनेंन प्रोवाच” , “मौन व्याख्या”, अशा संकेताने, आपले प्रत्यक्ष उदाहरणच दाखवून, श्री गुरू नारायणा कडून आता हा होत आहे.” असे उद्गार उमटले. या आनंदात असतानाच जागृत झाल्याप्रमाणे होऊन इकडचे भान झाले त्यावेळी बद्रीकश्रामच्या यात्रेचा विचार त्यांच्या मनात आला. पुढचा चातुर्मास तेथे व्हावा असे वाटले. पुढे चातुर्मासकरिता बद्रिकाश्रमला गेले असता त्या क्षेत्री केलेली ही दोन स्तोत्रे पुढे देत आहोत. पहिले स्तोत्र प्रथम दर्शनाचे वेळी केले व दुसरे स्तोत्र विजयादशमी झाल्यावर ऋषिकेश ला निघण्याच्या वेळी अश्विन पौर्णिमेस केले अशी या दोन स्तोत्रांची पूर्वपीठिका आहे.

( भुजंगप्रयात वृत्त )

तपस्वी प्रभु: पुर्ण वैराग्य दीप्तो
निजानंद संदेहतृप्तो वरेण्य:।
चिदानंदरुपेण राराजते य:
त्रिलोकीगुरुं नौमि नारायणं तम् ।।१।।

जो तपस्वी प्रभू सर्वश्रेष्ठ पूर्ण वैराग्याने देदीप्यमान असलेला, आत्मानंदाच्या राशीत गढून गेलेला चित् व आनंदरुपाने नेहमी शोभत असतो त्या त्रैलोक्य गुरू नारायणाचे मी स्तवन करितो ।।१।।

भवब्धौ निमग्नान् विमुढांश्च दीनान्
चिदानंदशुद्धाद्वयं ब्रह्मसौख्यम् ।
प्रबोधाय भूमापि योSत्रावतीर्ण:
त्रिलोकीगुरुं नौमि नारायणं तम् ।।२।।

संसाररुपी सागरात बुडालेल्या विमूढ व दिन लोकांना चित्, आनंद, शुद्ध, व अद्वैत अशा ब्रह्मसौख्याची जाणीव करून देण्यासाठी भुमा असूनही जो येथे अवतरला आहे त्या त्रैलोक्य गुरु नारायणाचे मी स्तवन करितो ।।२।।

सृजन् स्वोरुतश्चोर्वशीनां समूहं
बभूवात्र य: शक्रगर्वापहारी ।
महादृप्तकंदर्पदर्पापहर्ता
त्रिलोकीगुरुं नौमि नारायणं तम् ।।३।।

स्वतःच्या मांडीपासून उर्वशीचा समूह उत्पन्न करून ज्यांनी इंद्र व अत्यंत गर्विष्ठ मदन यांचा गर्वहरण केला त्या त्रैलोक्य गुरू नारायणाचे मी स्तवन करितो ।।३।।

“स्वलक्ष्मीं त्यजन् दीनरक्षाकथं स्यात्”
न भूयात्स्वशंकावृतो भक्तवृंद: ।
तदार्थं य आस्ते कुबेरं गृहित्वा
त्रिलोकीगुरुं नौमि नारायणं तम् ।।४।।

“स्वतःच्या ऐश्वर्याचा त्याग करून दीनांचे रक्षण कसे होईल?” अशी भक्त समुदायांस आपल्याबद्दल शंका येऊ नये म्हणून जो कुबेरासह राहतो त्या त्रैलोक्य गुरु नारायणाचे मी स्तवन करतो ।।४।।

निजेSस्मिन्नमायेति संदर्शनाय
नलक्ष्म्या युतो योSत्र भक्तार्तिहन्ता ।
स्वरूपं दिशन्तं परं ब्रह्मशान्तं
त्रिलोकीगुरुं नौमि नारायणं तम् ।।५।।

आपल्या या रूपात माया नाही हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी येथे जो लक्ष्मीसह नाही व जो आपले श्रेष्ठ ब्रह्मशांतरूप दाखवितो व भक्तांचे दुःख नाहीसे करतो त्या त्रैलोक्य गुरू नारायणाचे मी स्तवन करतो ।।५।।

गुरुनारायाणस्तोत्रं य: पठेद्भक्तिसंयुत: ।
कामजित्स्तोत्र मुक्तश्च नारायणकृपावशात् ।।६।।

जो हे नारायण स्तोत्र भक्तीने पठण करील तो वासना जिंकून नारायणाच्या कृपेने येथेच मुक्त होईल.

रचना: श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज

home-last-sec-img