वेदांन्ती असणाऱ्यांमध्ये दोन प्रकारचे लोक आढळून येतात. संन्यास घेतल्याशिवाय आत्मज्ञान होणे शक्य नाहीं असे म्हणणारे पहिल्या प्रकारचे तर आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास संन्यास घेण्याची आवश्यकता आहे असे नाही, गृहस्थाश्रम साधून देखील आत्मज्ञान प्राप्त होणे शक्य आहे असे म्हणणारे दुसऱ्या प्रकारचे लोक होत. ह्या दोन्ही प्रकारांत आत्मज्ञान व मोक्ष ह्याकरिता प्रत्यक्ष साधन कोणते?
कांहीजण ‘आश्रमादाश्रमं गच्छेत् ह्या श्रुतीचा आधार घेऊन तारुण्यात त्यागी बनणे, सर्वस्वाचा त्याग करणे योग्य नव्हे असे म्हणतात तर कांही ‘अग्निहोत्रं गवालम्बम्’ ह्या श्लोकानुसार ‘कलौ पंच विवर्जयेत् ।’ कलियुगात करावयाची नाहीत अशी जी पांच विधाने आहेत त्यात संन्यासाचाहि समावेश असल्याकारणाने कलियुगात निवृत्तिमार्ग अथवा संन्यास मुळातच अयोग्य होय असे म्हणतात. आता याचे समाधान कसे करावयाचे ?
आपण सूक्ष्मपणें विचार केल्यास हा कसला संसार? हा संसार अविवेक्यांना सुंदर वाटतो, पण त्याच्या अंतरंगात शिरून विचार केल्यास त्याचे असारत्वच आपल्या दृष्टीसमोर उभे राहाते. काय ह्या देहाचा बडिवार ? आणि कसले हे देहसुख ? आपल्या ह्या अपवित्र, अस्वच्छ देहाचा अभिमान बाळगून संसार करावयाचा ? आणि त्याला ‘इति कर्तव्य’ म्हणून कसे म्हणावयाचे? ह्या देहातील दुर्गंधीयुक्त व अपवित्र द्रव्ये पाहिली की ‘नको नकोसे’ होते. ह्या जन्माचे जन्मकर्म पाहिले की असे वाटते की, आपण किती घाणेरडा संसार करीत आहोत. आपल्या ह्या प्रवृत्तीचा अभिमान धरून जे शास्त्राधार देतात त्यांना काय म्हणावे ? ह्या गोष्टीचे शास्त्राधाराने निराकरण करण्यासाठी विवेक व वैराग्याच्या दृढ भूमिकेतून चार शब्द लिहून दिलेत तर चांगले होईल’ असे तू विचारले होतेस ना? मी अवश्य लिहून देईन. ब्रह्मचर्याश्रमात सर्वांच्या पुढे सर्वसाधारणतः उभा राहणारा हाच प्रश्न नव्हे का? सर्वांनाच याचा उपयोग होणार आहे. ही समस्या तुझ्यासारख्या कित्येकांच्या समोर असते आणि तारुण्यात पदार्पण करताच आपण प्रवृत्तीचा आश्रय घ्यावा की निवृत्तीचा हाहि प्रश्न समोर येतो.
‘अन्यच्छ्रेयोऽन्यदुतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुष सिनीतः। तयोः श्रेय आददानस्य साधुर्भवति हीयतेऽर्थाद्य उ प्रेयो वृणीते ।। (कठ. १-२-१) निवृत्तिमार्ग वेगळा व प्रवृत्तिमार्ग वेगळा. निवृत्तिमार्ग हा मोक्षाचा मार्ग आणि प्रवृत्तिमार्ग हा संसाराचा मार्ग होय. विभिन्न फलाचा समावेश असलेले हे दोन्ही मार्ग यौवन आल्याबरोबर मनुष्याला आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करितात. भोग आणि विषयसुखाकडे इंद्रियांचा स्वाभाविक कल असल्यामुळे ह्या प्रवाहात पडणे अत्यंत सोपे व सुलभ दिसले तरी व सुखाचा अनुभव घेण्याकरिता ‘प्रवृत्तिमार्ग’ प्रिय वाटत असला तरी प्रवाहाची धार तोडून नदीच्या पैलतीरास पोहोचणान्या मनुष्याला जसा आनंद मिळतो त्याप्रमाणे ह्या दोन्ही मार्गापैकी निवृत्तिमार्गाचा अवलंब केला तर मनुष्याला त्यापेक्षा जास्त आत्मसुख प्राप्त होईल. प्रवाहाबरोबर वाहात जाणान्याच्या जीवाची आशाच नाहीशी होत असते. त्याप्रमाणे प्रवृत्तिमार्गाचे अवलंबन केल्यास त्याला खऱ्या आत्मसुखाचा मार्ग प्राप्त होऊ शकत नाही असे कठोपनिषदाचे म्हणणे आहे;
मुक्तीचा अधिकारी कोण असू शकतो ? ह्याचे विवरण करताना ‘अत्रसाधनचतुष्ट सम्पन्न एकाधिकारी ।’ असे म्हटले आहे. नित्यानित्यविवेकः । इहामुत्रफलभोगविरागः । शमादि षट्कम् । मुमुक्षुत्वम् ।’ असे मोक्षसाधना चतुष्टय आहे. ज्याला नित्य म्हणजेच ज्याला शाश्वत सुख हेच एकमेव आत्मसुख आहे असे पटते; इह लोकात व परलोकात मिळणारे सुख हे विजेसारखे झटकन चमकून लगेच अंधार होण्याप्रमाणे अशाश्वत आहे असे समजून इहलोकात व परलोकात प्राप्त होणाऱ्या देहादि भोग्य वस्तूंत जो विरक्ती व्यक्त करतो; मन आदि अंतरेन्द्रिये, कर्मेन्द्रिये ह्यांचा जो निग्रह करतो; जो शीतोष्ण सुखदुःख, तहानभूक ह्यांचे द्वंद्व सहन करू शकतो, ज्याचा वेद, शास्त्र, गुरुवाणी ह्याच्या ठायी अत्यंत विश्वास आहे; ज्याला आपण आचरीत असलेला मोक्षमार्ग योग्य असल्याचे समाधान असते, जो आपल्या आयुष्याचा एक क्षणहि भोगसुख प्राप्तीसाठी व्यर्थ घालवू इच्छीत नाही; ज्याला मोक्षसुखाची तीव्र इच्छा असते; अशा साधनचतुष्ट संपत्तीने परिपूर्ण आहे त्यालाच मोक्षाचा अधिकारी म्हटले जाते. ह्या साधनचतुष्टात मोक्षाकरिता विरक्ति म्हणजे संन्यासाची अपेक्षा नाही असे कोठेतरी आढळून येते का ?
‘अनात्मनां देहादीनामात्मत्वेवाभिमन्यते सोऽभिमान आत्मनोबन्धः तन्निवृत्तिर्मोक्षः । (सर्वसारोपनिषद् २) आपला नसलेल्या देहाच्या ठायी आपलेपणाचा अभिमान धरणे हेच बंधन व आपण आनंदरूप राहून, देहाचा स्वाभिमान नष्ट होणें हाच मोक्ष. सर्वत्र सर्वांच्या सत्यरूपानें परिपूर्ण असलेले अनंतस्वरूप हेच आपण असून जेथे दुःखाचा पूर्ण अभाव असतो आणि आनंदाखेरीज इतर काहीहि नसणाऱ्या अशा स्थितीसच मोक्ष म्हणतात. ‘सुखमिति च सदानंदस्वरूपं ज्ञात्वा आनन्दरूपा या स्थितिः सैव सुखम् (निरालंबो, प. १५)’ सच्चिदानंद असलेले आपले यथार्थरूप समजून, आनंदरूप होऊन, आपल्या आनंदाची अखंड जाणीव असणेच खरे सुख होय. ‘परमं पदमिती च प्राणेन्द्रियाद्यन्तः (देहाद्यन्तः) करणगुणादेः परतरं सच्चिदानंदमयं नित्यमुक्तब्रम्हस्थानं परमं पदम् ।’ (निरालंबो ३६) देहादि अंतःकरण, गुण, इंद्रिय ह्या सर्वाशिवाय आपल्या जाणीवेने जीवन व्यतीत करून निव्वळ आनंदरूप बनून नित्यमुक्त अशा ब्रह्मस्वरूपात लीन होणेच परमपद होय असे श्रुतिमाता समजावून सांगते.
तारुण्यप्राप्तीनंतर प्रवृत्तीचा आश्रय घ्यावयाचा की निवृत्तीचा आश्रय घ्यावयाचा हा प्रश्न समोर आला असता काय केले तर चांगले होईल हे आता तुम्हीच सांगा पाहू !!
‘द्वाविमावथ पन्थानी यत्र वेदाः प्रतिष्ठिताः । प्रवृत्तिलक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः ।’ आपापल्या परीने प्रवृत्ति व निवृत्ति हे दोन्ही मार्ग आहेत असे वेदांनी प्रतिपादिले आहे. ‘विरक्तिः संन्यसेविद्वान् सरक्तस्तु गृहे वसेत् ।’ ज्यांना विषयवासना नाही त्यानें संन्यासमार्गाचा अवलंब करावा आणि ही विषयभोगाची वासना दूर करून परमार्थ साधणे ज्याला शक्य नाही, त्याने निषिद्ध मार्गाने न जाता शास्त्रोक्तपणे गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून प्रवृत्तिथर्माप्रमाणे काही दिवस घालवून ‘आश्रमादाश्रमं गच्छेत् ।’ ह्या श्रुतिप्रमाणे वयाची पन्नास वर्षे उलटल्यावर आपली इंद्रिये आपल्या ताब्यात आल्यानंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रमात राहून संन्यासाश्रमाची पूर्वतयारी करून सर्व भोगसुखाची इच्छा नष्ट करून ज्ञानप्रसाराचा स्वीकार करावा, असे श्रुतिवाक्य आहे. ‘ब्रह्मचर्यसमाप्य गृही भवेत् । गृहीभूत्वा वनी भवेत वनी भूत्वा प्रव्रजेत् ।’ हे वाक्य ‘ आश्रमादाश्रमं गच्छेत् ।’ ह्या वाक्याचेच स्पष्टीकरण होय. ह्यावरून प्रवृत्तिमार्गाद्वारे पाहिले असतां संन्यासच मोक्षाचे साधन होय हे स्पष्ट होत नाही का ? ह्या श्रुतिवाक्यास उत्तम आधार म्हणजे याज्ञवल्क्य मुनींचे उदाहरण ! याज्ञवल्क्यांच्या काळी त्यांच्यासारखे विद्वान व ब्रह्मनिष्ठ कोणीहि नव्हते, हे जनकराजाच्या दरबारात झालेल्या सभेतील वृत्तांतावरून कळून येते. त्यांनी संन्यास स्वीकारला. संन्यास स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपली पत्नी मैत्रेयी हिला त्याप्रमाणे निरोप पाठविला. ह्या सर्व आधारावरून चतुर्थाश्रम असलेला संन्यास स्वीकारणें हे मोक्षाचे प्रत्यक्ष व श्रेष्ठ साधन असले तरी त्या आधारावरून ब्रह्मचर्याश्रमापूर्वी अथवा ब्रह्मचर्याश्रमामधून तो स्वीकार करता येतो हे सिद्ध होत नाही, अशी शंका व्यक्त केली तर त्यालाहि श्रुतीचे आणखी आधारहि आहेत.
‘न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्त्वमानशुः।’ कर्माने नव्हे, प्रजेने नव्हे धनामुळेही नव्हे तर एकमेव त्यागानेच कित्येक मोक्ष साधतात असे ह्या श्रुतिवाक्यात सांगितले आहे. परस्पर सापेक्ष असलेल्या गृहस्थाश्रमाचे व वानप्रस्थाश्रमाचे निराकरण करून ब्रह्मचर्याश्रमातच संन्यासाश्रम स्वीकारण्याचीच सूचना दिली असल्याचे येथे स्पष्ट दिसून येते. ‘ब्रह्मचर्यादेवप्रव्रजेत् । गृहाद्वा बनाद्वा यदहरेव विरजेत् तदहरेव प्रव्रजेत् ।’ ह्या उपनिषद वाक्यावरून ब्रह्मचर्याश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात असता ज्यावेळी वैराग्य उत्पन्न होईल त्यावेळी संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा हेच स्पष्ट होते. ज्यावेळी वैराग्य उत्पन्न होईल त्यावेळी संन्यासाचा स्वीकार करावा असे सांगितल्यावरून ब्रह्मचर्याश्रमाच्या पूर्वीहि अनुपनित असतानाहि संन्यासाश्रमाचा स्वीकार करू शकतो असाच याचा अर्थ उघड दिसतो. ब्रह्मचर्याश्रमांत संन्यास घेतल्याचे श्रीमदाद्यशंकराचार्यांचे उदाहरण आहे. तर अनुपनीत असताना संन्यास स्वीकाराचे श्रीसनकादि मुनींच्या उदाहरणावरून दिसून येते. वर दिलेल्या उपनिषद्वाक्याप्रमाणे आणि श्री शुकसनकादि मुनींच्या उदाहरणावरून मोक्षासाठी विरक्तीचेच प्राधान्य असून ती जेव्हां उद्भवेल तेव्हांच मनुष्य संन्यासत्त्व धारण करू शकतो असे स्पष्ट होते. ह्या वाक्याऐवजी महानारायणोपनिषदामध्ये मोक्षाचे साधन असणारी अशी क्रमवार अकरा साधने सांगून शेवटी श्रेष्ठ आणि साक्षात् साधन म्हणजे संन्यासच होय, असे ‘न्यास एवात्यरे चरेत् ।’ ह्या वाक्याने स्पष्ट केले. आहे. अशा प्रकारे संन्यास अथवा विरक्ती यांचे महत्त्व वेदवेदान्तातील वाक्याद्वारे सिद्ध झाले आहे.
मनुस्मृतीमध्येहि असेच सांगितले आहे. ‘यश्चैतानू प्राप्नुयात् सर्वान् यश्चैतान् के वलांस्त्यजेत् । प्रापणात् सर्वभोगानां परित्यागो विशिष्यते ।। (२-९५) जो सर्व भोग भोगतो आणि जो हे सर्व सोडतो, ह्या दोघांत जो भोग सोडतो त्यालाच शांती प्राप्त होते. तोच श्रेष्ठ होय. क्रियेने वासना, वासनेमुळे क्रिया, क्रियेने शेवटी दुःख, शोक असे हे कष्टप्रद भोगसाधन आहे. अग्नीमध्ये हविष्य पदार्थ टाकल्यानें ज्वाला जशा जास्तच वाढतात तसे उपभोगामुळे भोगाची वासना आपोआप वाढत जाऊन अशांति वाढविण्यास हे उपभोग कारण ठरतात. भोगांनी नव्हे तर भोगांच्या त्यागाद्वारेच वासनांवर विजय मिळविणें आवश्यक आहे. त्यामुळे सर्व भोगांच्या प्राप्तीपेक्षा त्यांचा परित्यागच म्हणजे त्यांची कल्पना व संकल्प यांचाहि त्याग करणें महत्त्वाचे आहे. असेच वर दर्शविलेल्या व ‘न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते’ ह्या मनुस्मृतीतील श्लोकांचेहि हेच तात्पर्य आहे. विषयोपभोगाचे मार्ग मनुष्यास जन्ममरणात्मक अशा संसारसमुद्राकडे नेतात तर विषयोपभोगाचा त्याग जन्ममरणरहित अशा ब्रह्मस्वरूपाच्या अनंत आनंदसमुद्राकडे नेतो असा भोग-त्यागाचा विवेक आहे. संपूर्ण भगवद्गीतेहि त्यागालाच महत्त्व आहे. भगवद्गीतेत ‘शक्नोती हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः |५|२३|| असे म्हटले आहे. देहाच्या अंतापर्यंत कामक्रोधामुळे उद्भवणारे वेग सहन करण्यास जो समर्थ असतो तोच सर्व मनुष्यांत योग्य व चांगला ठरतो आणि त्यालाच खरे सुख प्राप्त होते. ह्यामुळेच ‘सर्वांच्या अगोदर तूं इंद्रियावर विजय मिळवून आत्मज्ञान व आत्मानुभवाचा नाश करणाऱ्या पापी कामावर विजय मिळव’ असे वरच्या तसेच ‘तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादी नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि होंनं ज्ञानविज्ञाननाशनम् । ह्या श्लोकाद्वारे अर्जुनास श्रीकृष्णानी बोध केल्याचे सर्वांना माहीत आहे. ‘अविधिकृन्नरकमश्नुते’ श्रुतिस्मृतींनी न सांगितलेली कर्मे केली तर नरकप्राप्ती होते. त्याग हा शास्त्रसंमत असलेला सामान्यविधि नसून एक महानू विधीच आहे असे वरील आधारावरून व उदाहरणावरून सिद्ध होते.
‘अद्वितीयं ब्रह्मतत्त्वं न जानन्ति यथा तथा । भ्रांता एवाखिलास्तेषां क्व मुक्तिः क्वे ह वा सुखम् ||’ (वराहोप २/ ५७) अद्वितीय आनंदस्वरूपी ब्रह्मतत्त्व ज्यांना कळत नाही ते सर्व भ्रांत होत. त्यांना कसले सुख व कसली मुक्ति ?” असे वराहोपनिषदात एक वाक्य आहे. तसेच ‘अतिवर्णाश्रमं रूपं सदानंदमद्वयम् यो न जानाति सोऽविद्वान् कदा मुक्तो भविष्यति ?।।’ (वराहोप १/६) देहाशी संबंधित असणाऱ्या वर्णाश्रमादिपेक्षा जा असे अद्वितीय आनंदरूप जो जाणत नाही असा अज्ञानी केव्हा मुक्ति मिळवील ? असे हे दुसरे वाक्य आहे. शाम्यति । अतिश्चित्तं समाथे हि निर्विकल्पे चिदात्मानि
(प्रत्यग्रुपे परात्मनि ।।) जगाच्या भावना ह्या खऱ्या नसून केवळ चित्तापासून उद्भवलेला तो एक भ्रमाभास आहे. चित्ताचे स्पंदन झाले नाही तर हे सर्व असणार नाही. सुप्तीमध्ये असल्यावर त्या सुखस्थितीत जग कोठून दिसणार? भेद कोठे असणार ? चित्ताच्या एका पडद्यात आनंदस्वरूप ठेवून निश्चलपणें आनंदामध्ये राहिले तर तेच आपले यथार्थरूप मानले जाते. मनुष्य जागृत व स्वप्न ह्या सर्व प्रापंचिकाचा त्याग करून त्यापेक्षा वेगळ्या असलेल्या आत्मानंदाचा अनुभव घेण्यास निघतो, म्हणजेच संन्यास ग्रहण करतो त्यावेळी कलियुगात प्रपंचत्यागरूप संन्यास निषिद्ध आहे असे कोण म्हणेल ? व तसे सांगितले तरी ऐकणार कोण ? मृगजल हे पाणी नसून भास आहे म्हणून खऱ्या पाण्याचा कलियुगात शोध घेणे निषिद्ध आहे असे म्हटल्यासारखेच, प्रपंच खोटा आहे म्हणून त्याचा त्याग करून कलियुगात खऱ्या आत्मसुखाचा अनुभव घेऊ नये किंवा घेण्याचा प्रयत्न करू नये असे म्हटल्यासारखेच होते, नाही का ? तसेच खरा आनंद प्राप्त करून घेण्यास निघालो असता प्राप्त झालेला भवदुःखाचा चुकीचा मार्ग सोडून निवृत्तीच्या योग्य मार्गाने जाणे निषिद्ध मानले तर योग्य गावांस जाणान्या वाटेऐवजी आपण चुकीच्या वाटेनें जात आहोत असे समजल्यावर योग्य वाटेने जाणें निषिद्ध होय असे म्हटल्यासारखे होईल. बागेत किंवा शेतात बांधून ठेवलेले बुजगावणे ओळखून आपण त्यात निःशंकपणे घुसतो त्याप्रमाणें आपल्या यथार्थ असलेल्या एकमेव अशा आनंदस्वरूपप्राप्तीसाठी आपल्या मनानें दाखविलेला रस्ता खोट्या संसाराप्रत नेणारा आहे असे समजल्यावर तो सोडून आपल्या सत्य स्थितीकडे जाणारा रस्ता धरण्यास कलियुगावे बंधन आहे काय ? कलियुगहि अद्वितीय अशा आत्मस्वरूपाच्या दृष्टीने काल्पनिकच नाही का ? वेड लागल्यावर वेड असेपर्यंत वेडयाच्या इस्पितळात राहणे योग्य असले तरी वेड नाहीसे झाल्यावर घरी येण्यास कोणी आड येत नाही, त्याप्रमाणे आपल्या अज्ञानदोषामुळे लागलेले विषयसुखाचे वेड असेपर्यंत सांसारिक वातावरणात राहणे साहजिकच. पण संसाराची असारता पटल्यानंतर त्याचा त्याग करून ब्रह्मानन्दस्थितीप्रत जाण्यास कली आड येत नाही. वेड बरे झाल्यावर घरी जाणारास पोलीस अडवीत नाहीत त्याप्रमाणे विषयसुखाचे वेड सुटल्यावर ब्रह्मस्वरूपाकडे जाणान्याला कली आड येणार नाही. राजवाड्यात प्रवेश करताना राजास द्वारपाल अडवीत नाहीत. तसेच आत्मज्ञानी आपल्या स्वभावसिद्ध आत्मानंदात राहिले तर कलि काय करू शकेल ? झोप संपल्यावर स्वप्नदृश्याचे निराकरण करण्यास कली आड येत असल्यास निष्प्रपंच, निर्गुण व निराकार अखंड आनंदच ‘ब्रह्म’ आपण आहोत अशी जाणीव झाल्यावर अज्ञानरूपी स्वप्नात दिसलेल्या जीवभावाच्या दृष्यांचे निराकरण करण्यास कली आडवा येईल अशी भावना आत्मज्ञानप्राप्तीनंतर खोटीच ठरते. ह्यातील कलीची भावना व तिला गृहित असणारा कलिनिषेध संपूर्णपणे नाहीसा होत नाही का?
जसा बालपाठ्यक्रम प्राध्यापकास उपयुक्त नसतो त्याप्रमाणे विषयासक्तासाठी घातलेली बंधने विरक्त व विरागी आत्मज्ञानीस लागू पडत नाहीत. कलियुगात आत्मनिग्रही नसणाऱ्या सर्वसामान्य विषयी, अज्ञानी लोकांकरिता सांगितलेली विधिविधाने, नियम खऱ्या विरक्त, विरागी, ज्ञानी लोकांना लागू नसतात, झोप लागल्यावर हातातील फूल आपोआप हातातून खाली पडते त्याप्रमाणे विरक्त, वैरागी, ज्ञानी जनांची देहवासनाही आपोआप नाहीशी होते. त्याला कोणीहि अडवू शकत नाही. दुगंधीयुक्त स्थळ मनुष्य जितक्या सुलभतेने सोडतो तितक्याच सुलभतेने देहसुख सोडणे संभवनीय आहे. त्याला कली तरी काय करणार ? हा ‘राजा आहे’ असे समजल्यावर इतर कोणासहि राजा म्हटले जात नाही. त्याप्रमाणे ‘आत्मसुख हेच खरे सुख’ ही गोष्ट बिंबल्यावर इतर कोणत्याहि विषयोपभोगजनित आनंदाला ‘आनंद’ म्हणून म्हटले जात नाही. मानले जात नाही व त्याचा अनुभवहि घेतला जात नाही.
लहान मुलाच्या भातुकलीच्या खेळातील जेवणात जरी मुले मिटक्या मारीत पोट भरण्याचे नाटक करीत असली तरी कोणीहि भुकेला मनुष्य त्याच्या पंक्तीत भूक भागविण्याच्या इच्छेने बसत नाही त्याप्रमाणे अज्ञानी लोक निरनिराळ्या अनेक विषयसुखांचा आस्वाद घेत असले तरी आत्मसाक्षात्कार झालेला कोणताहि विरक्त, विरागी त्यांच्यामध्ये भाग घेत नाही. कलियुग असले तर राजहंसास मोत्याशिवाय दुसरा कोणताहि आहार चालत नाही त्याप्रमाणे विरक्ताला आत्मानंदाखेरीज कलियुगात इतर कोणताहि आहार नाही. चकोर चंद्राचीच अपेक्षा करतो तद्वत विरक्तास आत्मानंदाचीच अपेक्षा असते. चातक पक्षी जमिनीवरील पाणी न घेता पावसातल्या स्वच्छ पाण्याच्या थेंबांनीच आपली तहान भागवितो तसेच विरक्त, विवेकी जगातील विषयोपभोगांचा त्याग करून पवित्र अशा आत्मानंदाचेच सेवन करण्यास आतुर असतो, त्यासाठी कली आडवा येत नाही.
‘एतत्तदुत्तमं सत्यं यत्र किंचित्र जायते ।” एका आनंदस्वरूपाखेरीज इतर दुसरे काहीहि झालेले नाही असे समजून आले तरच आहे त्या स्थितीची जाणीव झाल्यासारखे होते असे मांडुक्यकारिकेत म्हटले आहे. ‘एतदेवविदित्वा मुनिर्भवति’ असे आत्मज्ञान झाल्यावर मनुष्य मुनी होतो ‘स जयतीमां लोकानू’ अशा प्रकारचा तो मुनि सर्वत्र विजयी होऊन सर्व मोहपाशावर विजय प्राप्त करतो. ह्या जगातील कोणतेहि सुख त्याला नकोसे वाटते. ‘एप नित्यो महिमा ब्राह्मणस्य । ब्रह्मनिष्ठांचा हा एक शाश्वत असा महिमा आहे. स्वतः शाश्वत आनंदस्वरूपच असताना अशाश्वत अशा जगातील क्षणिक सुख त्याला काय करावयाचे ? ‘एतमेव प्रब्राजिनो लोकमिच्छन्तः प्रव्रजन्ति ।’ अशा प्रकारच्या शाश्वत अशा आत्मानंदाचे साम्राज्य प्राप्त करून घेण्यासाठी विवेकी लोक जगातील क्षणिक अशी सर्व सुखे सोडून देऊन संन्यास धारण करतात. ‘विद्वांसः प्रजां न कामयन्ते । आत्मज्ञानी स्त्रीपुत्रादिकांची, संपत्तीची अपेक्षा करीत नाहीत. त्यांना कामादि कोणत्याहि विकारांची बाधा होत नाही. तमात्मानं विदित्वा ‘ब्राह्मणाः पुत्रेपणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैपणायाश्च व्युत्थायाथ भिक्षाचर्यं चरन्ति ।’ ह्या बृहदारण्यकाच्या वाक्यात ‘ब्रह्मविद् (आत्मज्ञानी) स्त्री, पुत्र, गृह, धन, जगातील सर्व सुखे सोडून संन्यास स्वीकारून प्राण धारणेपुरतेच भिक्षान्न ग्रहण करून समाधिसुखात मग असतात, असे म्हटले आहे. ह्या सर्व विवेचनावरून संन्यास हा एक विधि नसून आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या साधकांचा आणि आत्मस्वरूपांत मग्न असलेल्या सिद्धांचा अनादिकालापासून चालू असलेला, आजहि कार्यान्वित असलेला व पुढे अनंत कालपर्यंत चालू राहणारा शाश्वत असा स्वभावधर्मच आहे असे निश्चितपणे ठरते. हा विधि असला तरी एका विशिष्ट अवस्थेनंतर तो नाममात्रच असतो. ‘यन्मनसि वर्तते तद्बाचा तत् कर्मणा करोति ।’ असे समजून बाह्यरूपानें ‘संन्यस्तं मया’ असे म्हणण्यापूर्वीच आपल्या मनाने तो संन्यस्त झालेला असतो. मनात उद्भवलेले विचारच समोर ठेवून विधिनियमांचे पालन करणे हे शास्त्रपालन आणि समाजरचना टिकून राहावी ह्यासाठीच असते.
राहूने देवाच्या पंक्तीत शिरून अमृत प्राशन करण्याचा प्रयत्न केल्यासारखे राक्षसीवृत्तीच्या लोकांनी विरक्तांच्या पंक्तीत शिरून संन्यासदीक्षेचा स्वीकार करू नये. ‘रावण संन्यासी’, ‘बोके संन्यासी’, ‘वकध्यान’ हे शब्द रूढ आहेतच. सुभद्राहरणाकरिता अर्जुनाने घेतलेल्या वेषासारखा वेष कोणीहि धारण करू नये. ‘यदा मानसि वैराग्यं जातं सर्वेषु वस्तुपु । तदेव संन्यसेविद्वान् अन्यथा पतितो भवेत् ॥ (मैत्रेय्यु २-१९) देहादि भोगवस्तूंबद्दल मनातून वैराग्य उत्पन्न झाले आहे अशा आत्मज्ञानी अथवा आत्मज्ञानासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याने संन्यास स्वीकारणे योग्य आहे. अतिसाराची व्यथा असणारा दूध प्याला तर त्याचे अनारोग्य वाढते आणि भूक आवरता न येणाऱ्याने निर्जला एकादशीचा उपवास केला तर उपवासाने त्याची भूक वाढून चोरून खाण्याची प्रवृत्ति होते. त्याप्रमाणे विषयासक्त मन असलेल्याने संन्यास स्वीकारला तर तो भ्रष्ट होतो. क्रोधाने सज्जनांचा तेजोभंग करणारास, कामवशात पस्त्रियांना भ्रष्ट करणारास व वेश्यागमन करणारास मरणोत्तरहि सुख प्राप्त होत नाही. ते वाईट, दुष्ट, क्रूर, घोर ब्रह्मराक्षस होऊन त्या योनीतही स्त्रियांना सतावतात, त्रास देतात. मरणापूर्वी सर्वांचा मार खाण्यासारखेच ह्या योनीतहि महात्म्यांकडूनहि मार खातात. ह्या योनीत त्यांना हजारो वर्षांचे आयुष्य असते. संन्यास न घेतलेल्या मनुष्यानें परस्त्रीगमन केल्यास यमधर्म त्यास नरकयातना भोगावयास लावतो त्याप्रमाणेंच संन्यास स्वीकार करन स्त्रीगमन केल्यास त्यास इंद्र नरकयातना देतो. एवढाच त्यात फरक असतो. काम-क्रोधं नष्ट करूनहि द्रव्य, अन्न, वस्त्र ह्यासाठीच संन्यास ग्रहण केला तरी भ्रष्टता चुकत नाही. पण काम-क्रोध असणान्यासारखे हे लोक तितके क्रूर, घोर, नीच, ब्रह्मराक्षस न होता तारतम्यानुसार सौम्य योनीत जात. द्रव्याच्या लोभानें ते ब्रह्मराक्षस होऊन धनावर बसतात.
‘द्रव्यार्थमन्नवस्त्रार्थ यः प्रतिष्ठार्थमेव वा । संन्यसेदुभयभ्रष्टः स मुक्तिं नाप्नुमर्हति ।।’ असे मैत्रेयुपनिषदांत श्रीमहादेवाचे वचन आहे. (अ.२-२०) द्रव्य, अन्न, वस्त्र, प्रतिष्ठा ह्यांपैकी कशाची तरी अपेक्षा धरून संन्यासदीक्षा घेतली तर तो उभयस्थळी भ्रष्ट होऊन मोक्षास अपात्र ठरतो असा ह्या वचनाचा अर्थ आहे.
‘एहि वृत्तिं विहायैनां ब्रह्माख्यां पावनीं परम् । वृधैव ते तु जीवन्ति पशुभिश्च समा नराः ॥’ श्रेष्ठ आणि पावन अशा ब्राह्मीस्थितीला सोडून तो मनुष्य असून पशुसारखे व्यर्थ जीवन जगतो; असे तेजोबिंदू उपनिषदांत सांगितले आहे. पुढील श्लोकही संन्यासाश्रमाबद्दल असल्याकारणाने त्यांचाही येथें उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही. ‘एतां वृत्तिं विजानन्ति ज्ञात्वा वै वर्धयन्ति । ते वे सत्पुरुषायन्या वन्याः स्ते भुवनत्रये ॥’ जे ब्रह्मवृत्तीवें महत्त्व जाणतात व ते जाणून त्याची वाढ करतात ते सत्पुरुष धन्य होत. ते त्रिभुवनांत वंद्य असतात. एषां वृत्तिः समावृद्धा परिक्षा च सा पुनः । ते वै स ब्रह्मां प्राप्ता नेतरे शब्दवादिनः ।।’ ज्याच्यामध्ये अशा प्रकारची ब्रह्मवृत्ति बाढून परिपक्व होते त्यांनाच ब्रह्मसाक्षात्कार होतो. इतर नुसते शब्दावडंबर करणारेच असतात. नुसत्या तोंडाने ‘स्वयंपाक केला’ असे म्हणून भूक शमन होत नसते. त्याप्रमाणे अनुभव व अभ्यास नसलेल्या पुस्तकी ज्ञानाने मोक्ष मिळत नाही, ‘कुशला ब्रह्मवार्तायां वृत्तिहीनाः सुरागिणः । तेऽप्यज्ञानतया नूनं पुनरायन्त यान्ति दा | ब्रह्मनिष्ठा मुळीच नसता ब्रह्मज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगणारे लोक संसारचक्रात गुरफटले जाऊन पुन्हा पुन्हा जन्म घेतात; असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.
अन्ते मतिः सा गतिः । मरणकाली ज्या विषयात मन अडकले असेल त्याप्रमाणेच त्याला गति प्राप्त होते. पैशात मन गुंतले असल्यास मात्र त्यास सर्पयोनी मिळते. पाण्यावरील शेवाळे काढून न टाकता फक्त बाजूला सारले तर ते पुन्हा पाण्यास संपूर्णपणे आच्छादते त्याप्रमाणें मोहाचा संपूर्ण नाश न झाल्यास ड्रा विचाराद्वारे तात्पुरता दबलेला मोह पुन्हा आक्रमण केल्याशिवाय राहत नाही. शब्दस्पर्शादि अर्थच अनर्थ होत. विषयच जालीम विष ठरते. विष एकाच वेळी मनुष्यास मारीत असते तर विषय त्याला अनेक जन्मांत जन्म देऊन पुन्हा पुन्हा मारून टाकतो. निःसार असणाऱ्या विषयामध्ये मन जितके आसक्त असते, त्या मनास तेथून वळवून सारभूत असलेल्या आत्मसुखात तितकेच आसक्त बनविल्यास कोणाला मोक्ष मिळणार नाही ?
चित्त चिंतनरूपच. विषयाच्या चिंतनाने विषयकार असलेला संसार गळ्यात पडतो तर आत्मसुखाच्या चिंतनाने आत्मसुखरूपी अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. ‘देहन्यासो हि संन्यासो नैव कापायवाससा ।’ नुसते काषायवस्त्र धारण केल्यानें मनुष्य संन्यासी बनत नाही, तर देहमोहाच्या त्यागानेच तो खरा संन्यासी ठरतो; असे श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सांगितले आहे. ‘कर्मत्यागान्न संन्यासो न प्रेषोच्चारणेन तु । वृत्तिः सन्धी जीवात्मानौरैक्यं संन्यासः परिकीर्तितः ।।’ (मैत्रेयोप. २/१७ ) कर्मत्याग केल्याने अथवा ‘संन्यस्तं मया’ असा प्रेषगर केल्याने संन्यास होत नाही. एक वृत्ती नाहीशी होऊन दुसरी उत्पन्न होण्यापूर्वीच्या मध्यंतरात कोणताहि दृश्य भाव न राहता जी स्थिती कल्पनेच्या उत्पत्ति लयाचे मूळस्थान आहे त्या जीव ब्रह्मैक्यरूपाच्या निर्विकल्प, निष्पपंच असलेल्या एकमेव जाणिवेचा आनंदच आपण आहो असे समजून त्या स्थितीत राहणें अथवा राहण्याच्या अभ्यासात गुंतून राहणे ह्यालाच ‘संन्यास’ म्हणतात.
धनाच्या निधीला हात लावावयाचा नसतो. त्याच्या रक्षणासाठी देवतादृष्टी, भूत-पिशाच्च, सर्प जसे असतात, त्याप्रमाणेच आत्मप्राप्तीच्या मार्गात विघ्ने करण्यास विघ्नदेवता, दुर्गति प्राप्त पितृगण, मानवी जीवनात भ्रष्ट झालेले ब्रह्मराक्षस, भूतपिशाच्चादि दुष्ट योनीतील जीव, विषयलंपट मनुष्ये, प्रवृत्तीचा अभिमान बाळगणारा कांही अधिकारी वर्ग व कामक्रोधादि वृत्तीच्या अभिमानी देवताहि सर्व तयार असतात. चांगल्या मार्गावरून दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करणारी ही विघ्ने प्रवृत्ति व निवृत्ति ह्या दोन्हीही मागत असतात. ब्रह्मचर्य रक्षण करताना निवृत्तिमार्गात जशी विघ्ने येतात तशीच विघ्ने प्रवृत्तिमार्गात एकपत्नीव्रत किंवा पातिव्रत्य राखीत असता ते नष्ट करण्यास प्रवृत्त होतात. विघ्नाशिवाय जीवनच नाही. प्रवृत्तिमार्गात देखील तो मार्ग भ्रष्ट करणारी विघ्ने असतात असे म्हटल्यावर विघ्नाला भिऊन पवित्र असा निवृत्ति मार्ग का सोडायचा ? नीतिभ्रष्ट झाल्यानें प्राप्त होणाऱ्या ब्रह्मराक्षस, भूत-पिशा योनी, नरकयातना व कृमिकीटक, पशुपक्षी आदि नीच योनी ह्या निवृत्ती व प्रवृत्ती ह्या दोन्ही मार्गास एकाच प्रकारे असतात. पण मोक्षात साक्षात् साधन असणाऱ्या निवृत्तिमार्गात सत्यस्वरूपाचा बळकट आधार असतो. पण प्रवृत्तिमार्गातह तो नसतो. मोक्षसुख हेच जीवनाचे मुख्य ध्येय म्हटल्यावर बाल्यावस्थेपासून त्याची साधना का करू नये ? मोक्षासाठी संन्यास व वैराग्य हीच जवळची साधने असतांना गृहस्थाश्रमांतून संन्यास घेण्यापेक्षां ब्रह्मचर्याश्रमांतून संन्यास घेणेच श्रेयस्कर होय. चिखलाला स्पर्श करून बरबटलेले हात धूत बसण्यापेक्षां त्याला स्पर्शच न करणें शहाणपणाचे नाही का ? पाप करून प्रायश्चित्त घेण्यापेक्षां पाप न करणेंच योग्य नव्हे का ? Prevention is better than cure रोग जडल्यावर औषधोपचार करीत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काळजी घेणेच योग्य.
‘अकुर्वन विहितं कर्म निन्दितं च समाचरन् । प्रसक्तश्चेंद्रियार्थेषु नरः पतनमृच्छति । शास्त्रविहित कर्म न करणें, निषिद्ध व निन्दीत कर्मे करणें, इंद्रियविषयसुखात अडकून पडणे ह्या गोष्टींमुळे मनुष्य पतनाच्या मार्गाप्रत जातो. ही गोष्टहि प्रवृत्ति व निवृत्ति ह्या दोन्ही मार्गाना एकाच प्रकारे लागू आहे. निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ति उत्पन्न करून ती वाढविणेच कलियुगांत घडत असल्यानें, निषिद्ध कर्मफळ दोन्ही मार्गांनी जाणाऱ्या लोकांनाहि सारखेच लागू असल्यामुळे निषिद्ध कर्माच्या योगे ह्या दोन्ही मार्गातील लोकांना होणाऱ्या दुर्गति एकाच प्रकारच्या असल्याने कलियुगांत संन्यासाचा निषेध करणे उगीचच नाही का ? ह्या दोन्ही मार्गात सत्कर्मानुष्ठान, उपासना, आत्मविचार, भावी दुर्गतीची भीति ह्या द्वारे आपल्या सत्त्वबलानें कलीच्या आधीन न होता असंगतीने स्वतःस वाचविणें हें ह्या दोन्ही मार्गातील लोकांचे आपापल्या अधिकारानुसार कर्तव्य होय.
आपल्या नित्य जीवनांत डांस, मुंग्या, ढेकूण इत्यादींचा जसा त्रास होतो त्याप्रमाणे पारमार्थिक जीवनातहि ह्यांचा त्रास असतो. जीवनांतील कोणत्याहि कामांत लहान मोठी विघ्ने असतातच. त्यांचे आपल्या शक्ति युक्तीनें निवारण करून आपण आपली जीवननीका चालवीत असतो. त्याप्रमाणे पारमार्थिक जीवनातहि ह्या अडचणींना दाद न देता आपले चराबर विश्वाचें मूळ असलेला सत्यरूप आनंदच परब्रह्मतत्त्व आहे असे समजून पुढे चालले पाहिजे. सूर्योदयानंतर अंधकार व धुके नाहीसे होते त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर विघ्नापासून उत्पन्न झालेले विकार, आत्मरूपाच्या अज्ञानामुळे उद्भवलेल्या वासना अल्पकाळात आपोआप नाहीशा होतात. ‘पाण्यांत पूर्णपणे बुडालेल्यांना पावसावी किंवा थंडीची भीती कशाची ?” ह्या म्हणीप्रमाण अद्वितीय आनंदस्वरूपांतच ऐक्य पावलेल्यांना ह्या सगळ्या काल्पनिक प्रापंचिक गोष्टी स्पर्श करतील काय ? अज्ञानाच्या योगे उत्पन्न झालेल्या विषयवासनांनी किंवा विघ्नदेवतेपासून झालेल्या भोगप्रवृत्तींनी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करणे व देहभोगांतील क्षणिकता, शोक, दुःख, दुर्गंध, अपवित्रता ह्यांनी ह्या अनंत, अद्वितीय, नित्य आनंदस्वरूपाला नाहीसे करणे अशक्यकोटीतील आहे ना ? स्वप्नदृश्य नाहीसे करण्यास जागृत होणेच हैं जसे साधन आहे तसें आत्मस्वरूपावरील आवरणामुळे उद्भवणाऱ्या सर्व दुःखनाशासाठी एकमेव आनंदस्वरूपाचीच जाणीव होणें हेंच साधन.
ज्ञानप्राप्ती होणाच्या अगोदर स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव देहाकाराने दिसून विषय वासनेचा प्रभाव राहतो. पण ज्ञानोदय झाल्यावर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देहाकार नसून एकमेव आनंदरूपच असल्यामुळे तेथे विषयवासनेला वावच राहात नाही. ह्या आनंदस्वरूपाचा अनुभव एकसारखा स्थायिक झाला तरच ज्ञानसिद्धी झाली असे म्हणतात. हाच मानवी जीवनाचा परमोच्च ध्येयबिंदु होय.
हा आनंद कमी-अधिक असत नाही व कमी-अधिक होणाऱ्या कोणत्याहि गोष्टीपासून आनंदप्राप्ती होत नाही. आनंद म्हणजे भूत व वर्तमानकाली झालेल्या सर्व गोष्टींचा एक खरा आधार, अधिष्ठान किंवा कारण तात्पर्य, ज्याच्यासाठी सर्व जीव झटतात, जे सर्वांचे मूळ कारण तेच ह्या जीवांचे आय, सत्य व एकेमव आनंदरूप होय. आपले मूलरूप म्हणजे जगत्कारण ब्रहह्मच एकमेव आनंदरूप आहे. त्याच्या प्राप्तीसाठी उत्पत्ति-स्थित लय असलेल्या सर्वांचा त्याग करून त्या मूळ ब्रह्मस्वरूपांत रममाण होणें हें एकमेव साधन आहे असे समजणें ‘परोक्षज्ञान’ होय व त्याच्या परिप अभ्यासाच्या योगे आनंदामध्ये राहाणे हाच ‘आत्मसाक्षात्कार’ होय. ह्या आत्मसाक्षात्कारास ‘दृढापरोक्षज्ञान’ असे म्हणतात.
पाण्याच्या हालचालीमुळे त्यांत दिसणारे चंद्राचे प्रतिबिंब हलून त्याचे स्थितरूप दिसून येत नाही, तसेंच वृत्तीच्या चांचल्यतेने तिच्यांत •प्रतिबिंबित झालेली आनंदरूप आत्मज्ञानाची जाणीव चंचल होऊन त्याचे स्थैर्य अनुभवास येत नाही. अचंचल म्हणजेच न हलणान्या शांत पाण्यांत चंद्राचे प्रतिबिंब शांत आणि स्थिर दिसते, त्याप्रमाणे हृदयातून उद्भवणाचा आवरण – विक्षेपवृत्ति नाहीशा होऊन निश्चल, शांत आत्मानुभवाचा आनंद अनुभवास येणें हीच कृतकृत्यता होय. सुखासाठी भोग्य वस्तुद्वारे झालेल्या खोट्या संस्कारामुळे त्यांच्या प्राप्तीसाठी होणाऱ्या वृत्तींत भोग्य अशा दृष्ट वस्तूंच्या कल्पनेचा नाश होईल. आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे इष्टानिष्ट गोष्टी कळून येतील. ह्यातून झालेल्या रागद्वेषाचे परिणाम आपल्यावर झाल्याचा भास होईल. ह्या विषयसुख कल्पनेतील त्या त्या विषयांच्या इंद्रियांना चालना प्राप्त होत असतां आपल्या जाणिवेवर देहादींच्या अभिमानाचा विचार झाल्यासारखे दिसून येईल. विषयभोग्य वस्तूंचा तिरस्कार आणि विरोध ह्यापासून त्यांतील सुखाची भावना संपूर्ण नष्ट झाल्यावर उद्भवणाऱ्या कोणत्याहि संकल्प-विकल्पाचा परिणाम न होता क्रमेण निरभ्र आकाशासारख्या व स्वच्छ आरशासारख्या आनंदस्वरूपाची स्पष्ट जाणीवच सरतेशेवटी कायम राहील.
अनंत आणि कारणरूप असलेला हा आनंद अल्प काळात, अल्प कार्यात समावेश होणान्या पदार्थात किंवा कोणत्याहि पदार्थात कधीहि न आढळणे साहजिकच आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ ह्या प्रथम स्फूर्तीपासून शेवटपावेतों सर्व गोष्टी तारतम्यतेनें आनंद-स्वरूपाच्या आवरण- विक्षेपानेंच युक्त असल्यामुळे ह्या सर्वात नसणाऱ्या आनंदाच्या किंवा ब्रह्माच्या प्राप्तीसाठी ह्या सर्वांचा त्याग करावा लागणे साहजिकच होय, ‘तम् आसीत् ‘ (ऋग्वेद), ‘असदेवेदमग्र आसीत् ।” (कृ.यजु.) ह्या सर्व कार्यापूर्वी एक तम (अंधकार) म्हणजेच आनंदस्वरूपाची विस्मृति किंवा आवरण होते, असे श्रुतिवचन आहे. ‘अज्ञानमेवास्य हि मूलकारणम् ।’ ह्या रामगीतेतील वचनानुसार अज्ञान, अव्यक्त ही सुद्धां आवरण किंवा तमाचीच नांवे होत. ‘असत्’ हा शब्द ‘हें खरें नाही’ असे सूचित करतो. असेंच जीवेश्वर, जगद् आदि माया, विद्या इत्यादि सर्व संकेत एका आनंदस्वरूपाच्या आवरण- विक्षेपापासूनच. जसा दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणे असल्या कारणाने ह्या सर्वांचा लोप करूनचे उरणारे एकमेव आनंदस्वरूपच प्राप्त होणे साहजिकच आहे नाही का ? ह्या तत्त्वामुळेच विरक्ती उत्पन्न होते.
आत्मज्ञानी आपल्याला कदापि कोणत्याहि कार्यात अडकवून घेत नाही. सशाच्या शिंगाप्रमाणे ज्याकडून कोणतेच कार्य होत नाही त्याकडून आनंद होणे म्हणजेच आनंदप्राप्ती होय हा विचार कोणालाहि न पटणारा आहे. ‘यत्र नान्यत् पश्यति नान्यत् श्रुणोति स भूमा । भूमैव सुखम् ।’ असे श्रुति सांगते ना! ज्या अवस्थेत ऐकावयास व पहावयास व इतर कांहीही नसते तो परमात्माच भूमा किंवा ब्रहा. ते अनंत किंवा आनंदस्वरूपच एकमेव सुख होय. ‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म । ब्रह्म, भूमा असे म्हणविल्या जाणाऱ्या परमात्मस्वरूपापेक्षा भिन्न काहीही नसून, देहाच्या ठायी असलेल्या स्वगतभेदाप्रमाणें स्वगतभेदहि नसून जो ‘आनन्द ब्रह्म ।’ सदा सर्वकाळ एकमेव आनंदमात्रच असतो तोच ह्या सर्व जीवांचे यथार्थ रूप होय, असे श्रुति सांगून ‘स योऽह वै तत्परमं ब्रह्म वेद स ब्रह्मैव भवति ।’ जो कोणी त्या ब्रह्माची जाणीव करून घेतो तो ब्रह्मच होतो. अशी घोषणा करते नाही का ? त्या अखंड आनंदस्वरूपात इतर कोणताहि आभास नसताना ‘अहं ब्रह्मास्मि ।’ ह्या स्वरूपजाणिवेचा आभासच माया होय. ही माया त्याला काट्यासारखी बोचते म्हणून तिचा तिरस्कार करून निर्विकल्प राहिल्यास त्याला या देहाचे भान रहात नाही. अभिमान तर नाहीच नाही. ज्याप्रमाणे अमृतामध्ये विषाचे नामनिशाणहि नसते त्याप्रमाणे संसारामधील विषयवासना कामादि विकारहि त्याला किंचितहि असत नाहीत. ज्याला ईश्वराचे षडगुणैश्वर्यहि नकोसे वाटते त्याला असार अशा संसाराची काय पर्वा ? दूधच नको असेल तर त्यावरील फेसावी अपेक्षा कोण करील ? खऱ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणारा साधक त्या आनंदस्वरूपाशिवाय इतर सर्व बाबतीत विरक्त राहातो. आपल्या आनंदस्वरूप असलेल्या आत्मविचाराद्वारे त्याच्यात आपोआपच वैराग्य उत्पन्न होत असते.
सांसारिक जीवनातील अडीअडचणी, भास, खोटेपणा, राग, मोह, लबाडी, भोग, व्याप, कष्ट, आशा-आकांक्षा, आवड-निवड, कंटाळा, दुःख-शोक, आशा-निराशा, भय भीती, जनन-मरण इत्यादि संकटे यत्किंचितहि नसतात असा अतुलनीय आनंद म्हणजेच ब्रह्म हे खरे आहे, ह्याखेरीज इतर कांहीही नाही. ‘नास्त्यकृतः कृतेन ।’ (मुण्ड १-२-१२) कारणरूप असणारा आनंद कार्यजन्य किंवा कर्मजन्य असत नाही. जसें कोणत्याहि लाटेच्या अथवा तरंगाच्या योगाने समुद्राचे मोजमाप करता येत नाही, तद्वत् माया, अविद्यांच्या कोणत्याहि उपाधिद्वारे अथवा ईश-जीव ह्यांच्या भावनेने त्या अपार आनंदाचे मोजमाप करता येत नाही. म्हणजेच तो त्यांच्या कक्षेच्या बाहेरचा असल्यामुळे त्यांचा उपयोग होत नाही. जे घडलेच नाही ते घडलेल्या कोणत्याहि गोष्टीपासून प्राप्त होऊ शकत नाही. घडले जात नाही तें कारण व जे घडलें ते कार्य. कारणापासून कार्य घडतें पण कार्यापासून कारण घडत नाही म्हणून कारणरूप असलेले सुख कोणत्याहि कार्यापासून मिळत नाही. कार्याला कारणाची अपेक्षा असणे जसे साहजिकच असते तसेंच कारणाला कार्याची अपेक्षा नसणें हँहि साहजिकच आहे. हाच कार्य-कारण- विवेक.
‘आनन्दादेव खल्विमानि भूतानि जायन्ते । (तैत-३/१६) ह्या उपनिषद वचनावरूनहि एकमेव आनंदच सर्व जगसृष्टीस कारण असल्याचे स्पष्ट होते. दागिन्यासाठी सोन्याची अपेक्षा असते त्याप्रमाणे ह्या जगास कारणरूप असलेल्या आनंदरूप ब्रह्मस्वरूपाची अपेक्षा आहे. म्हणजेच सोन्याशिवाय जसा दागिना तयार होत नाही तसेव आनंदरूप नसेल तर जगच असणार नाही. ह्या दृष्टिकोनातून कार्यरूप जगाला कारणरूप असलेल्या आनंदाची अपेक्षा असणे साहजिकच आहे. तसेच कारणरूप असणाऱ्या आनंदस्वरूपास कार्याची अपेक्षा अथवा कोणतेहि प्रयोजन नसणेहि साहजिकच होय. दागिन्यापासून सोने उत्पन्न होऊ शकत नाही तसें ह्या जगदुरूपाच्या कोणत्याहि कार्यापासून आनंदस्वरूप कधीही उत्पन्न होऊ शकत नाही हे स्पष्ट होते. सोन्यापासून दागिने बनतात. दागिन्याकडून सोने बनत नसल्यामुळे सोन्यास महत्व असून दागिन्यास नाही. म्हणून सोन्याची प्राप्ती होणें जसें आवश्यक आहे तसेंच आनंदस्वरूपाच्या प्राप्तीलाही महत्त्व आहे. जगाकडून आनंदस्वरूप होत नसल्याने व आनंदस्वरूपाद्वारे जग उत्पन्न होत असल्याने आनंदस्वरूपासच महत्त्व आहे. जगांतील सुखाच्या प्राप्तीला नाही. सोन्याचे अस्तित्व दागिन्यांवर विसंबून नसते. दागिन्याशिवाय सोने असू शकतें पण सोन्याशिवाय दागिने कसे असणार ? आनंदस्वरूपाचे अस्तित्व जगाखेरीज असू शकते. जग नसले तरी आनंदस्वरूप असते. पण आनंदस्वरूपाच्या अधिष्ठानाशिवाय जग असू शकत नाही. दागिन्याचा आकार नाहीसा करून त्यांचे दागिना हे अस्तित्व नष्ट केलें तर सोनेंच शिल्लक राहते, पण सोनें नाहीसे केलें तर दागिन्याचे अस्तित्वच असू शकत नाही. त्याप्रमाणे जगांतील नामरूपत्व नाहीसे केल्यास सर्वाधार आनंदस्वरूपच उरते पण सर्वाधार असलेले आनंदस्वरूप नाहीसे केल्यास जगाचे अस्तित्व राहाणें मुळीच शक्य नाही. सोनार किंवा सराफ दागिन्यातील सोन्यास ‘तें सोनेच आहे काय ?” म्हणून कस लावून पाहातो तसेच आत्मज्ञानी सर्व प्राणिमात्रांत असलेल्या एकमेव अशा आनंदस्वरूपालाच पाहातो. सराफ दागिन्याची किंमत न करतां त्यातील सोन्याची किंमत करतो त्याप्रमाणे ज्ञानीहि नामरूपादि उपार्थीना महत्त्व न देतां त्यांत असलेल्या एकमेव आनंदस्वरूप असलेल्या आत्मस्वरूपालाच महत्त्व देतो. सर्व प्राणिमात्रांतील पंचकोशांतील असलेल्या परब्रह्मस्वरूपासच तो पाहातो. सोन्याची ओळख नसलेला मनुष्य सोने ठेवण्याच्या पेटीलाच सोने असे समजून तिची अपेक्षा करतो; त्याप्रमाणेंच आत्मस्वरूपाची ओळख नसलेला मनुष्य देहालाच आत्मा समजून त्याची उपेक्षा करतो व देहसुखाचीच इच्छा करतो. सोने प्राप्त करून न घेतां तें ठेवण्याची रिकामी पेटीच मिळविली तर जसें दारिद्र्य दूर होत नाही तसेंच देह अथवा देहसुख प्राप्त झालें तरी खऱ्या सुखाचे दारिद्र्य नष्ट होत नाही. म्हणजेच खन्या सुखाची प्राप्ती होत नाही. कार्य हे नेहमीच ‘अल्प’ असते तर कारण हैं ‘अनंत’, ही गोष्ट सर्वच जाणतात. मातीच्या भांड्याएवढीच पृथ्वी आहे असे म्हणणे जसें हास्यास्पदच ठरेल तसेंच कार्याएवढेच कारणहि आहे असे म्हणणें हास्यास्पदच. जगांतील सर्व मातीची भांडी एकत्र मिळविली तरी पृथ्वी मिळविल्यासारखे होत नाही. तसेच सर्व कार्ये मिळविल्याने कारणरूपाची प्राप्ती झाली असे म्हणणे हास्यास्पदच ठरेल.. शिवाय जगांतील सर्व गोष्टी प्राप्त करून घेणे अशक्यच. पण यदा कदाचित त्या मिळविल्या तरी सर्वांचा उपयोग एकदम एकाच वेळी घेता येत नाही. एक एक घास तोंडात जातो त्याप्रमाणे एक वेळेस एका इंद्रियाकडून एका विषयाचाच अनुभव घेता येतो. अनंत कोटी ब्रह्मांडामधील सर्व सुखे एकत्र करून त्यांचा दीर्घकाळ उपभोग घेत राहिली तरी कारणरूप आत्मसुखाच्या दृष्टीने ते अत्यल्प होत असल्याने एकाच वेळी एक अत्यल्प विषय एक क्षण भोगला तर केवढे सुख प्राप्त होणार ? डोळ्याने न दिसू शकणारे कृमिकीटक नाहीतच असे म्हटले किंवा समजले जाते, त्याप्रमाणेच विषयांतील सुख जमेस धरता येत नाही. विषयांत सुख नसून ते सुखापेक्षां अनेकपटीने जास्त दुःखरूपच असते, अशी श्रुति, स्मृति, पुराणें मुक्तकंठाने घोषणा करतात. I
‘विषं दृष्ट्वाऽमृतं दृष्ट्वा विषं त्यजति बुद्धिमान् । आत्मानमपि दृष्टवाऽहमनात्मानं त्यजाम्यहम् ||’ (आत्मप्रबोधन १६) विष व अमृत पाहून बुद्धिमान मनुष्य त्यामधील विषास स्पर्श न करता अमृतच सेवन करतो त्याप्रमाणे मी अनात्मरूप असलेली देहादि विषयसुखे सोडून आत्मरूपाच्या खन्या आनंदाचीच कास धरतो असे विवेकी मनुष्याचे म्हणणे आत्मबोधोपनिषदांत सांगितले असून ऐतरेय उपनिषदांत देखील ‘तद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः ।’ बुद्धिमान लोक सृष्टीचे मूळ कारण असलेल्या आनंदरूप ब्रह्माला सर्व सृष्टीमध्ये ज्ञानदृष्टीने पाहून त्याची सेवा करतात, असे म्हटले आहे. ज्ञान्यांचा हाच अनुभव बृहदारण्यकांत ‘एपोस्य परमानन्दः ।’ सर्व श्रेष्ठ अशा परब्रह्मस्वरूपाचा आनंदच ज्ञानी अनुभवतो, तोच त्याचा आनन्द, असे सांगितले आहे. चंद्र आपल्या शीतल किरणांद्वारे जगाला शांत करतो. तसाच ज्ञानीहि आपल्या आचार-विचार व गार यांच्या द्वारे आत्मानंद पसरवून जगाला शांत करतो. वैराग्याची पाणपोई व आत्मानंदाचे अन्नछत्र ही दोन्ही देह असेपर्यंत चालविण्यासाठी ज्ञानी बद्धकंकण असतो. बाह्य अन्नछत्राच्या स्थापनेत त्यांचे हेच उद्दिष्ट असते. ‘फवमप्रवेष्विह न प्रार्थयन्ते । (कठ. २/१/२). शाश्वत असणारा आनंद अशाश्वत अशा देह, इंद्रिये व इतर जागतिक भोग्य वस्तूंत कदाकाळीहि मिळणार नाही. हाच ज्ञान्यांचा जीवन सिध्दान्त आहे. आपण स्वतः ब्रह्मानंदाचा मनसोक्त अनुभव घेऊन तो इतरांना देण्याचा त्यांचा हट्ट असतो. निरनिराळ्या संवयी असलेल्या लोकांच्या संगतीत राहाणारास त्या संवयी सहज जडतात. त्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठांच्या संगतीत राहिल्यास विरक्ती-मुक्तीच्या सवयी सहजच लागतील यात शंका नाही. I
‘दुर्लभो विषयत्यागो दुर्लभं तत्त्वदर्शनम् । दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना ।’ सद्गुरुंच्या करुणेशिवाय विषयत्याग दुर्लभ आहे. तत्त्वदर्शन दुर्लभ आहे व सहज अवस्थाहि दुर्लभच होय. ‘सत्सङ्गो दुर्लभोऽगम्योऽमोघश्च लभ्यते तत्कृपयैव ।’ (नारद भ.सु.) ब्रह्मनिष्ठांचा सहवास दुर्लभ, अगम्य व अमोघ असून परमात्म्याच्या कृपेनेच तो प्राप्त होऊ शकतो. ‘श्रवणं तु गुरोः पूर्व मननं तदनन्तरम् । निदिध्यासनमित्येतत्पूर्ण बोधस्य कारणम् ॥’ आनंदच एकमेव आपले रूप आहे असे आपल्या गुरूमुखाने समजून घेऊन, त्यांनी सांगितलेल्या श्रुतिस्मृतींच्या उक्तीनें व विचारानें मनांत तो दृढ करून, त्या स्थितीत स्थिर राहण्याची संवय लागली तर आत्मानंदाच्या निर्विकल्प, समाधीचे ते साधनच होईल. ब्रह्मांडस्थावरांतील सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या सुखांमध्ये समाधिसुख हे अत्यंत महान् सुख आहे. किरीटकुंडले धारण करून हातात राजदंड घेऊन सिंहासनावर बसलेलाच राजा होय असे स्वानुभवाने एकवेळ ओळख पटल्यावर इतरास राजा म्हणून मानले जात नाही; तसेंच स्वयंपूर्ण असलेला एकमेव अद्वितीय असा खरा आनंदच एक यथार्थ सुख आहे असे सद्गुरुकडून शिकल्यावर स्वयं मुनी बनून तो इतर कोणाकडूनहि फसला जात नाही. ‘मुनिर्न व्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततम् ।’ I
तुम्ही सर्व आनंदच असून उमललेल्या कमलपुष्पाप्रमाणें आनंद सागरात सर्वजण आनंदात राहा !
‘आनंदघनरूपासि नित्यशुद्धासि स्वप्रभाम् । नित्यमंगलरूपासि ब्रह्ममात्र स्वभावतः ।।’
इति शम्!