Memories

१०. श्री सद्गुरुंच्या सहवासांत

श्रीमती लक्ष्मीबाई विंझणेकर, बेळगाव

आम्हा सर्वांची माऊली सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज आज दोन वर्षानी प्रगट होऊन दर्शन देणार ही वार्ता कानीं पडतांच केव्हां त्यांना डोळे भरून पाहूं यासाठी मन आतुर होऊ लागले. जीव व्याकुळ होऊ लागला. त्यासाठीच आम्ही उत्कंठित मनाने बेळगांवहून वद्दळ्ळीस निघालो. आम्ही मंगळवारी वद्दळ्ळीला पोचलो. पण स्वामीजी गुरुवारी दर्शन देणार होते. आतां हे दोन दिवस स्वामीजींच्या दर्शनाविना कसे काढावे ही मनाला चिन्ता लागली. एकएक क्षण युगासारखा भासू लागला. तो संपता संपेना. मनाची आतुरता तर फारच वाढली होती. तेथील खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम होती. परंतु खाण्यापिण्याकडे लक्ष लागेनासे झाले. कधीं तें माऊलीचं प्रेमळ मुख पाहीन याबद्दल उत्कंठित झाले होते. द्दळीच्या त्या अंबेचं देऊळ, जवळपास सुन्दर तलाव, मधून मधून बहातें खळखळ झरे, निसर्गाची शोभा फारच अवर्णनीय होती झऱ्याचा खळखळाट पाहिला म्हणजे तो देखील स्वामीजींच्या दर्शनासाठी उल्हसित होऊन खाली येत आहे असें वाटत होते. हे सर्व नयनरम्य दृश्य आम्ही सर्व बघत असलो तरी मनाची यत्किंंचितहि व्यकुळता, उत्कंठा थांबली नव्हती. कारण हे केवळ दिखाऊ सौन्दर्य होते. फक्त डोळ्यांना आनंद देणारे सौन्दर्य होते. परंतु जें सत्यसौन्दर्य आहे त्याचं आम्हांला अजून दर्शन घडलं नव्हतं. मनाची व्याकुळता शमवणारे, उत्कंठा थांबविणारे, मनाला हरण करणारे असें स्वामीजीचे दर्शन अजून आम्हांला घडावयाचें होतें आणि यासाठीच आमचे मन स्वामीजींच्या दर्शनासाठी उत्सुक होते.’

शेवटी तो दिवस एकदाचा उगवला. पहाटे डोंगर चढून आम्ही श्रीधरतीर्थाजवळ जाऊन स्वामीजींची अधीर मनाने वाट पाहूं लागलो. ज्या क्षणाची आम्ही गेले दोन दिवस अत्यंत उत्कंठेने वाट पहात होतो तो क्षण एकदाचा येऊन ठेपला. आपली माउली शिखरकुटीपासून श्रीधरतीर्थाजवळ आपला अभयहस्त वर उचलून हंसत हंसत प्रगट झाली. आमच्या आनन्दाला पारावार राहिला नाही. एक प्रकारच्या दिव्य आणि अपूर्व अशा आनन्दाने आम्ही न्हाऊन गेलो. जागोजागी रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या. मिरवणूक जी निघाली ती थेट अंबेच्या देवळासमोर थांबली. स्वामीजींंनी अंबेचं दर्शन घेतलं मग सज्जनगडावरून श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या पादुका आल्या होत्या, त्यांची त्यांनी यथासांग पूजा केली. नंतर जेवणाची तयारी सुरू झाली. हजारो लोकांच्या पंगती उठल्या. सर्वांना स्वामींनी स्वतः आपल्या हाताने तीर्थ देऊन कृतकृत्य केलें मला वाटले माझें सांवळे परब्रह्म, माझा श्रीराम, काषाय वस्त्र नेसून आमच्या सर्वांच्या उद्धारार्थ प्रगटला आहे. भक्तजनांची पहिली पंगत बसली त्या वेळी मी तलावांत स्नान करण्यासाठी जाऊन बसले. मला अजून स्वामीजींशी बोलण्यास मिळाल्याने उदास झाले होते. उदासीनता अती वाढली होती. पण तेवढयांत स्वामी एकदम माझ्या समोर ! मला गहिवरून आले. त्यावेळी ते मौनांत होते. तरी प्रेमभराने खुणेनेच मला जेव म्हणून सांगून ते निघून गेले, माझी उदासीनता एकदम नाहींशी झाली. मी स्नान करून जेवण केलें. जेवण जेवताना पुराणांत यज्ञाच्या वेळचे वर्णन वाचतो ऐकतो, ती जेवणावळ आठवली. ज्या अन्नावर स्वामीजींनी कृपादृष्टीने पाहिले तें अन्न जेवतांना मनांत अत्यानंद उचंबळला. चार वाजतां श्रीस्वामीजीनी प्रवचन करून मौन सोडले. पहिलं संस्कृत, दुसरं कन्नड तिसरं मराठी अशी प्रवचने झाली नंतर दर्शनासाठी लोकांची रीघ लागली. स्वयंसेवक होते तरी भक्तजन स्वामीजींचा आशीर्वाद अक्षता घेण्यासाठी एकापुढे एक जात होते. हे दृश्य दूर उभी राहून मी बघत होते. स्वामीजी हजारों लोकांना कंटाळतां आशीर्वाद अक्षता देत होते. मला वाटले हे जटाजूटधारी कैलासनाथ तर नव्हेत ना

श्रीस्वामीजीनी पांच दिवस दर्शन दिले. त्या दिवसांत त्यांच्या दर्शनासाठी मी तहानभूक सुद्धा विसरले. एक दिवस गाणी झाली. त्यांत एक कानडी गाणं फारच सुन्दर झालं. ज्याप्रमाणे तें संपूर्णपणे स्वामीजींच्या जीवनावर रचलेलं होतंरामायण लवकुशाने रामरायाला म्हणून दाखवलं अगदी त्याप्रमाणेच ऐकून सर्वांची मनें प्रसन्न झाली. मलाहि वाटले माझ्या स्वामींची मी पण गाणं म्हणून सेवा करावी बसल्या जागेवरून म्हणायला सुरुवात केली. त्याबरोबर स्वामीजी म्हणालेबाळ ये म्हण, ” माझ्या मनाला अत्यंत हर्ष वाटला मी गाणं म्हणून दाखविलं. लोकांनी मला वेडी ठरविली. श्रीस्वामीजींच्या दर्शनासाठी तळमळते म्हणून माझ्या गुरुमाउलीने मला बोलावून गाणं म्हणून घेतलं. मला जगाशी काय करायचं आहे नाहीं कां? जग कांहींही म्हणो.

ह्याप्रमाणे पांच दिवसांत हजारों लोकांच्या मनाला आनंद शांति, अनुग्रह देऊन साऱ्यांची उत्कंठा शमवून स्वामीजींनी साऱ्यांंना योग्य मार्ग दाखविला. जेवणावळी उठतांना मला वाटायचं राजा धर्माचा अश्वमेध यज्ञ की काय? इतकं मुक्तहस्ताने अन्नदान चालू होतं. स्वामींच्या राज्यांत गरीबश्रीमंत, उच्चनीच सर्व एक होते. तिथे भेद नव्हता. ज्याला लोकांनी कमी मानलं त्याला जवळ घेऊन स्वामीजी आईचं प्रेम देत होते

प्रवचनांनी त्यांनी योग्य मार्ग दाखविला. त्या मार्गाने जाणे आमचे काम, कर्तव्य. सर्वांच्या मागे आधार आहे स्वामीजींचा. ह्याप्रमाणे पाच दिवस कसे गेले कळलेसुद्धा नाही. सहाव्या दिवशी स्वामीजी सर्वांना प्रसादरूपी अक्षता देऊन, सर्वांना तृप्त करून पहाटे साडेसहा वाजता फिरून जगाच्या कल्याणासाठी आणखी एक वर्ष एकांतात तपाला बसले आणि आम्ही एक प्रकारचा दिव्य आणि अपूर्व असा आनंद मिळवून, स्वतःला धन्य समजून परतलो.

home-last-sec-img