Memories

१३. प्रापंचिकांसाठी गुणकारी औषध

डॉ. एस. श्रीपादराव बापट, सागर

सांप्रत कालांत भौतिक शास्त्रीय प्रगतीमुळे कोणत्याच प्रकारे शांति निर्माण होऊ शकली नाही. उलट ती भयप्रद अशा संकटाची पूर्वतयारीच आहे. मोठी बलवान राष्ट्र आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन मात्र करीत आहेत.

सर्व प्रकारचे विचारप्रवाह (वाद) स्वार्थ अहंकाररूपी राक्षसांची शिरे आहेत. प्रत्येक विचारप्रवाहाने प्रत्येक प्रश्न कूटप्रश्न केला असून त्यातून जास्त भांडणेच निर्माण झाली आहेत. स्वतःस स्वयंसिद्ध समजणारे समाजसेवक लोकांना सुधारविण्याच्या प्रयत्नाच्या नावाखाली धर्माधिष्टित रीतिरिवाजांत ढवळाढवळ करीत असून त्यामुळे जनतेतील नीतिमुल्ये संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. मात्र ही तथाकथित सुधारणा जनतेस कोणतेंच नवीन नीतिमुल्य देऊ शकली नाही. दुसऱ्यांना सुखी करून शांतता प्राप्ति करून देणाऱ्यास स्वतःच त्या गोष्टी प्रथम मिळविणे अवश्य आहे. शांति सुख यांची प्राप्ति फक्त ऋषिमुनींनाच प्राप्त झाली होती असे ऋषिमुनी या भारतवर्षांत प्राचीन काळापासून अवतरले असून आजहि ते जगांमध्ये मानवजातीचे कल्याण व्हावे यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.

अशाच प्रकारचे व्यक्तित्व आपणांस श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीश्रीधरस्वामीमहाराज यांच्या ठिकाणी सापडते. आज ते म्हैसूर राज्यांतील शिवमुग्गा जिल्ह्यांतील सागर तहशिलीतील वरदपूर या गावी वरदगिरी या डोंगराच्या शिखरावरील एका कुटीत तप करीत आहेत. अक्रोध, वैराग्य, जितेन्द्रियत्व, दया, क्षमा, शांति, जनप्रियत्व, निर्लोभीपणा, दातृत्व भयशोकवरण ही ज्ञान्यांची दहाहि लक्षणे त्यांच्याठायीं वास करितात. ते या पृथ्वीतलावरील परमेश्वरच होत. त्यांच्यापुढे अखिल जगत तृणवत् आहे. त्यांना सुवर्ण मृत्तिका सुख आणि दुःख समानच आहे.

ते परमेश्वरमय आहेत, ते परमेश्वरस्वरूप आहेत इतकेच नव्हे तर ते परमेश्वरच आहेत. आपल्या कल्याणाचा शांततेचा एकमेव मार्ग म्हणजेच आपण त्यांच्या पायाशी शरण जाणे हाच होय हीच या विश्वाच्या कल्याणाकरितां करावयाची सेवा.

home-last-sec-img