Memories

१९. नाग निघून गेला

ही घटना श्रींनी संन्यासदीक्षा घेण्यापूर्वीची म्हणजे साधारणपणे शके १८६० मधील असावी. सज्जनगडावरील श्रीसमर्थस्थापित श्रीअंग्लाई देवीच्या मंदिरांत पूजा करण्यासाठी गुरव गेला असतां, श्रीदेवीच्या मस्तकावर नाग बसलेला दिसला. गुरव पुढे आलेला दिसला की, तो नाग फुत्कार करीत असे. हे पाहून तो गुरव श्रीस्वामीजी जेथे रहात होते, त्या चिरमुरे यांच्या मठात आला आणि त्याने वरील हकीगत श्रींना सांगितली. नन्तर त्यांच्यासह आम्ही मन्दिरांत गेलो. श्रींनी देवीची प्रार्थना केली, व देवीचे वस्त्र बाजूला करून हळद-कुंकू वाहून फुलें वाहिली आणि एका भांड्यांत दूध भरून पुढे ठेवले व त्याचा नैवेद्य दाखवून देवींची प्रार्थना केली की, “तु सकल विश्वाची माता आहेस, हा लहान मुलगा आहे. त्याचे काही चुकले असेल तर क्षमा कर. त्याचे अपराध पोटांत घाल !” व दार लावून घेतले. साधारणत: १०-१५ मिनिटांनी दार उघडून पाहिले तेव्हा दुधाचे भांडे रिकामे झाले असून तेथून नाग अदृश्य झाला होता.

– श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०१)

home-last-sec-img