Memories

२१. श्रीगुरुमाऊलींची प्रथम भेट

चि. गं. वाघोलीकर

आमच्या घरानजीकच्या श्रीगणपती मंदिरांत यज्ञ चालू होता. मी रोज गणपतीदर्शनास जावयाचो त्याप्रमाणे सकाळी ११ वाजता गेलो. यज्ञ चालू असतानाच एक साधुमहाराज तेथे आले व सर्वत्र धांवपळ झाली. ‘स्वामी आले, स्वामी आले’ असा गलका झाला. मी त्यावेळी प्रदक्षिणा घालीत होतो. सर्वजण साधुमहाराजांच्या दर्शनासाठी गडबड करीत होते. ढकलाढकली चालू होती. मी हे दृश्य शांतपणे पाहिले व मीहि सर्वांप्रमाणे त्यांना नमस्कार केला. माझी आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली आणि काय झाले कोण जाणे, माझी छाती भरून आली. त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. मनस्थितीत फरक पडून त्यांच्याबद्दल एक प्रकारची ओढ निर्माण झाली. नंतर ते यज्ञाच्या ठिकाणी गले व तेथे त्याचे आशीर्वादपर भाषण होऊन सर्वाना आशीर्वाद दिल्यावर ते मोटारीतून निघून गेले. इकडे माझी तळमळ वाढू लागली. आपणास हे साधुमहाराज कोठे भेटतील, कसे भेटतील? असा विचार आला. तेथील एकास ‘हे साधु कोण होते? असे विचारले तेव्हा ‘हे श्रीधरस्वामी, सज्जनगडावर असतात. फार मोठे संत-महंत आहेत. पुष्कळ लोक त्यांना ‘प्रतिरामदास’ म्हणून ओळखतात.’ असे सांगितले. माझी जिज्ञासा वाढत होती. ‘ते केव्हा व कोठे भेटतील’, हे विचारले. ‘ते ब्राह्मणसभेत उतरले, त्यांच्या तेथे चौकशी करा’ असे उत्तर मिळाले मी तसाच तडक ब्राह्मणसभेत गेलो, तेथे सर्वशांतता होती. तेथे चौकशी करता त्यांनी ‘आता ते नाहीत व कोठे गेलेत ते माहित नाही’ असे सांगितले, ऐकून विरस झाला. तेवढ्यांत शुभ्र वस्त्र परिधान केलेला स्वामींचा एक शिष्य दिसला. त्याला हात जोडून ‘मला श्रीधर स्वामी भेटतील का?’ म्हणून विचारलें तो जरा का कू करीत होता. मी म्हणालो ‘मला त्यांचे दर्शन घ्यावयाचे आहे. भेटावयाचे आहे’ माझी जिज्ञासा व तळमळ पाहून त्याने सांगितले की ‘स्वामी दादरला पाद्यपूजेला व भिक्षेला गेले आहेत. मला दादरचा पत्ता माहित नाही, पण संध्याकाळी ६ वाजता ते बाबूलनाथ मंदिरात दर्शनास जाणार आहेत. तेथे भेटले तर बघा. तेथून मग ते कनकेश्वरला जाणार आहेत. आता इकडे येणार नाहीत.’ ‘मनाला वाईट वाटले, स्वामी भेटतील की नाही या विचारांत दुपारचा एक वाजला. खिन्न मनाने घरी गेलो, जेवणाची इच्छा नव्हती पण कसा बसा जेवलो. पण मन विचलितच होते. विचार करता करता झोप लागली. 

झोपून उठलों तो पाच वाजले होते. ताडकन उठून तोंड धुवून चहा घेतला व झटपट कपडे घालून एखाद्या वेड्यासारखा भटकल्या मनाने धावत पळतच बाबुलनाथ मंदिराच्या पायथ्याशी पोहोंचलो. तेथील आजुबाजूच्या लोकांना विचारले ‘इथे श्रीधरस्वामी महाराज आले काय?’ पण सर्वांनी ‘माहित नाही’ असे सांगितले. वाईट वाटले, दम लागला होता, पण तसाच एकदम वर पायऱ्या चढून धावतच मंदिरात गेलो. तेथेही सर्वांना वेड्यासारखे विचारले की, ‘स्वामी महाराज आले का?’ पण तेथेहि ‘पाहिले नाही’ म्हणून उत्तरे मिळाली. ते ऐकून मन खिन्न झाले, तसाच परत धावत पळत पायऱ्यावरून उड्या मारीत खाली आलो तो तोच समोर मोटारीमधून स्वामी महाराज उतरत होते. तसाच धावत जाऊन स्वामींच्या चरणकमलावर डोके ठेवले. साष्टांग नमस्कार घातला. एकदम सर्व शांत शांत वाटले. स्वामींनी दोन्ही हातांनी उचलून उभे केले आणि ‘बाळ, किती दम लागला तुला’ असे म्हणून ते माझ्या पाठीवर हात फिरवीत राहिले. उजव्या हाताने माझ्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरविला व शांत हो बाळ, शांत हो’ असें म्हणत होते. शरीर एकदम हलके हलके वाटत होते. डोळयातून अश्रुधारा वाहात होत्या स्वामींनी ‘बाळ तू केव्हा आलास? असे विचारताच, ‘आताच आलो’ असे उत्तरलो. ‘चल बाळ, आपण देवदर्शनाला जावू’ म्हणून स्वामींनी मला आपल्या बरोबर घेऊन पायऱ्या चढण्यास सुरवात केली. माझे मन शांत होते. पाहिजे ते मिळाले होते. एका वेगळ्याच आनंदात होतो. 

स्वामींच्या बरोबर पायऱ्या चढत वर जात होतो. स्वामींनी विचारले ‘बाळ, तुझे नाव काय?’ मी एका दमात सांगितले ‘माझे नांव चिंतामण गंगाधर वाघोलीकर’. ‘तुझ्या घरी कोण कोण आहेत?’ ‘आई, वडील व पांच भाऊ’ मी उत्तरलो‘वडील काय करतात?’ ‘पोस्टांत पोस्टमास्तर म्हणून काम करतात’. ‘आणि तू काय करतोस?’ ‘मी प्रेस कॅनव्हासिंग करतो’ असे उत्तर दिले. इतक्यात आम्ही बाबुलनाथ मंदिरापाशी आलो. स्वामींच्या बरोबर तेथील सर्व देवांची दर्शने घेतली, तो पावेतो ७ वाजून गेले होते. काळोख पडावयास लागला होता दर्शन झाल्यावर हळू हळू खाली येऊ लागलो. पायऱ्या उतरत असताना स्वामी इकडे तिकडे बघत होते. परत त्यांच्या मनात काय आले कोण जाणे पण त्यांनी माझी परत चौकशी करण्यास सुरवात केली, ‘तू मला भेटावयास येथे का आलास?’ या त्यांच्या प्रश्नास मला उत्तर देता आले नाही. मी स्तब्ध राहिलो. मग ते म्हणाले ‘तुला काय हवे?’ तेव्हा मी त्यांना सांगितले की, ‘मी आपलें सकाळी फडकेवाडीत गणपतीमंदिरांत दर्शन घतले, आपणाबद्दल ओढ लागली म्हणून ब्राह्मणसभेत गेलो. तेथे कळले की आपण संध्याकाळी येथे येणार, म्हणून आपले दर्शन घेण्याकरतां आलो. मला आपला आशीर्वाद पाहिजे आहे’. तेव्हा ते म्हणाले, ‘कसला आशीर्वाद?’ मी परत स्तब्ध राहिलो. माझे मलाच काय उत्तर द्यावयाचे कळले नाही. मी फक्त स्वामींच्याकडे बघत राहिलो, एकदम वेड्यासारखा…. माझी ही परिस्थिती पाहून स्वामी हसले व माझ्या गालावर हळूच चापट मारली व म्हणाले ‘वेडा कुठला ! चल माझेबरोबर कनकेश्वरला येतोस काय ? मी तुला माझ्या बरोबर नेतो’ पण त्यावेळी मी त्यांना सागितले की ‘मी घरी आईवडिलांना सांगितले नाही. कसा येऊ?’ स्वामी हसले व म्हणाले ‘मी परत ४-५ दिवसांनी वैद्यवाडीत लळीतांकडे येणार आहे. तेथे मला भेट. मग बघू’. स्वामी आतां जाणार ! मन परत बेचैन झालं. साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या पायावर डोके ठेवलें. तोच अश्रुधारा पाझरू लागल्या. स्वामींनी उठविले व ‘बाळ वेडा आहेस का? असे करूं नको’. मी लवकर येतो, जा शांत हो.’ असे म्हणून त्यांनी मला कुरवाळले. माझ्या पाठीवर हात फिरवीत मोटर पर्यंत आले आणि ते मोटारीत बसले. मी फक्त हात जोडून उभा राहिलो वेड्यासारखा बघत, मोटार सुरु झाली. स्वामी म्हणाले, ‘बाळ, घरी जा. लळितांकडे ये’ आणि मोटार दूरदूर जात दिसेनासी झाली. मी शांत मनाने घरी आलो. आई वडिलांना झालेला प्रकार सांगितला. त्यांना आनंद झाला. घरातील वातावरण नवीन आनंदमय झालें. नंतर मी जेवलो व त्या दिवशीच्या आठवणी उराशी घेऊन शांत झोपी गेलो. झोप केव्हा लागली ते कळले नाही.

झाले ! मधले ४-५ दिवस कधी गेलें कळलेच नाही. रोज चौकशी करीतच होतो. स्वामी आल्याचे कळले आनंद गगनात मावेना. पण कळून सुद्धा भेट झाली नव्हती. खिन्न मनाने वाट पहात होतो. संध्याकाळचे पांच वाजले होते. तेवढयांत एक पांढरी गाडी आली व ‘स्वामी आले. स्वामी आले’ म्हणून धावपळ सुरू झाली. मी पण पुढे गेलो आणि माझी व स्वामींची पुन्हा भेट झाली. मनांतील तळमळ शांत झाली. त्यांच्या पायावर डोके ठेवले. अंग अगदी हलके वाटू लागले. शिष्य मंडळी पुढे झाले व सर्वांना बाजूला सारीत  स्वामींना वाट करून दिली. स्वामी मौनी महाराजांच्या देवळांत गेले. हळूहळू गर्दी कमी झाली. पण मी तेथें तसाच बसून राहिलो. थोड्या वेळाने त्यांचा एक शिष्य दिसला. त्याला विचारले की, ‘स्वामी केव्हा भेटतील?’ तो म्हणाला, ‘स्वामी स्नानाला गेले आहेत. रात्रीं प्रवचनाला नऊ वाजता जातील तेव्हा भेटतील’. मी घरी जाऊन जेवलो व आईला ‘मी प्रवचनाला जातो. माझी वाट पाहूं नका’ असें सांगून परत मौनीमहाराजांच्या देवळात  स्वामींची वाट पहात बसून राहिलो, अगदी गुपचूप !

झाले, स्वामी बाहेर आले. त्यांनी मला बघतांच ‘केव्हा आलास?’ असे विचारले. मी ‘मघाशींच आलो’ म्हणालो. त्यांच्या बरोबर लक्ष्यांत होते. तें पूर्वीचे मला दिलेले आश्वासन. ‘चल, आतां आपण प्रवचनाला जाऊं’ असे म्हणून ते मला आपल्याबरोबर प्रवचनाला घेऊन गेले. मी प्रवचन संपेपर्यंत थांबलो. नंतर सर्व दर्शन करून निघून गेले व स्वामी परत देवळात जाण्यासाठी निघाले. मी स्वामींना नमस्कार केला व स्वामींकडे बघितले. मनाला वाईट वाटत होते. आता परत घरी जावयाचे व फक्त आपण एकटेच. हात जोडून स्वामींच्या समोर उभा राहिलो. दृष्टादृष्ट होताच स्वामी म्हणाले ‘बाळ, उद्या सकाळी ७ वाजता आंघोळ करून ये. येतांना सोवळेहि आण, ‘एकीकडे स्वामींनी उद्या बोलावलं म्हणून आनंद होत होता तर दुसरीकडे आता घरी जावयाचे म्हणजे  स्वामींपासुन दूर जावयाचे म्हणून दु:ख वाटले. स्वामी मोटारीत बसताच सर्वांनी ‘जयजय रघुवीर समर्थ’ म्हणून जयजयकार केला. सगळीकडून एकच निनाद उठला. नंतर ‘श्रीमत् भगवान श्रीधरस्वामी महाराजकी जय’ हा जयघोष झाला व गाडी सुरूं होऊन हळूहळू दिसेनाशी झाली. मी खिन्न मनाने घरी निघालो, सर्व आठवणी बरोबर घेऊनच. घरी आलो तो रात्रीचा एक वाजला होता. हात पाय धुतले. मी एका निराळ्याच आनंदात होतो आणि गादीवर पडलो तो केंव्हा पहाटे बरोबर पांच वाजतां दूधवाला येतो त्यावेळी जागा झालो. नळाला पाणी आले होते. मी एका निराळया धुंदीत होतो. सर्व विधी उरकले. स्नान केले व देवपूजाहि केली. तो पर्यंत साडेसहा वाजले होते. माझे घडयाळाकडे लक्ष होतेच. मन मात्र स्वामींकडे होते. चहा प्यायलो आणि  स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सोवळे घेऊन बरोबर ७ वाजतां मौनीमहाराजांच्या मठांत हजर झालो.

सभामंडपात गर्दी होतीच, आता काय करावे ? स्वामींना कसे भेटावे या विवंचनेत होतो. मार्ग मिळत नव्हता. तेवढ्यात कालचाच स्वामींचा शिष्य भेटला. त्याच्याकडे जाऊन आज्ञाधारकाप्रमाणे हात जोडून म्हणले, ‘मला  स्वामींनी आतां बोलावले आहे.’ त्याने ‘कशाकरता?’ असे विचारले. मी म्हटले ‘मला माहित नाही. मला फक्त सोवळे घेऊन येण्यास सांगितले आहे.’ अर्थात  स्वामींच्या मनात काय होते ते त्याला कळलेले दिसले. त्याने मला ‘मागच्या बाजुला लळितांकडे ये. तेथे स्वामी आहेत.’ म्हणून सांगितले मी मागे गेलो आणि सरळ साष्टांग नमस्कार केला.  स्वामींनी मला बघीतले व म्हणाले, ‘बाळ आलास?’ मी मानेनेच होकार दिला. कारण मन आनंदाने भरले होते. ऊर भरून आला त्यामुळे शब्दच फुटेना ! एका नव्याच धुंदीत होतों !

शिष्याने सांगितले की कपडे तिथे काढून ठेवून सोवळे नेस. मी झटपट तसे केले व आता पुन्हा श्रींचा सहवास मिळणार या मस्तीत होतो. एकदम आनंदीत ! निराळ्याच मस्तीत !!

स्वामी स्नानाला गेले. मी तेथेच होतो. शिष्याला हळूच म्हणलो ‘कांही काम असल्यास सांग’ कारण त्यांची माझी आता चांगलीच मैत्री जमली होती. स्वामी स्नान करून दुसऱ्या मजल्यावर गेले व मीहि त्यांच्या बरोबर गेलो. स्वामींचे आन्हिक झाल्यावर त्यांनी मला समोर बसविले व म्हणाले ‘बाळ, काय पाहिजे बोल.’ ‘मी याबाबतीत अज्ञानी आहे. मला काही माहीत नाही. आपण बोलावले व मी आलो !’ हे उत्तर ऐकून स्वामी एकदम खदखदून हसले. मी मात्र बावळटासारखा हात जोडून समोर बसून राहिलो. शेवटी  स्वामींनी कमंडलूमधून लहान्या झारीत पाणी घातले व त्याची धार धरून त्या धारेकडे बघत राहिले. पाणी संपल्यावर पुन्हा पाणी घेतले व धार सोडून बघत होते. मग ते मला म्हणाले, ‘मी तुला अनुग्रह देणार आहे.’ मी म्हणालो, ‘कसला?’ ते परत माझ्याकडे बघून हसले व म्हणाले ‘तुला राम उपासना लाभदायी आहे.’ मी गप बसलो. नंतर त्यांनी मला रामाचा अनुग्रह दिला. मी धन्य झालो. एकदम खुशीत होतो. मग स्वामी म्हणाले ‘मी ३-४ दिवस येथेच आहे. तुला काही कामें आहेत का?’ मी पटकन ‘नाही’ म्हणालो. ‘माझ्या येथेंच रहा. काही काळजी करूं नको.’ मी ‘चालेल’ म्हणालो. ‘आतां तुझी जबाबदारी माझ्यावर’ मला त्याचा अर्थ न कळल्यामुळे मी बावळटासारखा बघत राहिलो. स्वामी उठले, मला उठविले व माझ्या दोन्ही गालावर हात ठेवत म्हणाले ‘बावळट रे बावळट’ काही समजत नाही. चल खाली.’ मी  स्वामींबरोबर खाली येऊ लागलो तेवढयात स्वामींनी खूण केली की तो कमंडलू घेऊन ये.  स्वामींच्या हातात चांदीची झारी होतीच. मी कमंडलू घेतले व स्वामींच्या मागें स्वामींच्या छायेंत हळु हळू खाली आलों. खाली पुष्कळ भक्तमंडळी स्वामींची चातकाप्रमाणे वाट पाहात होती. पण माझ्यासारखा भाग्यवान मीच होतो. मला धन्यता वाटत होती. जीवनाचे सार्थक झाल्याच्या समाधानांत होतो ! धुंदीत होतो !!

असे म्हणतात की गुरू आपणहून चालत येतात, आपली तयारी हवी, तळमळ हवी. हेच खरे. धन्य ती माझी गुरूमाउली आणि मी तिचा शिष्य !

home-last-sec-img