Memories

२२. माझ्या जीवनातील महान घटना

चि. गं. वाघोलीकर

स्वतःला मी भाग्यवान समजतो. कारण माझ्यासारख्या पामरास श्रीस्वामींनी अनुग्रह देऊन मला ‘माझा’ म्हटले आहे. श्रींच्या सांगण्यावरून मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हां तेव्हा स्वामींच्याकडे मी जात असे. कधी २ दिवस तर कधी ४ किंवा ८ दिवस पण मी तेथे राहात असे. त्या काळांत मला स्वामींच्या सान्निध्यांत रहावयास मिळे व जवळून त्यांची सेवा करण्याची संधीहि प्राप्त होई. एकदां स्वामींनी मला विचारले की, ‘बाळ? तूं काय करतोस?’ त्यावर ‘मी प्रेसकॅन्व्हासिंग करतो’ असें म्हणालो. तेव्हा ते म्हणाले ‘प्रेस कॅन्व्हासिंग म्हणजे काय?’ मी म्हणालो, “एखाद्या ऑफीसमध्ये जावयाचे व त्यांना ‘मी प्रिंटिंगचे काम करतो. आपणाकडे काही छापावयाची ऑर्डर असल्यास मला द्या’ असे सांगावयाचे आणि निरनिराळ्या लोकांना भेटून त्यांच्याकडे छापावयाचे काम असल्यास ते घेऊन कोणत्या तरी छापखान्याकडून करवून घेऊन ते त्यांना नेऊन द्यावयाचे. यांत मला ५ ते १० टक्के फायदा होतो. या शिवाय मी काहीही करीत नाही.” हे ऐकून स्वामीजी म्हणाले, ‘तू तुझा छापखाना कां काढत नाहीस?’ तेव्हा मी म्हणालो, “स्वामीजी ! मजजवळ पैसे नाहीत. वडील पोस्ट मास्तर होते ते निवृत्त झालेत. थोडे फार पैसे आले त्याची लोकांची देणी होती ती देऊन टाकली. त्यामुळे त्यांच्याकडेहि पैसे नाहीत.” स्वामीजींनी, ‘प्रेस काढण्यास किती पैसे पाहिजेत?’ असे विचारतांच मी, ‘स्वामीजी ! आपण मला पैसे देण्याऐवजी आपला आशीर्वाद द्या म्हणजे माझा छापखाना होईल’ असे म्हणालों. हे ऐकून स्वामीजींनी माझ्या गालावर चापट मारून ‘वेडा रे वेडा !!’ म्हणत मला जवळ घेतले आणि म्हणाले, ‘बाळ! होईल हो तुझ्या मालकीचा छापखाना. तुला काहीहि कमी पडणार नाही. मग झाले ना !!’ मला एकदम आशीर्वाद मिळाल्यांने गहिवरून आले व दोन्ही डोळयातून आनंदाश्रु वाहू लागले. मी स्वामीजींच्या पायावर डोके ठेवलें. मला दोन्ही हातांनी उठवून ‘बाळ, शांत हो !’ म्हणून पाठीवर हात फिरवून स्वामीजींनी मला शांत केलें.

तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा वा ठेवू नका, पण आज माझा स्वतःच्या  मालकीचा प्रेस आहे. अडी अडचणी येतात पण त्या श्रींच्या आशीर्वादाने निवारल्या जातात.

मला पहिले मशिन घेण्यासाठी एका बंगाली माणसाने कोणत्याहि प्रकारे लिहून न घेता अकराशे रुपये रोख दिले व ते मी हप्त्याहप्त्याने परत केले. पण त्याने मजकडून व्याज म्हणून पैसे घेण्यास नकार दिला. त्याला, ‘मी तुझे पैसे इतके दिवस वापरलेत त्यासाठी काहीतरी व्याज घेतलेच पाहिजें’ असे मी आग्रह करू लागलो. शेवटी त्याने माझ्या समजुतीसाठी फक्त अकरा रुपये घेतले.

अशा प्रकारे एक, एक मशीन करून तीन मशीन व छापखान्याची जागा श्रीसद्गुरुमाउलींच्या आशीर्वादानेच माझ्या मालकीची झाली. श्रीगुरुमहिमा अगाध आहे. ‘श्रीधरसद्गुरु माझें आई । मजला ठाव द्यावा पायी ।’

– श्रीधर संदेश (भाद्रपद १९०७)

सन १९८५

home-last-sec-img