Memories

२४. दिव्यतत्त्वाची प्रचिती

श्रीमत् सच्चिदानंद स्वामीजी

सखोल विचार केल्यास श्रीसद्गुरु माउलीचे प्रत्येक चालणे, बोलणे इत्यादि सर्व दिनचर्या दिव्यत्त्वाने पूर्णपणे ओतप्रोत भरलेली आहे. पण सर्वांनाच ते सहजपणे समजणे कठीण आहे. म्हणून श्रींच्या चरित्रातील काही घटना येथे थोडक्यांत देत आहे.

(१) पंच गोकर्ण महाबळेश्वरापैकी ‘मुरुडेश्वर’ नावाचे एक क्षेत्र समुद्र किनाऱ्यावर आहे. अंदाजे तीस वर्षांपूर्वी तेथील भक्तमंडळींच्या निमंत्रणावरून ‘श्रीं’ची स्वारी तेथे गेली असतांना त्या मंडळीनी श्रींना विनंती केली की, महाराज ! हे सुप्रसिद्ध असे अत्यंत पुरातन क्षेत्र असून देऊळ अत्यंत जीर्ण झाले आहे. या देवळाचा जीर्णोद्धार होईल अशी आपण कृपा करावी. हे ऐकून ‘श्री’ एक क्षण ध्यानस्थ होऊन नंतर ‘या मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल कोणीहि कोणत्याच प्रकारची चिंता करूं नये. या मंदिराचा जीर्णोद्धार करणारा या गांवातच जन्मास आला असून त्याच्याकडून अत्यंत भव्य स्वरूपात या मंदिराचा जीर्णोद्धार होईल’, अशा अमृतवचनाने आशीर्वाद दिला.

काही वर्षांनंतर त्या गावातील एका गरीब गृहस्थानें बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय सुरू करून तो चांगलाच श्रीमंत झाला. नुकतेच ४-५ वर्षापूर्वी त्याने स्वतःच मंदिराच्या जोर्णोद्धार कार्यास सुरवात केली व त्यासाठी लाखो रुपये खर्च करून भव्य मंदिर बनविले. गतवर्षी तेथे त्याने त्या मंदिरात रुद्रस्वाहाकारादि अनुष्ठाने ब्राम्हणवृंदाद्वारे करून जीर्णोद्धाराची सांगता केली. त्या वेळी तीस वर्षांपूर्वी श्रीसद्गुरुमाउलींनी दिलेला आशीर्वाद प्रत्यक्षात साकार झालेला पाहून तेथील लोकांना श्रींच्या दिव्यत्त्वाची प्रचिती येऊन त्यांनी श्रींची मुक्तकंठानें स्तुती केली. 

(२) बेळगांव येथील टिळकवाडीत बांधलेल्या गेलेल्या श्रीराममंदिराच्या स्थापनेच्या इतिहासापाठीमागेहि ‘श्रींचा आशीर्वाद वा दिव्यवाणी होती.

(३) मुंबई जवळील रायगड जिल्हयातील श्रीक्षेत्र कनकेश्वर या मंदिरातील शाळुंकेतून वहात असलेली जळधारा अनेक वर्षे बंद पडली होती. ती श्रींच्या केवळ हस्तस्पर्शाने पुन्हा वाहू लागली आहे.

(४) कर्नाटकातील बारकुर या गावी ‘वेताळाचा’ दगडी खांब असून तो डोलत असे. पण काही दुष्ट मांत्रिकांनी त्यातील ते सामर्थ्य काढून टाकल्याने तो डोलण्याचा बंद होऊन आडवा झाला. श्रींनी त्यातील दुष्टशक्ती नष्ट करून तो शुद्ध केला. त्यात वेताळाची पुन्हा स्थापना केल्यावर तो दगडी खांब डोलू लागला. 

(५) तसेच सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ येथील श्रीरघुनाथस्वामी व श्रीआनंदमूर्ती यांच्या समाध्या श्रींच्या सानिध्याने डोलल्या. 

(६) कन्याकुमारी येथील विवेकानंद खडकाच्या मालकीबाबतचा हिंदु -ख्रिश्चन झगडा ‘श्रीं’नी तेथे तीन दिवस केलेल्या तपःसामर्थ्याने संपुष्टात आला. श्री तेथे तीन दिवस अन्नपाणीविरहित राहून वास्तव्य केले होते. विवेकानंदापूर्वी श्रीविद्यारण्यस्वामींनी तेथे तपश्चर्या केली होती असा इतिहास आहे. असो श्रींच्या या तीन दिवसाच्या वास्तव्या मुळेच आज तेथे हिंदू सनातन धर्माची ध्वजा फडकविणारे श्रीविवेकानंद-स्मारक-मंदिर निर्माण होऊ शकले यांत शंका नाही.

श्रीसद्गुरु माउलींचे चरित्र अशा असंख्य दिव्य घटनांनी परिपूर्ण आहे. त्यातील घटनांचा उल्लेख मी लिहिलेल्या चरित्रांत आला असून ते चरित्र येत्या आराधना महोत्सवात प्रथम कानडी भाषेत प्रसिद्ध होईल, असा अंदाज आहे.

दिव्यत्व किंवा कोणच्याहि दैवी गुणांचे खरे लक्षण म्हणजे ‘स्वीयं साम्बं विधत्ते (याचा अर्थ आपणासारखे करणे) यास उदाहरण म्हणून आणखी एक घटना सांगून मी हा लेख संपविणार आहे.

सदरची घटना वरदपूरची आहे.

वरदपूरचा हा भाग म्हणजे अत्यंत घनदाट जंगल होते. दुपारी १२ वाजताहि या जागी इकडे तिकडे फिरणे अशक्य होते. वाघ, हत्ती इत्यादि श्वापदांचे वास्तव्यहि होते. अशा भयानक निर्जन प्रदेशात श्रींच्या दिव्य पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीतील परमपावन अशा गोष्टी पाहून मन थक्क होऊन जाते. ‘श्री’ दिव्यत्वाने परिपूर्णविराजमन होते. तसेच त्यांच्या पदस्पर्शाने, करस्पर्शाने आणि वास्तव्याने वरदपूर हे क्षेत्र भक्तांची इष्ट कामनापूर्ती करणारे ठरले आहे. येथील ‘श्रीधराश्रम’ ‘श्रीधरतीर्थ’ या सर्वांना मोक्षप्रदान करणाऱ्या अशा श्रींच्या आनंददायी घटना होत. ही भूमी, हे तीर्थ या गोष्टींची साक्ष देते ते शरण आलेल्या भक्तांना पावन करते. आजहि अशा अनेक आश्चर्यकारक घटना या ठिकाणी घडून त्याची साक्ष देतात. श्रींच्या सान्निध्यात आलेला एक एक रज:कण स्वामींच्या आशीर्वादाने संयुक्त आहे.

उष्णत्व, दाहकत्व हा जसा अग्नीचां सहज स्वभाव आहे तसेच दिव्यत्वादि अनेक गुण हा श्रीगुरुमाउलींचा सहज स्वभाव आहे. तो दिव्यत्वादि अनेक गुणांनी युक्त असून त्यातील काही निवडक गुणांचे केवळ स्मरण करून त्यांच्या चरणी नमन करू या !! 

नमःशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । 

स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ।।
ॐ तत्सत्

– श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०७)

सन १९८५

home-last-sec-img