Memories

२६. श्रीपादुकांचा महिमा

कु. लीलाताई पुजारी, MA (प्रमुखश्रीसमर्थ श्रीधराश्रम कऱ्हाड)

श्रीस्वामिजी मनुष्य, वस्तु, जनावरे यांना अशीच काही कला व शक्ति देत की, योग्य परिस्थितीत प्रसंगानुसार त्यांची किंमत वा मोल समजून येई. त्यांचाच आलेला हा एक अनुभव.

कऱ्हाडच्या समर्थ श्रीधर आश्रमांत नित्य पूजेसाठी पादुका देताना श्रीस्वामीजी त्यांच्या पादुकांचे दोन जोड देऊ लागले, तेव्हा मी म्हटले ‘स्वामी, मला एका पादुका जोडाची पूजा करणे जड जाणार आहे मग हा दुसरा जोड कशाला ? तो मला नको.’ त्यावर स्वामी म्हणाले, ‘यांची पूजा रोज करू नको. त्या माळ्यावर ठेवून दे. दुसऱ्या पादुकांची उणीव भासेल, प्रसंगच पडेल तर त्या बाहेर काढ त्यांची दुसरे पूजा करतील व जे पूजा करतील त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळेल’. हे सांगून अंदाजे ३० वर्षे झाली असतील तोच माझ्या मावशीची जागा आम्ही आश्रमासाठी विकत घ्यावयाचे ठरविले. ती जागा वीस हजार रुपायास ठरवली व काही पैसे देऊन बाकीचे पैसे एक वर्षाच्या आंत फेडावयाचे, असे ठरले. थोडे पैसे दिले व राहिलेले पैसे कसे उभे करावयाचे याची पंचाईत पडली. त्यावेळी स्वामींनी मला दिलेल्या दुसऱ्या जोडाची आठवण झाली. मी लगेच त्या पादुका पेटीतून बाहेर काढल्या आणि त्या पादुका बरोबर घेऊन निरनिराळया गांवी भिक्षा मागण्यास जावयाचे ठरविले. त्या प्रमाणे आम्ही तासगांव, जयसिंगपूर, सांगली, शिरोळ अशा गांवी भिक्षा केल्या. प्रत्येक ठिकाणी पूजा करणारांस चांगले, अजब व आनंददायी अनुभव आले. त्यापैकी जयसिंगपूरच्या श्री. कुलकर्णी यांचा अनुभव देत आहे.

जयसिंगपूरच्या माझ्या एका मैत्रिणीने श्रीमती गुळवणी बाईंना ‘तुमच्या स्वामींच्या पादुका आमच्या जयसिंगपूरला आण, माझ्या घरांत पादुका आल्याने मला आनंद होईल’. असा आग्रह धरल्यामुळे मी जयसिंगपुरला तिच्याकडे पादुका नेल्या. त्या दिवशी पादुकांचे उत्कृष्ट स्वागत केले. तेथील श्रीदत्तमदिरांत श्रीपादुकांपुढे कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी तेथे ‘कुलकर्णी’ या नावाचे गृहस्थ आले व म्हणाले ! ‘ताई! माझ्या घरात खाण्यापिण्याची कोणतीच कमतरता नाही पण घरात रोज अगदी क्षुल्लक गोष्टीवरून भांडणे होतात. भांडणाशिवाय एक दिवसहि जात नाही. तरी काय करावं ? माझ्या मनात एकदा स्वामींच्या पादुका आमच्या घरी न्याव्यात व त्यांची मोठया थाटात पुजा करावी असें आहे. तरी आपण आमच्या घरी पादुका आणाल काय ? पाद्यपूजेसाठी काय द्यावे लागते ? काय काय करावयाचे ? ते सर्व तुम्ही सांगा. कसेंहि करा पण श्रीपादुका घरी आणा. त्यांची विनंती ऐकुन मी ‘हो’ म्हणून कबूल केले आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. श्रीदतमंदिरापासून त्यांच्या घरापर्यंत पादुकांची मिरवणूक काढण्याचे त्यांनी ठरवून त्याप्रमाणे एक पालखी अत्यंत सुंदरपणे सजवुन आणली होती. पादुका पालखीत ठेवल्या व भजनी मंडळासमवेत बरीच मंडळी जयजयकार करीत, भजन करीत मिरवणूक चालू लागली.  चौकाचौकांत श्रीपादुकांस सुवासिनींनी ओवाळीत मोठ्या थाटांत त्यांच्या घरी  पादुका आणल्या, पादुका ठेवण्यासाठी त्यांनी मखर सुंदर सजवले होते. दिव्यांची रोषणाई पण केली होती. पूजा मोठ्याथाटामाटात झाली. नैवेद्य दाखविल्यावर जेवणास पाने मांडली. त्यांनी त्यांच्या बहिणी मेव्हण्यां इत्यादी सर्वांनाच पाद्यपूजेचा सोहळा पाहण्यास बोलावले होते. तसेच गावातील इष्ट मित्रहि जमले होते व अशाप्रकारे घरात माणसांची खुप गर्दी होती. इतक्यांत कोणाचं काय बिनसले ते कळण्यास मार्ग नव्हता पण एकदम धुसफूस होऊन भांडणाचा आवाज येऊ लागला. शेवटी जेवायच्या वेळेला सर्वांनी आनंदाने जेवा असे मी म्हणाले. तुमच्या घरात स्वामी आले आहेत, इतका वेळ आनंदी आनंद झाला व आता एकदमच असे का झाले? सगळ्यांनी सारे विसरून जा व आनंदाने जेवण करा. असे मी सांगताच वातावरण बदलून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दिवसभर गांवातील लोक दर्शनास येत होते. रात्री गायनाचा कार्यक्रमहि ठेवला होता. पुढील सर्व कार्यक्रम आनंदात पार पडले व दुसऱ्या दिवशी पादुकां घेऊन आम्ही कऱ्हाडला परत आलो.

बरोबर आठ दिवसांनी कुलकर्णी यांचा निरोप आला की, आमच्या घरात पादुका येऊन गेल्यापासून घरातील भांडणे बंद झाली असून आमचा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ लागला आहे. कोणत्याही प्रकारे साधी धुसफुसहि आठ दिवसांत झाली नाही व हा सर्व आपण आमच्या घरी स्वामींच्या पादुका आणल्या त्यांचाच प्रभाव आहे हे निश्चीत. आपल्या कृपेने व श्रींच्या पादुकांच्या वास्तव्याने असे हे अघटित घडले आहे. पूर्वी आम्ही कित्येक वेळा सर्वजण निश्चय करीत असू की कांहीहि होवो पण उद्या कोणीहि भांडावयाचे नाही पण छे ! त्या दिवशी तर आणखीनच जोरदार भांडणे होत. खाल्लेलं अन्न गोड लागत नव्हते. भांडणे न होण्यासाठी अनेक उपाय केले पण कधीहि यश आले नाही. परंतु जादुची कांडी फिरावी तसे श्रींच्या पादुकांचे आगमन झाले व भांडण मिटले मोठी अजब घटना वाटते.

तेव्हा पासून आम्ही दरवर्षी जयसिंगपूरला जातच आहोत. श्रींच्या या पादुका ज्यांच्या ज्यांच्याकडे जाऊन आल्या त्यांची अनेक संकटे, समस्या कमी झाल्या.

‘जय जय रघुवीर समर्थ’

श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०७)

सन १९८५

home-last-sec-img