Memories

२७. तेथें कर माझें जुळती

श्रीधरदास . शं. भावे  

आपले सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज, त्यांच्या दिव्यत्वाविषयी लेख लिहीणे ज्याला ती स्थिती प्राप्त झाली नाही तो काय लिहिणार? मग काय? काही लिहूं नये का ? आपल्या सद्गुरूंचे अलौकिकत्व, अतिमानुषत्व त्यांचा स्वभावच झालेली दैवीगुणांची संपत्ती यावरूनच सामान्य जिज्ञासू साधकास ते दिव्यत्वच भासणार ! सूर्यनारायणाचे तेज, त्या तेजाची सर्वांना सारखीच उपयुक्तता या गोष्टी त्याचे दिव्यत्व जाणवतातच की नाही ! आता श्रीस्वामीजींच्या जन्मपूर्व गोष्टीच पाहा ! त्यांच्या माता पित्यांना क्षेत्र गाणगापूर येथे अत्यंत कसोटीची तपस्या केल्यावरच भगवान दत्तात्रेय महाराजांचा प्रसादवर मिळून त्यांच्या अंशानेच हा अवतार झाला. श्रीस्वामीजींनी श्री. पारसनीस (पुणे) यांनी दिलेल्या प्लॉटवर आपले जन्मपूर्ववृत्त सांगितले होते की, “आम्ही मुळचे गाणगापूरचे. तुमच्या (श्रोत्यांना उदेशून) काही कार्यासाठी, जशा सभा होतात तशा एका देवसभेत धर्मग्लानीने गांजलेल्या पृथ्वीवर पुन्हा धर्मोध्दार करण्यासाठी कोणी जावे म्हणून विचार होत होता. त्यासाठी माझी निवड झाली. त्यासभेस श्रीसमर्स रामदासस्वामीजीहि उपस्थित होते त्यांनी मलाच मागून घेतले. तेव्हांच मी गडावर श्रीसमर्थांची सेवा करून अनुग्रहपूर्वक कार्यान्वित होण्याचे ठरले होते”. 

त्यांच्या लहानपणीच वडील, भाऊ यांच्या अकाली मृत्युमुळे दुःखार्त झालेल्या आपल्या मातोश्रींस त्यांनी केलेला ज्ञानोपदेशहि त्यांचे अतिमानवत्वच दाखवितो. शिक्षणासाठी पुण्याच्या भावेस्कुलमध्ये ते दाखल झाले त्यावेळी आताच्या भव्य इमारतीच्या जागी केवळ जंगलच होते. तेथे भूमिपूजनासाठी शाळेचे प्रमुख श्री. भावे व श्री मालशे मास्तर यांनी त्याकालांस सुप्रसिध्द असलेले संत श्री नारायण महाराज केडगांवकर यांना प्रार्थना केली तेव्हा त्यांनी शाळेत एक अधिकारी व्यक्ती आली असल्याचे सांगितले आणि ती व्यक्ति कोण ? हे प्रत्यक्ष भूमिपूजनाचा सोहळा स्वतः न करता तेथे स्वयंसेवक म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थी श्रीधर नारायण देगलूरकर याकडूनच करविला व आपण पूर्वी निर्देश केलेली अधिकारी व्यक्ती ती हीच, असे श्री. भावे व श्री. मालशें मास्तर यांना सांगून विस्मयचकीत केले.

दसऱ्याच्या सुमुहुर्तावर संसारिक जगांतून परमार्थाच्या जगतांत श्रीस्वामींनी पुण्याच्या सदाशिव पेठेतील प्रख्यात देशभक्त श्री. वासुदेव बळवंत फडके यांचे निवासस्थान असलेल्या श्रीनृसिंहमंदिरातून देवाच्या साक्षीने लहान वयातहि अतिशय कठोर निश्चयाची सहा कलमी प्रतिज्ञा अग्नीच्या साक्षीने घेऊन सीमोल्लंघन केले व एक दासबोध ग्रंथच सोबत घेऊन, केवळ पंचा नेसून श्रीसज्जनगडी तपस्सेवेसाठी श्रीसमर्थांकडे अनवाणी प्रयाण केले. गडावर रात्रीचा दिवस करुन केवळ तेथील देवतांचीच नव्हे तर तेथे रहाणाऱ्या सर्व प्राणिमात्रांची श्रीसमर्थभावनेनेच सेवा केली. अखंड नामस्मरणाच्या कवचाने त्यांनी क्रूर निंदकांचा ‘हा चोर, हा ढोंगी साधु, हा माधुकरी माश्यांना, गाईला घालतो, याला माधुकरी घालू नका’ असा दुष्ट प्रचार शांत केला. एवढेच नव्हे तर श्रीसमर्थांनांहि प्रार्थना केली की, त्यांना क्षमाच करावी. तेहि श्रींचीच सेवा करतात. आपल्या वर्ष – दीड वर्षाच्या तपस्या कालांतच श्रीसमर्थांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन स्वरूप साक्षात्काराचा लाभ झाला व त्यांच्या प्रत्यक्ष आज्ञेनेच पुढील धर्मोद्धाराचे प्रचंड जहाज वादळी संसारसागरांत कुशलतेने चालवून हजारोंनी जीवांचा उद्धार केला.

त्यासाठी स्वतः अविश्रांत श्रम सहन केले. स्वत:ची सर्व तपस्या लोक भाविकारणाने पायावर घालत असलेले द्रव्य, सर्व काही हातचा मुळीच न ठेवता, अत्यंत शांतपणे, अत्यंत दयेने शरण आलेल्यांचे कल्याण करण्यात घालविले, ‘तुल्यनिंदा स्तुतिः मौनी संतुष्टी येनकेन चित् ।’ असा प्रत्यय ‘बोले तैसा चाले’ या न्यायाने आमजनतेस आणून दिला. लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी तपस्येच्या सामर्थ्याने अनेक अघटीत घटना घडविलेल्या लोकांनी प्रत्यक्षपाहिल्या आहेत. यांत आत्मप्रौढीचा लवलेशहि कोणास कोठे आढळला नाही. देहविसर्जनानंतर वासना देहाने तळमळणाऱ्या अनंत जीवांचा उद्धार त्यांनी केला. अधिकारी जीवांना प्रत्यक्ष मोक्ष हि मिळवून देऊन मुक्त केले यामध्ये मानवयोनिच नव्हे तर पशुयोनीतीलहि जीवांचा समावेश आहे. एवढी सत्कीर्ती, एवढी प्रसिद्धी असलेला हा महान पंडित अनेक भाषा प्रमुख, ज्यांना ‘श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ’ हीच पदवी, स्थिति आहे असा ‘मनाचा व वाचेचा मवाळु, स्वभावे कनवाळु, अनाथां प्रतिपाळ, शरणागता सांभाळू, दया-क्षमेचा कल्लोळू, सत्कीर्ती-परिमळु’ सद्गुरु स्वतःच्या जीवनांत उत्कट वैराग्य, तितिक्षा, निस्पृहता, शुद्धत्व, गणातितता यांच्या भव्याति भव्य असा दिव्य आदर्शच होता. श्रीसमर्थांनी म्हटल्याप्रमाणे ‘सोने आणि परिमळे’ । इक्षुदंडा लागती फळे’ । असा अभिनव राजयोगी संत, भगवान दत्तात्रेयांनीहि सेवा करणाऱ्या तपस्वीं साधकांना ‘मी अमक्या ठिकाणी आहे, तेथे शरण जा, सेवा कर, तुझा उद्धार होईल’ असे म्हणून श्रीस्वामीजींकडे पाठविले. स्वतः श्रीसमर्थांनी ज्यांना दृष्टांताने वाट पहाणाऱ्या साधकासासाठी ज्यांना पाठविले, भयंकर अशा नागयोनीत पिचणाऱ्या जीवाला अनेक लोकासमवेत सहज बसले असतां समक्ष शरण आलेला पाहून त्याच्या सुटकेसाठी ज्यांनी तीर्थ घातले, ब्रह्मराक्षसादि पिशाच्च योनीतील जीवांनाही त्यांच्या अति कष्टदायी आयुष्यांतून ज्यांनी मुक्त केले, आधुनिक डॉक्टरांनी ‘प्राण गेला आहे म्हणून सांगितलेल्या जीवांना पुनर्जन्म दिला, ज्यांनी अनेक असाध्य, जीवघेण्या व्याधींनी हैराण झालेल्यांना त्या कष्टातून सोडविले, तिरुपतिक्षेत्रीं चांदीची सर्व भांडी देवाला अर्पण केल्यावर स्वतः देवाने कारकुनाचे रूपाने येऊन ‘तुझ्या आईने केलेला नवस फिटला’ हे पूर्वाश्रमीचे नांव घेऊन ‘नवसाचे खत फाडल्याचे सांगितले, श्रीशैल मल्लिकार्जुनास ऐन मध्यरात्री नियमानुसार मंदिरद्वार बंद असता श्रीस्वामींना दर्शन घेण्यासाठी तेथील पुजारी व त्याच्या वरचा गर्विष्ठ अधिकारी यांना देवाने बळेच जागे करुन, श्री स्वामी तेथील नियम पाळावयास तयार असतांहि दर्शन दिले, स्वतः नर्मदामाईने श्रीस्वामींच्या स्नानाचे वेळी तिच्या तीरावरील जंगलात कापल्या जावयाच्या, संकटात असलेल्या गोमातेची श्रीस्वामीजींकडून सुटका करविली, श्रीशृंगेरीपीठाचे अधिकारी आचार्यस्वामी स्वतः ज्यांच्या दर्शनासाठी वरदपुरी आले, ज्यांनी शकडो मैल दूर असणाऱ्या शिष्य साधकास त्यांच्या जागेवर योगाभ्यास शिकविला, श्रीसंत योगिराज गुळवणी महाराजहि जणू काही ‘हे आपले सद्गुरु श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीच’ या भावनेने ज्यांकडे पहात आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कै. आचार्य अत्र्यांसारखा आधुनिकतेचा, परखडपणाचा साहित्यिक, विद्वतेचा, जनमानसाचा राजाच असा स्वतः श्रीस्वामींच्या योग्यतेविषयी विपरीत दृष्टीने पहाणारा रजोगुणी महाभाग सर्वांसमक्ष ज्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन आपल्या सुप्रसिद्ध ‘मराठा’ वृत्तपत्रात ‘श्रीसमर्थांचा आधुनिक अवतार’ हा गौरवपूर्ण अग्रलेख लिहून धन्य झाला, अशा या श्रीसमर्थांनीच समर्थ केलेल्या व्यक्तिमत्वाला ‘दिव्य’ म्हणू नये तर काय म्हणावे ? !

आजहि ‘समर्थदर्शन उघडे येथ घडे’ अशी स्पष्ट ग्वाही श्रीस्वामींनी आपल्या ‘श्रीसमर्थपाठ’ या काव्यांत दिली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभवहि आलेले थोर रामदासी साधकहि सुदैवाने लेखकास पहावयास मिळाले आहेत. या विषयी जर लवमात्रहि संशय राहील तर ते त्या संशयात्म्याचे कठोर दुर्दैवच होय. आपण मानले नाही म्हणून सत्य कधी असत्य होईल काय?

या खास अंकाच्या निमित्ताने आपल्या सद्गुरुंच्या दिव्यतेचे स्मरण या लेखाद्वारे करवून घेतल्याबद्दल ‘श्रीधर संदेश’ चालक डॉ. मुळे यांना शतशः धन्यवाद !! 

पुणे ३-११-८५

श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०७)

सन १९८५

home-last-sec-img