Memories

३४. दिव्यत्वाची जेथें प्रचिती तेथे कर माझे जुळती

सौ. अनघा . देशपांडे  

।। श्रीराम समर्थ ।।

आपले सद्गुरू भगवान श्रीधरस्वामी महाराज यांच्या दिव्यत्वावर लेख लिहिणे म्हणजे ज्याला योग्यता प्राप्त झाली नाहीं तो काय लिहिणार? ज्या पामराच्या कानीं स्वामींच्या विषयी चार शब्द पडले आहेत तो काही लिहूं शकणार नाही काय? आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी व दैवीगुणांची संपत्ती या माझ्यासारख्या पामरास लाभली हे माझे परम भाग्य होय. मी स्वतःला फारच भाग्यवान समजते.

लहानपणापासूनच मला भक्तिभाव छंद लावून माझ्यासारख्या पामरास स्वामींनी जवळ करुन मला माझें म्हटले हे माझे महद्भाग्य होय. स्वामीजींच्या फोटोचें प्रथमदर्शन मला २३ एप्रील १९८४ रोजी स्वामीजींच्या एका भक्तांकडे झाले व प्रथमदर्शनीच त्यांनी आम्हास स्वामींचा फोटोहि दिला. फोटो मिळाल्यापासून मी त्याची नित्यनेमाने पूजा करण्यास सुरुवात केली. ही सेवा चालू असतांना आणखी एक फोटो व मंत्राक्षताहि मिळाल्या व स्वामींचा जप करण्यास सांगण्यांत आले. तेव्हा मला वाटलें की, स्वामींना माझ्या हातून सेवा करून घ्यावयाची आहे.

सेवा चालू असतांनाच मधून मधून दृष्टांत होऊ लागले. एके दिवशी स्वामींच्या फोटोची पूजा चालू असतांनाच तेजोमय वलयांकित किरणांचा प्रकाश दिसला व त्याक्षणीच मी नमस्कार केला. मला खात्रीने स्वामींनी खरोखरच दर्शन दिले. निष्ठेने केलेल्या सेवेचा आनंद हा त्रिभुवनातील आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे मला कळले. दृष्टांतांतहि स्वामींनी ‘नमःशांताय’ चा जप करण्यास सांगितले.

सेवा चालू असतानाच स्वामींच्या पादुकांची पाद्यपूजा करावी अशी इच्छा मनात निर्माण झाली. मनाने सगळे काही ठरविले. महिना, वार वगैरे हे. एका भक्ताच्याकडे पादुका आहेत. त्याच्याकडे जाऊन मनातील इच्छा सांगावी म्हणून आम्ही उभयतां त्यांच्या घरी गेलो. पण ते त्यावेळी वरदपूरला जाण्याच्या तयारीत होते. तेथील सर्व वातावरण पाहून न बोलतांच आम्ही परत आलो व ते परत आल्यावर पाद्यपूजा करावी अशी मनाची समजूत घातली.  रात्रभर मनाला हुरहुर वाटली. मला वाटले कीआपणांस पाद्यपूजा करायचा योग अद्यापी आलेला नाही. कदाचित आपली सेवा कोठेतरी अपुरी पडत असावी. म्हणून मी सेवा नियमाने चालू ठेवली.

नंतर आठ महिन्यांनी असाच एक दृष्टांत झाला. स्वामींची मी पाद्यपूजा करीत आहे. (हे दृष्टांत अधून मधून होत राहिले) स्वामीजी सिंहासनावर बसले आहेत व पुढे पादुका आहेत. तें ठिकाण म्हणजे एक भुयार आहे. चोहोकडे लख्ख असा प्रकाश दिसत आहे. जवळ समई तेवत असून तिच्या ज्योतीचा प्रकाश सर्वत्र पडलेला आहे. आम्ही उभयतांनी स्वामींच्या पादुकांची पूजा केली व स्वामींच्यापुढे फलाहार ठेवून नमस्कार केला. त्यावेळी स्वामीजी आमच्याकडे प्रसन्न मुद्रेने पहात असून आमच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे, असा तो दृष्टांत होता. तेव्हा मला ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती।’ ही ओळ आठवली. खरोखरच स्वामी माझे पाठिराखे आहेत. त्यांच्याबाबत माझें मन व अंतःकरण ओतप्रोत भरलेले आहे. स्वामींनी माझी बरीच संकट निवारण केली असून अजून हि करत आहेत.

ज्याप्रमाणे समईतील तेवत असलेली ज्योत खोलीतील अंधार नाहीसा करून घर प्रकाशित करते त्याप्रमाणे माझे जीवन स्वामींनी प्रकाशित केले आहे. माझ्या हदयमंदिरांत स्वामींची मूर्ती अखंड वास करीत आहे. लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते तसे माझे जीवन सुवर्णमय बनले आहे.

श्रीस्वामीजींचे अंतःकरण अथांग प्रीतीने, अपार कारुण्याने भरलेले आहे. श्रींचे वर्णन करण्यास समुद्राची शाई व आकाशाचा कागद करुन लिहिले तरी अपुरेंच पडेल.

स्वामीजींचे कितीहि वेळां दर्शन घेतले तरी तृप्ती होत नाही. शिवाय त्यावेळी माझें अंतःकरण सद्गदीत होऊन नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागतात. त्यांचा वरदहस्त जन्मोजन्मी राहावा हीच श्रीस्वामीजींच्या चरणी प्रार्थना!

‘भगवान सद्गुरू श्रीधरस्वामी महाराज की जय ।।’

श्रीधर संदेश (चैत्र १९०८)

सन १९८६

home-last-sec-img