Memories

३६. अशीच एक आठवण !

सौ. कृष्णा अंबेकर, कुंडलवाडी

आमचे गांव नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी. आमच्या गांवापासून वरदपूर हे दोन दिवसांचा रस्ता होय. वरदपुरास जावे असे ठरून आम्ही त्या दिवशीच्या दुपारी बारा वाजता घरून निघालो. श्रींच्या कृपेने लागलीच बस मिळाली. दुसरे दिवशी उत्सवाच्या अखेरचा दिवस होता. आम्ही लातूरला चार वाजता पोहोंचलों तोंच सोलापूरला जाण्यासाठी Express बस मिळाली. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आलों तो हुबळीस जाणारी ‘गोलघुमट’ एक्सप्रेस सुटली होती. आम्ही गाडी चालू लागली असतांनाच चालत्या गाडीत चढलो व हुबळीला पोहोचलो व तेथून बसनें सागरला दुसऱ्या दिवशी रात्री पोहोंचलों. तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. तिथे कुठे उतरावें? काय करावे? आजच श्रींचे दर्शन झाले असते तर बरे’ असे विचार माझ्या मनांत सारखे येत होते. मी माझ्या यजमानांना, ‘येथून पांच रुपयांत टॅक्सी मिळाली तर बरें होईल’ असे म्हणाले तेव्हा ते म्हणाले, ‘वेडी कुठली, पांच रुपयांत कुठे टॅक्सी नेईल काय? आम्ही असे बोलत आहोत तोच जवळच उभ्या असलेल्या टॅक्सीचा ड्रायव्हर म्हणाला की मी तुम्हाला पांच रुपयांत घेऊन जातो. माझ्या मनातील गोष्ट याला कशी समजली याचे मला फारच नवल वाटलें. मी घरून निघाले तो माझ्या मासिक पाळीचा चवथा दिवस होता त्यामुळे स्नान केल्याशिवाय दर्शनास कसे जावे असे वाटत होतें. निदान हातपाय तरी धुवावे. आश्रमाजवळच असलेल्या एका ब्राह्मणाच्या मळ्यातील विहिरीवर आलो. विहिरीचे पाणी तापविल्यासारखें गरम होते. मी, माझे पती व मुलगी अशा तिघांनी स्नान केले व आश्रमांत गेलो. त्यावेळी तेथे आलेली मंडळी भजन करीत बसली होती, भजन चालू असल्याने एकाने इशारा करून ‘इतक्या रात्री कसे आलात ? असे विचारले तर एका भगिनीने ‘इतक्या रात्री डोक्यावरून थंड पाण्याने स्नान केलेत तर थंडी नाही का वाजली ?’ असा प्रश्न केला. त्यावर ‘विहीरीचे पाणी कढत होते’ असें मी सांगतांच त्या भगिनींच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या व तिने ‘श्रीगुरुमाउलीनीच तुम्हाला मदत केली असे उद्गार काढले. धन्य ती माझी गुरुमाउली !!

– श्रीधर संदेश (चैत्र १९०८)

सन १९८६

home-last-sec-img