Memories

४४. श्रीसद्गुरू कृपा

सौ शांता पिपळे, कामठी

मला नेहमी वाटायचे की, आपण गुरू करावा पण तो प्रापंचिक नको तर तपस्वी, तप करणारा, ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे असा असावा व त्यासाठी माझे डोळे अशा गुरूचा शोध घेत होते. इतर लोक म्हणायचे, ‘अगं, आता या जगांत तसे तप करणारा विरळा’. पण मन म्हणत होते, ‘मिळेलच !’ मनाचा ध्यास व दृष्टीचा शोध सुरु होता.

एके दिवशी दुपारच्या वेळी झोंपले असतां अंदाजे साडेतीन वाजतां एक मोठी लाल रंगाची गाय घरांत शिरली असल्याचे स्वप्न पडून आवाज आला म्हणून उठून बसले पण तेथे गाय नव्हतीच. मला त्या स्वप्नाचे आश्चर्य वाटले.

नंतर आठ दिवसांनी समजले की भगवान श्रीधरस्वामी महाराज काकासाहेब कांबळयांकडे येणार आहेत व खरोखरच आठ दिवसांनी श्रीसद्गुरूमाउली कामठीस काकासाहेत कांबळे यांच्याकडे आली. श्रींचे दर्शन झाले व माझे नेत्र व मन तेथेच स्थिरावले. तसेच मी जे शोधित होते ते मिळाले असेच वाटून अतिशय आनंद झाला, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. श्रीसद्गुरूचा उपदेश (अनुग्रह) झाला त्यावेळचे शब्द आजहि आठवतात. ‘बाळ ! सुखी होशील’. त्यांच्या कृपेने सर्वत्र आनंद-समाधान आहे.

तो पाडव्याचा दिवस होता. सकाळी ६ ची वेळ असावी. त्यावेळी स्वामीजी आमच्या घरी आल्याचे स्वप्न पडले. मी जोराने ‘स्वामी आले, स्वामी आले’ असे म्हणाले. स्वामीजी स्वयंपाक घराच्या दारांत उभे होते व म्हणाले, “बाळ, मी चंदूकरतां बँकेत नोकरी आहे का?, हे पहावयास आलो होतो” आणि खरोखरच पंधरा दिवसांनी त्याला बँकेकडून बोलावणे आले. आज तो चंद्रपूर येथे स्टेट बँकेत ऑफीसर म्हणून काम करीत आहे. स्वामींची ही कृपाच नाही कां!

माझा दुसरा मुलगा आजारी होता. मी स्वामींची प्रार्थना केली. स्वामींना हाक मारली. स्वप्नात स्वामीजींनी येऊन त्याच्या अंगावर हात फिरवून म्हणाले, “बाळ ! घाबरूं नकोस. हा भोग आहे.” आज हा मुलगाहि स्टेट बँकेच्या इतवारी शाखेत ऑफीसर आहे. याला काय म्हणावे ! स्वामींची कृपाच नाही का! मन भरून येते व होणारा आनंद कुणालाहि सांगता येणे अशक्यच !!

– श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)

सन १९८६

home-last-sec-img