Memories

४७. गुरुकृपेचे प्रत्यक्ष प्रमाण

पु. व्यं. सातपुते

॥ श्री सद्गुरू श्रीधरायनमः ।।

ही घटना सन १९७३ च्या जानेवारी महिन्यांतील आहे. पुण्यामधील कर्वेरोडवरच्या लोकमान्य रुग्णालयांत गुदकर्कग्रंथी काढून टाकण्यासाठी दि. ३ जानेवारी १९७३ रोजी माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यांत आली. डॉ. दाते हे शल्यचिकित्सक होते. शस्त्रक्रिया जवळ जवळ पांच तास चालू होती. या शस्त्रक्रियेत माझें गुदद्वार पूर्णपणे बंद करण्यांत येऊन माझ्या पोटांतील मोठया आतडयाचा काही भाग काढून टाकण्यांत येऊन मलनिस्सारणासाठी पोटाच्या खालच्या भागांत डावीकडे एक मोठे छिद्र ठेवले गेले. शस्त्रक्रियेनंतर पहिले दोन, तीन दिवस मला काहीहि खावयास दिले नव्हते. मग थोडे थोडे देण्यास सुरुवात झाली. पण एका रात्री मलनिस्सारणासाठी केलेल्या छिद्रांतून मल येत असल्याचे वाटले व मलाचा वास येऊन मला अस्वस्थता वाटू लागली.

हॉस्पिटलमध्ये परिचारिकेस बोलावण्यासाठी रुग्णाच्या पलंगाजवळ घंटा वाजविण्यासाठी सोय असते. मीहि त्याप्रमाणे घंटी वाजवली. घंटी वाजताच माझ्यावर लक्ष देणारी परिचारिका आली व ‘काय पाहिजे ? असे तिने विचारले. मी तिला वस्तुस्थिती सांगून पट्टी बदलण्याची विनंति केली. तिने ‘तुमची ही शस्त्रक्रिया विशिष्ट प्रकारची असल्यामुळे मी पट्टी बदलू शकत नाही’ असे सांगितले. तिला मी ‘मग डॉक्टरांना तरी कृपया बोलवा’ अशी विनंती केली. डॉक्टर रुग्णालयाच्या इमारतीत वरच्या मजल्यावर रहात होते. माझ्या या विनंतीवर तिने ‘डॉक्टर सकाळीच येतील. आंता येणार नाहीत’. असे उत्तर दिले व मला एक गोळी देऊन पाणी पाजून निघून गेली. मी हि ‘आलिया भोगासी असावे सादर’ असा विचार करून तसाच तळमळ करीत पडलो. या गोष्टीस १०-१५ मिनिटे होतात न होतात तोच ती परिचारिका परत आली व ‘तुमची पट्टी मी बदलते’ असे म्हणाली. थोड्या वेळापूर्वी नाही म्हणणारी ही बाई आता पट्टी बदलण्यास आल्याचे पाहून मो आश्चर्यचकित होऊन मी तिला ‘तुम्ही मघा नाही म्हणलात व आता परत कशा आलात? असा प्रश्न केला. त्यावर ती म्हणाली की, आधी पट्टी बदलू द्या. नंतर मी तुम्हास सर्व काही सांगेन’ तिने छिद्रावरील पट्टी बदलल्यावर ती म्हणाली, ‘मी तुम्हास नाही सांगून माझ्या खोलीत कॉटवर पडते न पडते तोच माझ्यापुढे एक दाढी वाढलेला जटाधारी साधु उभा असलेला दिसला. त्याच्या गळयांत काही वेळ तुळसीचा हार दिसे तर काही वेळ फुत्कार सोडणारा मोठा नाग दिसे. तो नाग माझ्याकडे पाहून जोरजोराने फुत्कारत होता व तो साधूहि डोळे वटारून ‘तुझे कर्तव्य तू केले पाहिजेस. जा ! असे म्हणाला. माझी तर ते दृष्य पाहून गाळणच उडाली व तशीच घाईने उठून इकडे यावयास निघतांच ते दृश्य हि नाहिसे झाले. हे तिचे बोलणे ऐकतांच मी तिला ‘तुम्ही त्या साधूस ओळखू शकाल काय ? असे विचारले व तिने ‘हो, मी त्यांचा चेहरा स्पष्टपणे पाहिला आहे असे उत्तर दिले. मी शस्त्रक्रियेसाठी या रुग्णालयांत आलो. त्यावेळी डॉक्टरांच्या परवानगीने एका बाजूस श्रीरामाचा व एका बाजूस श्रीमद् सद्गुरु भगवान श्रीधरस्वामींचा फोटो अशा प्रकारे एक तसवीर माझ्या पलंगाजवळ अडकविली होती. त्यावेळी श्रीरामाचा फोटो दर्शनी बाजूस होता. तेव्हा त्या परिचारिकेस ‘तो श्रीरामाचा फोटो उलटा करून पहा व तुम्ही पाहिलेला तोच साधू हा होता काय ? ते मला सांगा ‘ असे म्हणालो. तिने त्याप्रमाणे फोटो उलटा केला व स्वामीजींचा फोटो पहाताच ‘मला थोड्या वेळापूर्वी जे साधू भेटले ते हेच साधु. असे म्हणाली. हे ऐकताच ‘मी तिला’ हे तर माझे सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज’ असे म्हणालो व दोन्ही हात जोडून श्रींना नमस्कार केला व परिचारिकेस ‘माझ्या सद्गुरुंनी मला दर्शन दिले नाही पण माझ्यासाठी तुम्हाला दर्शन दिले. खरोखरच तुम्ही भाग्यवान आहां !! असे म्हणून श्रीगरुमाउली माझे शारीरिक कष्ट नाहिसे करण्यासाठी प्रत्यक्ष येऊन गेली या घटनेमुळे मला गहिवरून आले.

पूर्ण बरे झाल्यावर मी जेव्हा जेव्हा पृण्यास जाई तेव्हा तेव्हा डॉक्टर दात्यांकडून माझी प्रकृति तपासून घेत असे. या घटनेनंतर अंदाजे ६-७ वर्षानी मी डॉ. दाते यांच्याकडे गेलो असतांना परिचारिकाहि तेथे होती. मी तिला ओळखू शकलो नाही. पण तिने मला वर निर्दिष्ट केलेल्या घटनेची आठवण देऊन ‘मीच ती परिचारिका’ अशी ओळख करून दिली. आजहि ती ‘ परिचारिका डॉ. दात्यांच्या कर्वेरोडवरील लोकमान्य रुग्णालयांत आहे.

– श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)

सन १९८६

home-last-sec-img