Memories

५०. श्रींचा संचार व त्यातील तीन घटना

गोविंदबुवा गोडसे (रामदासी)

॥ श्रीराम समर्थ ॥

आदिनारायण विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम्।
श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् ।।
नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे ।
स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ।।

*१) आशुतोष मुखोपाध्याय*

श्रीस्वामीजी, भगवान श्रीधर स्वामी महाराज शके १८७९ मधील सज्जनगडावरील दासनवमी पूर्ण करून अत्यंत परिश्रम झाल्याने थकल्यामुळे भक्तांच्या अत्याग्रहाने विश्रांतीसाठी लोणावळ्यास खंडाळयाचे सुंदरवाडीतील पाटील बंगल्यांत सन १९५८ च्या मार्च महिन्याच्या २-३ दिनांकी येऊन स्थिरावले.

या दासनवमीपूर्वी शके १८७९ मधील श्रीकाशीमध्ये केलेल्या चातुर्मासानंतर अयोध्या, प्रयाग, चित्रकूट हा प्रवास करून लोणावळामार्गे मुंबईस अशाप्रकारे सतत दोन महिने श्रींना अहर्निश धर्मप्रचार व आर्त भक्तांच्या अडचणी निवारणे इत्यादिमुळे अविरत विलक्षण देहकष्ट झाले. तदनंतर लगेचच दासनवमीतील लाखो भक्तांचा गराडा. त्यामुळे श्रींना क्षणाचीहि उसंतच मिळाली नाही.

लोणावळयास आल्यावरहि खंडाळयाचे बंगल्यात पुणे, मंबईकडील भक्तांची रीघ लागलीच होती. पंधरा दिवसांनी श्रींची स्वारी नगरकडे, अष्टी, बीड, जालना या मार्गे श्रीरामनवमी उत्सवासाठी जांबेस जाण्यास निघाली. लोणावळयाहून जांबेस जातांना काही काळ स्वामीजी बीड येथे थांबले होते. त्यावेळी तेथे घडलेली ही घटना होय.

बीड येथे गिरीधरांचे समाधिस्थानी गांवाबाहेर बिंदुसरा नदीतीरावर भर दुपारी श्रींची मोटार येऊन थांबली. स्वामीजींनी सर्वप्रथम बिंदुसरा नदीत माध्यान्हस्नान केले. नंतर तेथे मोठया संख्येने असलेल्या समाध्यांपैकी गिरिधरांची समाधी श्रींनी स्वत: शोधून काढली. कारण समाध्यांवर वर्षानुवर्षांची धूळ साठली होती. यापूर्वी धुळयाचे कै. स. भ. शंकर श्रीकृष्ण देवांनी त्या समाधीवर गिरिधरांच्या नावाची संगमरवरी दगडाची पाटीहि बसविली होती. पण तोवर आता कालानुक्रमाने धूळ साठून मातीचा ढिगारा झाला होता. श्रींनी समाधीस स्नान घालून अभिषेक केला व महापूजा केली. इतक्यांत जे घडले ते असे –
शके १८६८ (सन १९४६) साली श्रीस्वामीजी पायीच बदरीस जात असतां मार्गात काही साधक अत्यंत आर्ततेने साधन करीत देहभान विसरून भगवंतास आळवीत असलेले श्रींच्या दृष्टीस आले. तेव्हा श्रींनी स्वभावानुसार अत्यंत वात्सल्याने त्यांची चौकशी केली. त्यातील एकजण बंगालमधील कलकत्त्याहून आलेला ‘आशुतोष मुखोपाध्याय’ हा एक पदवीधर तरुण साधक अत्यंत उच्चप्रतीचा वैराग्यशील, तेजस्वी होता. तो श्रींना, ‘स्वामीजी, भगवन्, आम्हाला नश्वर काहीच नको. तुम्ही ज्या आनंदात आहां, तोच आम्हाला द्या ! असे म्हणून त्याने, त्या रामभक्ताने श्रींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेकच केला. स्वामीजी द्रवले व त्याच्या मस्तकावर आपला अमृतहस्त ठेवून त्यावर कृपा केली, त्याला उठवून हृदयाशी धरले. त्याला प्रत्यक्ष ब्रह्मनिष्ठ सिद्धांचे आलिंगन लाभतांच त्याची समाधी लागली. नंतर श्रीस्वामीजी तसेच पुढे बदरीनारायणास गेले व तेथेच चातुर्मास संपवून परत येत असतां अलमोड्याकडे जातांना वाटेत संपूर्ण कायापालट झालेला हा ‘आशुतोष’ भेटला. आता तो पूर्ण समाधानी व आनंदात साधनरत होता. स्वामीजी त्याला क्षेम विचारून त्याच्या रोजच्या फराळाची सोय करून निघाले असता तो म्हणाला ‘मला मुक्त कधी करणार?’ तेव्हा श्री म्हणाले, ‘बरोबर एक तपानंतर’

शके १८६८ ते १८८० (सन १९४६ ते १९५८) म्हणजे आज त्यास एक तप झाले होते. ब्रह्मनिष्ठांचे बोल कालत्रयी असत्य ठरत नाहीत. आपला विश्वास मात्र अढळ असावा लागतो.

गिरीधरांचे समाधीजवळ स्वामीजी कांही क्षण ध्यानमग्न होते. देहभानावर येतांच श्री मला म्हणाले, ‘त्या समोरच्या पडवीत जाऊन तेथे आतां एक साधक कोणत्या अवस्थेत आहे ते पाहून ये.’ मी तेथे जाऊन पहातो तों त्या रणरणत्या उन्हांत एक महाप्रचंड, धिप्पाड देहधारी दिगंबरावस्थेत पहुडला होता. सर्वान्ग धुळीने माखलेले व अर्धोन्मीलित दृष्टी होती. श्रीसमर्थान्ची मोटार व श्रींची स्वारी गांवातून इथे आलेली पाहून तेथे ग्रामस्थ मंडळी शेकडोंनी जमा झाली होती. ती मंडळी सांगू लागली की, ‘हा साधु इथे गेली तीन, साडेतीन वर्षे गांवाबाहेर पडलेला असून तो कोण, कुठला, कोठून कधी आला हे काहीच माहिती नाही. हा कुणाजवळ कधीहि काहीच खायला मागत नाही. भयंकर थंडीतहि असाच वस्त्रहीन, आकाशाकडे नजर लावून तासन् तास बघत बसतो. अगदी कधी बोललाच तर ‘श्रीधरा ! श्रीधरा !! सदगुरो, भगवन’ !! येवढच म्हणतांना ऐकू येते. तोंडात काही फळ किवा दुध घातले तरच खातो, अगदी गोड गोड हसतो आणि पुन्हा ध्यानस्थ बसतो.

बरोबर माध्यान्ही बारा वाजतां श्रीसदगुरुनाथ स्वामीजी तेथे आले व ‘आशुतोष’ म्हणून गोऽड हाक दिली. तो साधु उठून बसला आणि ‘सद्गुरो’ ! असे म्हणून त्याने श्रीचरणाला घट्ट मिठी मारली. श्रींनी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्याच्या छातीला उजव्या पायाचा अंगुष्ठ लावून अवकाशांत अर्धोन्मिलित दृष्टी लावून ॐ ऽ ऽ असा दोघे प्रणवोच्चार करीत काही वेळ उभे राहिले. आतां तो पद्मासनस्थ झाला होता. त्यानेहि श्रींच्याकडे अर्धोन्मिलित दृष्टी लावली व क्षीण प्रणवोच्चारांत तो स्थिर झाला. श्रींनी झारी भरून आणण्यास मला खुणावले. मी ती भरून श्रींच्या हाती देतांच श्रींनी त्याच्या मस्तकावर पाण्याची धार धरली व त्याचे मुख उघडून किंचित तीर्थ त्याच्या – आशुतोषच्या मुखांत घालून श्री झपाझप गिरिधरांचे समाधीपाशी येऊन थांबले. ५-१० मिनिटांतच तो श्रींच्या स्वरूपी कायमचा स्थिरावला. श्रींनी हिमालयांत शके १८६८ (सन १९४६) साली त्याला दिलेले वचन पूर्ण करून त्या आपल्या लाडक्या ब्रह्मनिष्ठ शिष्याला स्वस्वरूपी सामावून घेतले. पुढे त्याच ठिकाणी त्याचे और्ध्वदेहिक उरकण्याची व्यवस्था करून स्वामीजी गांवातील मठांत आले.

बीड गांवातील गिरिधरांचे मठांत श्रींची भिक्षा स. भ. गंगाधरशास्त्री बिडकरांनी मोठया वैभवात केली. पंचपक्वान्नाचा थाट होता. संपूर्ण गांवाला पोटभर भोजनाचा महाप्रसाद झाला. नंतर स्वामीजी मठासमोरच्या उंचवट्यावर चढून उभे राहिले. तेथे ओसाड बखळ होती. मातीचे ढिगारेच केवळ साठलेले होते. तेथे काही वेळ उभे राहून श्री उद्गारले की, ‘इथे मला श्री रामदर्शन होत आहे. इथे पुढे ‘दिनानाथ राम’ हा येणार आहे.’
नंतर श्रींनी हजारो भक्तांना दर्शन, तीर्थ, मंत्राक्षता देऊन छोटेसे प्रवचन करून स्वामीजी श्रीसमर्थ रथावर (मोटारीत) आरूढ झाले. उपस्थितांनी श्रीसमर्थ, श्री वेणाबाई, श्री बायजाबाई, श्री गिरिधर, श्री श्रीधर स्वामी यांचा गगनभेदी जयजयकार करीत असतांनांच श्रींची मोटार बीडहून जालन्याचे रस्त्यास मार्गस्थ झाली. रात्री जालन्याच्या गांवाबाहेरील श्रीगोंदवलेकर राममंदिरांत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघून स्वामीजी परतुडमार्गे जांबेस माध्यान्ही अकरा वाजता श्रीराम – श्रीसमर्थ नवमी उत्सवासाठी येऊन पोहोचले. तेथेहि मराठवाडा, कऱ्हाड, हैदराबाद, पुणे, मुंबई, कर्नाटक इत्यादी ठिकाणाहून असंख्य भक्त गोळा झाले होते.

जांबेचा उत्सव करून स्वामीजी श्रीसमर्थांची कुलस्वामिनी असलेल्या दहिवडीच्या श्रीभवानीमातेच्या दर्शनास बैलगाडीने जाऊन आले. (बैलगाडीत श्रीस्वामीजी व मीच होतो.) नंतर श्रेष्ठ गंगाधरांचे दहिफळ येथे चैत्र शु ।। एकादशीस धामणगांवकरांच्या जीपमधून खापरखुंटीकर वकील, हिरळीकर, दिनकरबुवा, मी आदि मंडळी जाऊन श्रेष्ठांच्या समाधीमंदिरासाठी ती जमीन मिळवून तेथील समाधी स्थापन करून तेथील मंडळींच्या स्वाधीन करून परत आली. तेथून परतूडमार्गे स्वामीजी औरंगाबादेस येऊन तेथील श्रीनाथमंदिरांत मुक्काम झाला, प्रवचनहि झाले. दुसऱ्याच दिवशी वेरूळ, घृष्णेश्वर, कैलास लेणी, देवगिरी किल्ला इत्यादि स्थळ पाहुन परत औरंगाबादेस स्वामीजी नाथमंदिरांत आले. रात्री प्रवचनास अलोट गर्दी लोटली होती. तेथून स्वामीजी पैठणला आले. हा सर्व प्रवास समर्थ रथातून चालू होता. शिवदिन केसरीचे मठांत स्वामीजींचे वास्तव्य होते. श्रीएकनाथ मंदिरात श्रींची भिक्षा झाली. श्रीएकनाथांचे वंशज ‘भय्यासाहेब’ यांच्या पत्नी श्रींच्या पूर्वाश्रमातील नातेवाईक, देगलूरच्याच होत्या. तेथेहि स्वामीजींचे प्रवचन झाले. गोदावरीवर स्नान झाले. सकाळीच स्वामीजी उत्खननाच्या जागीहि जाऊन आले. ती जागा शालीवाहनाच्या राजवाड्याची होती.

– श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०८)

सन १९८६

(या आठवणीत नमूद केलेल्या तीन घटनांपैकी एकाच घटनेचा उल्लेख आजच्या आठवणीत केला आहे. जागेअभावी पुढील २ घटना पुढील आठवणीत नमूद करत आहोत.)

home-last-sec-img