Memories

६. अत्युच्च पदी

श्री. नारायणराव पोतदार

मी आणि श्रीधर बालमित्र. त्याचे वडील करोडगिरीत होते. नाकेदाराचे काम. आमची घरे जवळ जवळ होती. सुलतान बाजार मध्ये चौरस्त्याच्या खालच्या बाजूस किशनराव अफजलपूरकरांच्या घराच्या मागच्या बाजूस आमचे घर होते. श्रीधराचे घराच्या, बाजूला एक हॉटेल होते ते मागच्या बाजूस वर होते. आम्ही दोघेही एकमेकाना सोडून राहात नसू. त्याला भूक लागे, तेव्हा मी त्याला चिवडा नेऊन देई. मग आम्ही दोघे खात असू. आमची एक पीठाची गिरणी होती. तो मला म्हणे – ‘अरे, तू लग्न कर.’ मी तर लग्न केले पण त्याने मात्र वेगळाच मार्ग पत्करला.

कंदास्वामी बागेजवळ हनुमान व्यायामशाळा आहे. आम्ही तिथे जात असू. कुस्त्या खेळत असू. व्यायाम करीत असू. जमदग्नी हे आमचे व्यायाम शाळेचे शिक्षक. गाडगीळ, मालकोटेकर, हर्डीकर, भोले हे सर्व सहाध्यायी. श्रीधराला आम्ही देगलूरकर म्हणून ओळखत होतो.

लहानपणीसुद्धा श्रीधराला पुराण, प्रवचन, देवधर्म यांची अतिशय आवड होती. त्याची वृत्ति अत्यंत सात्विक, आणि मायाळू पण तितकीच. पण माझा हा बालमित्र पुढे पुण्याला गेला, तिथून सज्जनगडावर गेला आणि समर्थकृपांकित होऊन खूप श्रेष्ठ पदाला पोहचला. सर्वजण त्याला स्वामी म्हणू लागले.

जेव्हाश्रीधर स्वामीम्हणून त्यांची माझी भेट झाली तेव्हा अत्यंत हर्षाने मला आलिंगन दिले. इतक्या थोर पदावर तो आपल्या बालमित्राला विसरला नव्हता. माझ्या बायकोला पण ओळखले आणि गर्दीतही जवळ बोलावून घेतले.

मी श्रीधर स्वामींना आपल्या घरी पाद्यपूजेसाठी बोलाविलेसमर्थ रामदास स्वामी महाराज की जय ! गोंदवलेकर महाराज की जय म्हणून शिष्य परिवारासह स्वामींनी माझ्या घरात प्रवेश केला. गोंदवलेकर महाराज आमच्या मातोश्रीचे गुरु, त्याही होत्याच वातावरण एकदम भारुन गेले. खूप आनंद झाला. जणू चैतन्याचाच अविष्कार आमच्या घरी झाला.

माझ्या घरी दोघांना बाधा झाली होती, एक आमचा प्रकाश आमचा मुलगा दुसरी माझ्या भावाची बायको. ती बाधा स्वामींनी काढून टाकली. आमच्या देवघरात ते आले. देवघरात असलेल्यागणपति आणि शालिग्रामयावर करण्यात आले आहे असे सांगीतले. आम्ही त्यांची पाद्यपूजा केली. आमच्या मातोश्री त्यावेळेस होत्या. आम्हाला खूपच त्रास होत होता. चार सहा महिन्याला घरात चोऱ्या होत. पण स्वामी येऊन गेल्यानंतर, आमचा हाही त्रास बंद झाला आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही पाद्यपूजेचे तीर्थ घातले, तिथेऔदुंबर कल्पवृक्षनिर्माण झाला. आज तो मोठा झाला आहे. त्याला आम्ही पार बांधून घेतला आहे. तो वृक्ष, स्वामींची आठवण सदैव ताजी ठेवणारा झाला आहे.

सज्जनगडावरून सुद्धा स्वामींनी आम्हाला सुपारी आणि प्रसाद पाठविला आहे. अत्यंत आपुलकीने आमची चौकशी करून आशीर्वाद दिला आहे. ‘अत्युच्ची पदी थोरही बिघडतोम्हणून एक सुभाषित ऐकले होते पण मी निश्चित सांगू शकतो की खरा थोर अत्युच्ची पदी बिघडत नाही. आणि छोटयाना विसरत तर नाहीच, उलट त्यावर आपली कृपेची पाखर घालतो. अशा भक्तवत्सल, विशाल हृदयी सद्गुरूचा, महापुरूषाचा, थोर महात्म्याचा जयजयकार करून, सर्वानी पण तसाच करावा ही प्रार्थना करून हे निवेदन संपवितो.

home-last-sec-img