Memories

९. लहानपण देगा देवा

श्रीमती छोटूताई भगोजी

श्रीधर माझा बालमित्र ! मी आणि तो एकाच वर्गात, पाचवीत, विवेक वर्धिनीत होतो. तेंव्हा मुले मुली एकत्रच होती. नंतर शाळा निराळ्या झाल्या. आमच्या वर्गांत मेहंदळेकर, शौचे, देगलूरकर, गोदावरी (कनकागिरी) विजया मोहोळकर, कृष्णाबाई, शर्मा, मनु गोगटे, गाडगीळ, भिडे वगैरे मुले मुली होत्या. श्रीधराची आठवण करताच माझ्या मनश्चक्षुसमोर संपूर्ण वर्गाचा देखावाच उभा राहिला. सईबाई, प्रमिलाबाई या आमच्या बाई. नाशीककर, नागरस हे आमचे शिक्षक ! शाळा वेगळ्या झाल्यावर सोनुबाई पहिली दुसरीला शिकवित. श्रीधर आणि मी एकत्र जवळ जवळच बसत असू!

एकत्रच डबा खात असू. कोणताहि खाण्याचा जिन्नस, मला सोडून तो खातच नसे. त्याचे घर दूरहुसेनीआलमला एक मठ आहे त्याच्या जवळच्या गल्लीत होते. तिकडे सर्वं मुस्लीम वस्ती. मुली सहसा पूल ओलांडून एकट्या दुकटया जात नसत.

. . १९६० ! सुमारे चाळीस एक वर्षांचा काळ लोटला होता. बालपणचा निष्पाप काळ केव्हांच संपून गेला. शालेय सौंगडी कुठे कुठे पांगले गेले, आठवणही येण्याइतके. प्रौढावस्था सुरु झाली. जीवनाची चांगली वाईट अंग पाहून, सुखदुःखाचे चटके सोसून मन परिपक्व झाले होते. दैनंदिन व्यवहारांत पुढे येणाऱ्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे त्यातून पार कसे पडायचे, हीच विवंचना लागून राहिलेली. याच सुमारास कोणी श्रीधर स्वामी, सज्जनगडचे, आले आहेत आणि फार छान प्रवचन देतात म्हणून ऐकण्यांत आले मी पण तें प्रवचन ऐकण्यास गेले. स्वामींचा चेहरा कुठे तरी पाहिलेला आहे, फार ओळखीचा आहे असे वाटू लागले. गर्दीतून वाट काढीत अगदी जवळ गेले. मी अद्याप विचार तन्द्रीतच होते. तोच मलाअगं तू इकडे कुठे, बरी आहेस ना ? कसे काय चालले आहे ? ” वगैरे प्रश्न ऐकू आले. श्रीधराने मला झटकन ओळखले होते. आणि त्याला अतिशय आनंदपण झाला होता.

श्रीधर देगलूरकर ! माझा बालमित्र, सहाध्यायी पण तो आज कोणत्या पदाला पोहोचला होता. हजारो लोक त्याच्या मागे होते. घरी बोलावीत होते, पूजा करीत होते, अनुग्रह घेत होते. त्याचे दोन शब्द ऐकण्यास अधीर होत होते, त्याच्या भेटीने तृप्त होत होते. किती फरक पडला होता त्यात, अंगावर भगवीवस्र, हसतमुख चेहरा, तोच गोड आवाज सर्वांना हवाहवासा वाटणारा ! आणि इतके असूनही कशातही लिप्त होणारा ! माझ्याशी तर अगदी सख्या भावाप्रमाणेच बोलत होता. सोमाजीगुड्याच्या बंगल्यावर, गर्दीमुळे एकदा आंत सोडले नाही तर त्याने लगेच विचारले, ” अरे, कुणाला रे अडवलत तुम्ही? माझी बहीण आहे ती ! येऊ द्या तिला आत, ” एवढ्या मोठया विभूतिची मी बहीण ! माझे मन तृप्तीने काठोकाठ भरलं.

सर्वजण स्वामीजी असे म्हणत असत. मी पण आता स्वामी असेच संबोधते. रोज मी त्यांच्या प्रवचनाला जात असे. त्यांचा मुक्काम सोमाजीगुडा येथील श्री धुंडीराज बहाद्दर यांच्या बंगल्यावर होता. आमच्या हातावर तें प्रसाद ठेवीत. ‘दुधभातकीति गोड लागे ! हातावरचकरतलभिक्षास्वामी घेत. मोजकेच घास खात. जेवणाखाण्याकडे लक्ष तरी कुठे होते ? पण मला, मुक्ताबाईला – ( नाईक ) आवर्जून प्रसाद देत असत.

माझ्या मनात आले की स्वामींना एकदा तरी आपल्या घरी बोलावावे म्हणून एके दिवशी मी त्यांना आमंत्रण दिले. तर ते म्हणालेअगं मी तुझ्या घरी जेवायलाच येणार आहे.” आम्ही पूजेची सर्व तयारी केली आणि वाट पहात बसलो‘ ‘जय जय रघुवीर समर्थस्वामी आले. माझ्या सूनबाईने त्यांना ओवाळले, आरती केली, आणि आत वर नेऊन पाटावर बसविले. तोच स्वामींची नजर उजव्या बाजूला भींतीवर टांगलेल्या लक्ष्मींच्या फोटोकडे गेली. त्या फोटोखाली एक यंत्र होते. अरे ! अरे हे काय म्हणत त्यानी तो फोटो, यंत्र काढले. इथे काही माहिती सांगणे आवश्यक आहे. काही दिवसापूर्वी आमच्या घरी x x नांवाचे गृहस्थ आले होते. त्यांना काही समजत असे. आमचा परिचय वाढला आणि आमच्या घरी जवळ जवळ वर्षभर तें राहिले. त्यांनीच आम्हाला लक्ष्मीचा फोटो दिला होता. यंत्र, डब्या, ताईत तर घरातल्या प्रत्येक माणसाला दिले होते. “ तिजोरी उघडी ठेवा, दारे उघडी ठेवाअसे ते म्हणत. लक्ष्मीपुढे पैसे टाकावयास सांगत. आमच्याच घरी नाही तर इथे बऱ्याच घरांत त्यानी हे प्रकार केले. पैसे जमा झाले की घेऊन जात. पण झाले काय की आमची स्थिती दिवसें दिवस खालावत होती. काय झाले तें कळेना. पण आम्हाला xxxxx चा संशय येऊ लागला. पण ते तर आता गेले होते. जेव्हा स्वामी आमच्या घरी आले तेव्हा त्यांनी, तोच लक्ष्मीचा फोटो काढावयास सांगीतला. सूनेच्या गळयांतले ताईत तर हातानेच ओढून काढले; आणि आम्हाला सांगितले की असे कोणालाही घरांत घेत जाऊ नकोस आणि बाहेर कोणतेही फोटो लावू नकोस. सर्व ताईत, डब्या यंत्रे वगैरे सर्व जमा करुन त्यानी आपल्या बरोबरच नेले, मग आम्ही त्यांना पूर्ण हकीकत सांगितली आणि रक्षण करण्यास सांगीतले

तेव्हा त्यांनी पूजेसाठी एक फोटो दिला. मला तर पायावर डोके ठेवण्यास सांगीतले आणि म्हणालेकाळजी करू नकोस, सर्व ठीक होईल मात्र घरांत कोणालाही
घेत जाऊ नका.” आम्ही रोज श्रीधर स्वामींच्या फोटोची पूजा करतो. तेव्हापासून मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

स्मृतीचा आणखी एक पडदा उघडला गेला. तो मात्र नंतरचा अगदी अलीकडच्या काळातील आहे. मला
बदरीनारायणाला जायचे होते. मी स्वामींच्या फोटो पुढे उभी राहिले आणि स्वामींना नमस्कार करून म्हणालेस्वामी, बदरीला जाण्याची इच्छा आहे. पायी चढायचे आहे. मला काहीही त्रास होवो.” नमस्कार करून मी निघाले. तुम्हाला खरे सुद्धा वाटणार नाही पण मला मात्र, माझ्या खांद्याला लागूनच कोणीतरी चालत आहे असे वाटे. तें स्वामीजीच असावेत. आणि अगदी शेवटपर्यंत ! कोणत्याही प्रकारचा त्रास होता बदरीला मी सुखरूप जाउन आले.

आठवणींचा कप्पा उघडला गेला आणि मला एकामागून एक अशा अनेक गोष्टी आठवल्या. ‘स्वामींबद्दल काही आठवणी सांगू शकाल का ? असे जेव्हा लीलाताईंनी मला विचारले तेव्हा मलाही वाटले नाही की इतके काही सांगू शकेन. आज केवढी मोठी विभूती, बालपणीची जवळीक मला लाभली, आणि शेवटी जो माझे कल्याण करुन गेली ती कायमच गेली याचे मला आता वाईट वाटते. पण त्याचा कीर्तिध्वज असाच उंच फडकत रहावा, त्याचा लाभ सर्वांना व्हावा, हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना करुन, हे निवेदन संपविते.

home-last-sec-img