।। श्रीराम समर्थ ।।ो
सज्जनगड
नोव्हेंबर
१. ‘न हि ज्ञानेन सदृशं’ या तत्त्वाचा अर्थ सांगून उपदेश करावा
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विंदति ।।
भगवद्गीता ४-३८
आत्मज्ञानाविना पवित्र साधना कोणतीही नाही. त्यामुळे, माया अविद्यारूपी अशुद्ध भावनारहित अशा अदृश्य आनंदस्वरूपाची प्राप्ती करून घेता येते.
२. श्रद्धावान् लभते ज्ञानम्’ – श्रद्धा म्हणजे काय ? श्रद्धेने ज्ञान कसे मिळविता येते? ज्ञान म्हणजे काय ? ज्ञानाने दर्शन कसे लाभते? दर्शन म्हणजे काय?
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेंद्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति ॥
भगवद्गीता ४-३९
गुरूच्या वेदवाक्यात विश्वास हीच श्रद्धा असते. त्याच्या उपदेशात विश्वास असेल तरच मुमुक्षू त्याप्रमाणे साधना करून, वैराग्यामुळे आत्मसाक्षात्कार करून घेऊन, जीवन्मुक्त होतात. मुमुक्षूने गुरुशरणागती, सेवा, वेदांतश्रवण, अभ्यास वगैरे साधना-क्रम, श्रद्धेने केले पाहिजेत. शिवाय मन व इंद्रियावर त्याने ताबा मिळविला असला पाहिजे. तो निष्प्रपंच अद्वितीय आनंद, तो परब्रह्म म्हणजेच आपण, असे आत्मज्ञान मिळवून, तृप्त होऊन थोड्या अवधीतच शांती मिळवून त्याचा अनुभव त्याला घेता येतो. लहानपणी आई-वडील मरून, शत्रुंनी राज्यापहरण केल्यानंतर, दासीच्या घरी वाढलेल्या, स्वतः ला दासीपुत्र समजणाऱ्या राजकुमाराला, अमात्य येऊन म्हणतात, ‘तू राजकुमारआहेस. आम्ही शत्रूवर मात करून राज्य परत मिळविले आहे. आता तुला नेऊन तुझा राज्याभिषेक करणार आहोत.’ त्यावर विश्वास ठेवला तर राज्यपद जसे प्राप्त होईल तसेच श्रीगुरू अज्ञानात असलेल्या जिवाला त्याच्या आत-बाहेर असलेले दृश्य दाखवून त्याचे आयुष्य उजळवतो. ‘तू अद्वितीय ज्ञानानंद आहेस, तूच परब्रह्म आहेस’ असे तो सांगतो, तेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवलास तरच मुक्त होशील. या मार्गाने जा म्हणून सांगितल्यानंतर आपण विश्वासाने तो मार्ग क्रमण केला तर आपण निर्दिष्ट जागी पोचू.
आपले यथार्थ रूप हे नुसते पंचभौतिक देह नसून आनंदघनब्रह्मरूप होय; असे जेव्हा आपण ठामपणे म्हणू शकतो, जेव्हा आपण विश्वास ठेवू शकतो, तेव्हा त्याला ‘आत्मज्ञान’ म्हणू शकू. श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय १३ श्लोक क्र. एक पासून सातव्या श्लोकापर्यंत ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत. ती पहा म्हणजे समजेल. वाऱ्याने ढग वाहत जातो, त्यानंतर सूर्यदर्शन होते, तसेच ज्ञानाने अज्ञानाचा पडदा सरकतो आणि आत्मसाक्षात्कार होतो.
३. असल्याने जाणीव होते का? की जाणीव असल्याने वास्तव समजत ? असणे आणि जाणीव यांत कार्य-कारणाचा संबंध आहे. यालाच जाणीव म्हणतात. जाणीव ही एकार्थाने एकरूप असते.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
( श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)