गुरुबंधू श्री. रामचंद्र सागर, वरदपूर यांस पाठविलेल्या कन्नडपत्राचा अनुवाद
॥ श्रीराम समर्थ ।।
सज्जनगड
आषाढ शु.।। १५ शके १८८१
दि. २७-७-१९६१
चि. रामचंद्र यांस आशीर्वाद.
१) मौन म्हणजे निःशब्दरीतीनें राहणे.
२) नि:शब्द ब्रह्मच आपले स्वरूप आहे ही दृढभावना कायम राहण्यासाठी मौन आचरले पाहिजे.
३) निर्विकल्प निःशब्द स्वरूपाचा साक्षात्कार हेंच मौनाचे ध्येय.
४) निर्विकल्प निःशब्द स्वरूपसाधनेसाठी मौनाचे महत्त्व आहे.
५) माया व तिची कार्ये ही सर्व अचिंत्य व शब्दाने सांगता न येण्यासारखी असल्यामुळे त्याविषयी काय बोलणार? म्हणूनच मौन राखावयाचे, आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप मनांस अप्राप्य असल्यामुळे वाणीने समजावून सांगणे अशक्य असल्याने त्या विषयी सुद्धा काय सांगावयाचें ? म्हणूनच मौनाची आवश्यकता आहे.
६) शब्द, वाणी यांनी न सांगतां, अंतरंगांत स्फूर्ति येतांच मौन
आचरले पाहिजे. यासच मौनाची उच्चावस्था म्हणतां येईल. हे न झाल्यास वर वर्णन केल्याप्रमाणे मनांतच विचार करीत मौनाचरण केले पाहिजे.
एकंदरीत तुझ्या सर्वप्रश्नांची उत्तरें क्रमशः दिली आहेत.
‘सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’
आनंदरुपी
श्रीधर
(श्री श्रीधर स्वामीजींची शतपत्रे या पुस्तकातून)