श्री. प. माधर्वानंदतीर्थ स्वामी यांना श्रींनी कुरगड्डी हून पाठवलेले पत्र
एकांतात राहून आत्मनिष्ठा वाढविण्याची आज्ञा झाली आहे. साक्षात्कार होईल असे आश्वासन आहे. बिलगुंजीस जाण्यास हरकत नाही मात्र कसलिहि उपाधि लावून घेवू नये. गुहेत अभ्यासाला बसावे. मनाच्या एकाग्रतेचा होईल तितका जास्त अभ्यास करावा. होईल तितका अभ्यास नेटून करावा, कोणी आयाबाया सेवेला राहतो म्हटले तरी तूर्त लोकांना पूर्ण पूज्यबुद्धि उत्पन होई पर्यंत अवकाश न देणे उत्तम. स्वतःकरतां कोणच्याहि रितीचा द्रव्य संचय आजीबात न करणे हितावह . संन्यास म्हणजे आत्मसाक्षात्काराकरता द्वैत प्रपंचाचा त्याग.आत्मज्ञानविरोधी साधनांचा अव्हेर. निजात्म निष्ठा प्रेषोच्चरण म्हणजे ‘संन्यस्तं मया’, या संकल्पानेच संन्यास होतो. व एवढा उच्चार आला की तो संन्यासीच दुसरे काहीं होवो अथवा न होवो. संन्यास विध्योत्त
झाला नाही ही शंका नको. असमाधानाला कसलेच कारण उरले नाही. दंडोपासना ऐच्छिक आहे. दंडाने गौरव जास्त. अखंड आत्मचिंतनात गढून राहाण्याकरताच संन्यास घ्यावा. बाकी कसलीहि कर्म कटकट त्याला लागत नाहीं, कर्मलोप नसतो.म्हणून, हा एक त्याला शास्त्रीय विधि आहे. यांत आत्मचिंतनाविरहित दुसरा धर्म नाहीं. एक आत्मनिष्ठेचेच बंधन. ज्या योगाने त्याला सुखाने आत्मचिंतनात काल घालविता येईल त्या प्रमाणे त्याने आपल्या दिनचर्येची आखणी करावी. दुसरी कसलीहि त्याला उपासना नाही. ना कसला वेगळा आचार नाही. माझी कृपा आहे. कसल्याहि चिंतेचे कारण नाही. सर्व दृष्टीनेच चोहोकडून आत्माचिंतनात मग्न होऊन राहावयाला अत्यंत अनुकूल आश्रम म्हणजे संन्यास. इथे सर्व स्वातंत्र्य आहे. आपणहून आपले अनहीत न केले म्हणजे झाले.
श्रीधरस्वामी