॥श्री राम समर्थ ॥
चि. हरगोपाळास आशीर्वाद
बाळ, तू विचारलेले प्रश्र आणि चि. लक्ष्मीनारायणाने सांगितलेल्या काही गोष्टी पाहता असे समजते, की तुला आत्मज्ञानाविषयी थोडेफार समजले आहे. हे खरोखरीच परम भाग्याचे लक्षण आहे. खूप आनंद झाला. बाळ! तत्वज्ञानाच्या साधकाला, सर्वप्रथम अहंकार, ममकार यांचा त्याग करावा लागतो. विनय, सदाचार, शांत स्वभाव, सहनशीलता, श्रीगुरूचरणी अचंचल भक्ती, जितेंद्रियत्व, मृदु-मधुर, सत्य सरळ जीवन स्वरूपानंदाने शुद्धाचाराने जगावे, त्यांच्या मदतीने सारी विघ्ने पार करून, विवेकान गांभीर्य सांभाळून तेजस्वी पुरुष होण्याचे प्रयत्न करायला हवेत. हे सारे सदगुण अंगी बाणवायला हवेत.
आहारशुध्दया चित्तशुद्धिः ।
चित्तशुध्दया ध्रुवा स्मृतिः ।।
१. अन्नाकडे मन ओढते म्हणून आहारशुद्धी हवी. त्याच प्रमाणात आत्मनिश्चय मग उजळून निघतो, त्यानंतर देहात्मबुद्धी, विषयवासना, कामक्रोधादी दोष सूर्योदयानंतर विरघळून जाणाऱ्या धुक्याप्रमाणे नाहीसे होऊन सारे चांगले स्पष्ट होते. लवकर झोपून लवकर उठणे, हे माणसाला आरोग्यवान ठेवते; शिवाय श्रीमंत व प्रज्ञावंतही बनवते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू, आळशी माणसाचे जीवन हे आसुरी वृत्तीचे कार्यक्षेत्रच असते. स्नान, संध्या, उपासना, ध्यान, जप, श्रवण, मनन, निदिध्यास; थोरामोठ्यांचा, गुरुजनांचा आदर करणे, सेवा करणे, विनीत होऊन आपल्या शंकांचे समाधान करून घेणे, सगळ्या साधकांशी परिशुद्ध व उत्तम व्यवहार ठेवणे हे सांभाळायला हवे.
२. आश्रमात साधकाने वेळेचे भान ठेवायला हवे, शिवाय सूत्रबद्धता व साधक लक्षणांचाही सांभाळ करायला हवा. मनात येईल तसे १०-११ वाजता उठायचे, चहा-डबलरोटी खायची, १२ वाजता अंघोळ करायची, संध्या-उपासना करून काय होणार आहे, म्हणून सरळ जेवायला बसायचे, इतरांच्या चुका काढत बसायचे, असे चालले तर साक्षात्कार होणे कठीण जाते. बंधने नेहमीच आपल्याला वाहत्या कालव्यासारखी सरळ नेतात हे साधकाने जाणले पाहिजे.
बाळ, तू सुपुत्र हो; सच्चा शिष्य हो. इतरांना आदर्श वाटेल असे जीवन जग.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)