Letters

पत्र.क्र. १०४

॥ श्री राम समर्थ ॥

निज ज्येष्ठ शु. १४
दुपारी ३ वा.
८-१-१९६१

चि. रामचंद्रास आशीर्वाद.

बाळ,

तुझ्या वडिलांचा तंटा-तक्रार न करणारा, निरुपद्रवी स्वभाव पाहन खूप आनंद झाला. तुझे पत्र संपूर्ण वाचले. गायत्री, अष्टाक्षरी लिहून शेवटी श्री गणपती व सुब्रह्मण्य यांचे नामस्मरण केले आहेस. त्याचा १०८ वेळा जप करून, श्रीराम व श्रीसमर्थांची सेवा कर, जमतील तेवढे नमस्कार घाल आणि कन्नड गुरुचरित्रातील एक अध्याय वाच. त्यानंतर दूध घे आणि श्रीराम व श्रीमारुती यांचा जप करायला बस. ११.३० ते १२ वाजेपर्यंत जप आवरून, अर्घ्य देऊन काही वेळ गायत्री जप कर. नंतर श्रीसमर्थांचे कपडे धुवून घे. त्यानंतर श्रीराम व श्रीसमर्थांना नमस्कार करून, १५ श्लोक म्हणून, जेवणानंतर अर्थासहित भगवद्गीता वाच. नंतर गुरुगीता पठण कर; त्यानंतर मधुकरीच्या नैवेद्याचे सेवन कर. चि. चंद्रशेखर करतो तसे अधे-मधे लागेल तेवढे ताक पी व आचमन करून श्रीगुरुगीतेचे पारायण कर. जेवणानंतर आचमन करून श्रीदत्तस्तवराजचे १५-२० श्लोक, भगवद्गीतेतील २५ श्लोक किंवा एखादा अध्याय अर्थसमेत वाच. मनाचे १३ श्लोक, श्रीदासबोधाचे २ समास वाचत जा. मनाचे सटीक श्लोक, कन्नड श्रीदासबोध, मराठी समास वाचून जाणून घे. श्रीधर कुटीत कन्नड दासबोध, कन्नड मनोबोध असावेत. लक्ष्मीनारायणास विचारले तर तो तुला पुस्तके शोधून देईल. बुटक्या नारायणाकडे मनोबोध, कन्नड दासबोध यांच्या अर्थाची पुस्तके आहेत, मी ती पाहिली आहेत, ती घेऊन वाच. सायंकाळी स्नानसंध्या आटोपून श्रीरामसमर्थांना अष्टके म्हणता म्हणता शक्य होतील तितके नमस्कार घाल. ती अनायासे तुझ्या तोंडातून बाहेर पडतीलच. अष्टके, सवाया, त्यानंतर स्वात्मनिरूपण, भजन, श्रीराम-समर्थांची आरती, तुझ्या गुरूची आरती हे सगळे आटोपून फलाहार घेऊन १०च्या सुमारास झोपावे.

तू समर्थांची सेवा करीत असल्याचे पाहून फार बरे वाटले. गुरुसेवेचे फळ खूप मोठे असते. गुरुसेवा करूनच कल्याण स्वामी शिष्योत्तम झाले. जो गुरुसेवा करतो त्याच्यावर गुरुकृपा लौकर होते. दुपारच्या वेळी श्रीराम, गीता, श्रीसमर्थ, श्रीआंजनेय, तुझे गुरू या सर्वांची, जशी जमेल तशी मानसपूजा करीत जा. आवश्यकता वाटेल तिथे श्रीधर कुटीची सेवाही कर. गोसेवा तर मोठीच आहे. जो गोसेवा करतो, त्याच्यावर माझी कृपा लौकर होते.

॥ ॐ गं गणपतये नमः ॥
॥ ॐ सुं सुब्रह्मण्याय नमः ॥

या दोन मंत्रांचा जप करीत रहा. बाकी सर्व ठीक आहे. पत्राचे उत्तर द्यायला थोडा उशीर झाला म्हणून तुझ्यावर माझी कृपा नाही, असे समजू नकोस. तू म्हणतोस तसा कोणीही गुरुभक्त खड्ड्यात पडणार नाही. तुम्हा सर्वांवर माझी कृपा आहे. सुखी रहा. सर्वांचे भले होवो.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img