॥ श्रीराम समर्थ॥
सज्जनगड
मधमाशी व भुंगा फुलातील मधाच्या आशेने फुलावर जाऊन बसतात. त्या फुलात रस नाही, हे समजताच ते दुसऱ्या फुलावर मधाचा शोध घेतात, तसेच आत्मज्ञानाची ओढ असलेला व मोक्षाची अपेक्षा असणारा साधक गुरूचा आश्रय घेतो. त्या गुरूमध्ये आत्मज्ञान नसेल तर ते प्राप्त करण्यासाठी आणखी एका आत्मसाक्षात्कारी गुरूकडे त्याने जावे असा याचा अर्थ.
१७४ ते १७९ या श्लोकांमध्ये त्याज्य गुरूची लक्षणे कशी असतात हे सांगितले आहे. पण अशा गुरूची गाठ पडली असेल तर त्याचा त्याग कसा करावा, याबद्दल फारसा विचार न करता मधमाशी व भुंगा यांचे उदाहरण देऊन त्या गुरूला त्यागून दुसऱ्याचा आश्रय घ्यावा, असेही सांगितले आहे. त्याच्याच पुढे श्री शिवाने योग्य सद्गुरूची लक्षणे २४२ ते २६६ या श्लोकांमध्ये सांगितली आहेत. तसे पाहिले तर सबंध गुरुगीता ही गुरुलक्षणांबद्दलच सांगते. ते व्यवस्थित वाचून घे. गुरुतत्त्वाचे ज्ञान त्यात खरोखरीच ओतून ठेवले आहे.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
( श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)