Letters

पत्र.क्र. १०७

॥ श्री गुरवे नम: ॥

चि. जानकीस

पोरी! उद्यापासून लिहिणे, सांगणे, ऐकणे काही करायचे नाही. पोरांनी हट्ट न करता, व्यवस्थित जेवणखाण घेऊन, आनंदाने गुरुसेवा, अनुष्ठाने करून, समाधानी रहावे. माझे कोण आहे, असा विचार कधीही करू नये. ज्याच्या भरोशावर तू येथे आली आहेस तो गुरुनाथ तुझा नाही का? अगदी लहान मुलांसारखी करतेस; व्यवस्थित तप कर. तू जे नेहमी ‘मी मी’ म्हणतेस ती एक जाण आहे. आनंदस्वरूपी परमात्म्याची जाण. त्यात बाई किंवा पुरुष यांचा संबंध नसतो. देहाला आपलेपणाची जाण राहत नाही. तो फक्त रक्त, मांस, मल, मूत्र, हाडे व स्नायूंचा एक गोळा असतो. जेव्हा तु, मी म्हणतेस तेव्हा फक्त आनंदाची जाण घेतेस. आनंदरूपेच रहा, हा तुला माझा आशीर्वाद आहे. तुझ्या हृदयात वसलेल्या शुभ परमात्म्याचे रूप हे केवळ आनंदरूप आहे.

निवृत्तिमार्ग म्हणजे जगाची उत्पत्ती, जगाचे ज्ञान, या सर्वांचा त्याग करून, त्याव्यतिरिक्त असलेले आनंद ब्रह्मस्वरूप असे काहीतरी एक आहे, तेच मी असे समजून गुरुसेवा, आज्ञापालन, ब्रह्मतत्त्वाचे श्रवण, मनन, चिंतन, ध्यान करून सबंध सृष्टीला विसरून, आनंदरूप ब्रह्म-श्रीगुरूच्या कृपेने आपण जगत आहोत याची जाण ठेवणे.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
( श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img