Letters

पत्र.क्र. १०९

॥ श्रीराम समर्थ ॥

१. अखंड प्रणव जप करावा. प्रणव म्हणज आपले आनंदघन ब्रह्मस्वरूप; त्याचे ध्यान करावे. नित्यनेमाने १२००० वेळा जप करावा.

२. एक वर्ष मौन पाळावे.

३. आश्रमात आलेली सगळी भिक्षा एकत्र करून करतलभिक्षा करावे. याला आयाजित भिक्षा म्हणतात. पोटाएवढी ओंजळ करून भिक्षा स्वीकारावी. सकाळ, सायंकाळ, कषाय व फळे घ्यावीत. वर्षभर दुसरीकडे कोठेही भिक्षा मागू नये.

४. आपले आनंदघनरूप जे आहे त्याचे ध्यान करावे व गुरूला १३ वेळा ‘नमः शांताय…’ असे म्हणून त्रिकाल नमस्कार करावा.

५. शक्य असल्यास त्रिकाल स्नान करावे. नाही जमले तर सकाळ-संध्याकाळ, किंवा शौचास गेल्यास स्नान करण्याची सवय ठेवावी, मग नुसते सकाळचे स्नान चालेल. आत्मसाक्षात्कार होण्याचा ध्यास घेतल्यास, एकांतात बसून आनंदरूपाचे ध्यान केल्यास आपोआप सगळे प्राप्त होईल.

६. मांडूक्योपनिषद्, शुकरहस्योपनिषद्, निर्वाण उपनिषद् यांचे पारायण कर. मांडूक्योपनिषद् मध्ये प्रणवाविषयी सांगितले आहे, निर्वाणात संन्यासाबद्दल सांगितले आहे. ईश्वर ही तेथील ग्रामदेवता असल्याने कैवल्योपनिषद्चे पारायण करावे. त्यात ब्रह्मविद्येबद्दल बरेच काही सांगितले आहे. ही सारी छोटी छोटी उपनिषदे आहेत. त्यांच्याच प्रमाणे अवधूत मार्गही आहे. अवधूत उपनिषदाचे पारायणही करावे. श्री दत्तात्रयांनी संस्कृतीला सांगितलेले असे ते उपनिषद् आहे… अवधूत लक्षणे त्यात आहेत. श्री दत्तात्रय हे अवधूत – मार्ग प्रवर्तक आहेत.

अंगात बळ असेपर्यंत माणसाला कशाचीही पर्वा नसते. पूर्वी मी, देवाच्या मंडपाला बांधलेले ज्वारीचे कणीस खाऊन रहायचो; पण आता ते शक्य आहे का? यावरूनच सारे काही लक्षात घे म्हणजे झाले.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img