श्रीक्षेत्र वरदपूर
अन्नाचे महत्त्व
काही प्रसंग, काही विषय असे असतात, की तेव्हा काहीतरी सांगावे, उपदेश करावा, असे वाटणे साहजिक आहे. आपल्या वैदिक धर्मात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले दिसून येते. अन्नसूक्त नावाचे एक सूक्तच स्वतंत्रपणे लिहिले आहे. आर्य संस्कृतीत त्याचा अर्थ व्यवस्थित सांगितला आहे. एक म्हातारे गृहस्थ वारंवार याविषयी सांगायचे, की जो अन्न शिजवितो तो ब्रह्मनिष्ठ असायला हवा. ज्याचे अन्न आपण खातो, त्याच्यासारखेच आपणही होतो. वाईट लोकांचे धान्य दूषित असते. चोरीचे धान्य घेतलेल्या एका संन्याशाला चोरी करावी असे वाटले. पण त्याने विचार केला, की आपल्याला असे का वाटले? मग त्याच्या लक्षात आले, की हा फरक आपण खाल्लेल्या धान्यामुळे आला असावा. त्याने ते अन्न ओकून काढल्यावर त्याला बरे वाटले. अन्न खाणाऱ्या साधकाचे मनही पवित्र असायला हवे. ते गृहस्थ म्हणाले, ते योग्यच आहे. (छांदोग्य अ-६-६-५) अन्नमयं हि सौम्य मनः॥ मन अन्नाच्या सूक्ष्म अंशानेच जन्म घेते. अन्नमय होऊन राहणे म्हणजेच अन्नाप्रमाणे पवित्र किंवा अपवित्र असणे असे म्हणतात. या छांदोग्योपनिषदात दुसऱ्या अध्यायाच्या २६ व्या खंडात म्हटले आहे: आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः सत्त्वशुद्धौ ध्रुवा स्मृतिः॥ स्मृतिलाभे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः॥ आहार शुद्ध व सात्त्विक असेल तर माणूस विकाररहित सत्त्वशील होतो. श्री गुरूंच्या सान्निध्यात, आत्म्याचा विचार करीत राहणा-या अशा पवित्र मनाच्या साधकाच्या मनात आत्मस्वरूपाची स्मृती काया राहते. अद्वितीय अशा निर्विकल्प आनंद-स्वरूपाची जाणीव होऊन जेव्हा ठाम निश्चय केला जातो, तेव्हा सगळ्या वासना अंधारात आपोआप लुप्त होऊन जातात असे म्हणतात. स्वयंपाक करणारा ज्या भावनेने स्वयंपाक करतो – म्हणजे रागारागाने, तावातावाने, लक्ष न देता किंवा विकारवश होऊन करतो – तेव्हा त्या जेवणाला चव नसते. त्यामुळे जेवणाराही तृप्त होत नाही. त्याचे मन शांत रहात नाही. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याने तो मन लावून करावा. आता माझी तप:साधना चाललेली आहे. अशा वेळी परिस्थिती जरा नाजूक असते. अशा वेळी जे सेवा करायला येतात. त्यांनी शुचिर्भूत होऊन, भक्तिभावाने यावे व आपल्या हुशारीचाही उपयोग करावा. माझे मन जितके शांत असेल तितकी माझी तपस्या चांगली होईल. त्यामुळे फक्त मलाच फायदा होत नाही, तर लोकांनाही त्याचा फायदा होतो. भिक्षा व्यवस्थित मिळाली नाही म्हणून मी हे सांगत नाही; पण सर्वांगीण विचार करून मी आपल्याला एक सूचना देतोय. श्री नरसिंहदेवांनी मला अनेक वेळा सांगितले आहे, की चांगल्या लोकांना निवडून त्यांच्याचकडून भिक्षा घे. म्हणून, जे मला भिक्षा देतात त्यांनी भिक्षा देऊन होईस्तवर मौन पाळावे. जप, ध्यान करीत रहावे. आपल्या खोलीतून अकारण बाहेर येऊ नये, त्याचे मन चंचल नसावे. मन एकाग्र करूनच भिक्षा वाढावी. खरं तर हे एक अनुष्ठानच आहे. यात काही चुकले तरी मला लगेच समजते. त्या भिक्षेला चव नसते, मन कंटाळते व तब्येतही बिघडते. त्यामुळे यानंतर भिक्षा देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की पूर्ण लक्ष देऊन, भक्तीने, पवित्रतेने व चांगुलपणाने भिक्षा घालावी. आता मला फक्त खीरच चालते. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करण्याची तसदीही घ्यायची गरज नाही. रोजच्या रोज तोच एक प्रकार करायचा, त्यामुळे विचारणे-सांगणे यांची कटकटच नाही. एका पंचामृताच्या भांड्याएवढा तांदूळ घ्यायचा. तेवढ्याच दुधांत अर्धा तासभर भिजत ठेवायचा. नंतर चौपट दधांत मऊ होईस्तवर शिजवायचा. शिजताना अर्धी लवंग, वेलदोड्याचे दोन दाणे, एक काळी मिरी हे टाकले की झाले. त्यानंतर पंधरा मिनिटे तो भात झाकून ठेवला तर तो फुलासारखा फुलतो. त्याच्या झाकणावर दोन निखारे ठेवले तरी
चालते. तासाभराचे तर काम, पदार्थ एकच असल्याने तो चांगलाच होतो, खूप गोष्टींकडे आपले लक्ष असले की पदार्थ बिघडण्याचा धोका असतो, माझ्या जेवणाची सेवा ज्यांना करायची आहे त्यांनी कृपया या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. इतरांनीही लक्षात ठेवल्यास उत्तमच होईल, पाहिलेत, स्वयंपाक करणाऱ्यांवर किती जबाबदारी असते ती?
जेवण हे कसेबसे उरकायचे नसते. तो एक प्रकारचा यज्ञच आहे, असे वेदांमध्ये म्हटले आहे व थोरामोठ्यांनीही सांगितले आहे. देहांत असलेल्या वैश्वानर नावाच्या परमेश्वररूपात असणाऱ्या जठराग्नीला दिलेली पवित्र आहुती म्हणजेच भोजन, नामोच्चारण करीतच ते करायचे असते. चांगले श्लोक म्हटले तर वातावरण पवित्र होते. भोजनसमयी पंक्तीत बसलेले लोकही पवित्र असायला हवेत. स्वयंपाक करणारे, वाढणारे हेही पवित्र असायला हवेत. डोळ्यांसमोर कोणतीही अपवित्र वस्तू नसावी, नैवेद्य म्हणून वैश्वदेवाचाच स्वयंपाक हवा. मन शांत, उल्हसित असतानाच जेवावे, जेऊ घालावे व स्वयंपाक करावा. शास्त्र-जाणकारांनी सांगितले आहे की, हे सारे नियम पाळल्याने अन्न जिरून, रस-रक्तादि धातूंमध्ये सामावून त्याचे परिवर्तन मनात होते, हे आपण विसरू नये. ऐकून विसरून गेलात तर त्याला अर्थ नाही, सर्वांनी ते अंमलात आणावे. य: क्रियावान् स पंडित: ऐकून जो अंमलात आणतो तोच पंडित. अन्नामुळेच शरीर आहे, अन्न हेच जीवन आहे, त्याच्यामुळेच पंचप्राण देहात आहेत. या सर्वांनी आपापले काम व्यवस्थित पार पाडले तरच आरोग्य चांगले राहून ताकद मिळते. ताकद असली तरच तपश्चर्या करता येते. तपश्चर्या केल्याने श्रद्धा निर्माण होते, श्रद्धेने धारणा, त्यामुळे चांगली वासना, वासनेमुळे चांगले मन, शांत मनामुळे आत्मचिंतन, आत्मचिंतनामुळे आत्मस्मृती अथवा निश्चय, आत्मस्मृतीपायी अखंड धारणा आणि त्यामुळे आत्मानुरूप समाधी, समाधीमुळे साक्षात्कार किंवा आनंदघन ब्रह्मस्वरूपाचे नित्य ऐक्य, पवित्र अन्नापायीच सगळे काही प्राप्त होते, असे महानारायण उपनिषदातील २३ व्या खंडात सांगितले आहे.
पाहिलेत, अन्नाचे महत्त्व किती आहे ते? सारे जण चांगली सेवा
करून सुखी रहा.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)