© श्रीधर संदेश
|| श्रीराम समर्थ ।।
चि. वि. द. कुलकर्णी यांस आशीर्वाद
१४-३-१९६० चे पत्र मिळाले. श्रीरामजन्मोत्सव करण्याचे जे मनात आणले आहे ते अत्यंत स्त्युत्य आहे. क्षेमसमाचार वाचून आनंद अत्यंत झाला. देऊळ असल्यास तेथे मूर्ती असतातच, काहींच्या घरी बारक्या मुर्ती असतात व काही पट्टाभिषेकाचा चित्रपट अथवा चित्र हे तीन उत्सव करतात. झाडून सारवून जागा शुद्ध केल्यानंतर ती वरून तोरणादिकांनी अलंकृत करावी. प्रतीपदेपासून नवमीपर्यंत खालील कार्यकम ठेवावा.
५ वाजता स्नान उरकून भूपाळ्या स्तोत्र म्हणत बसावे. सूर्योदयाच्या पुर्वी साधारण अरुणोदयाला काकड आरती करावी. पुढे संध्यादिक आन्हीक आटोपून प्रात:पूजा करावी. ९-९|| च्या सुमारास माध्यान्हपूजेस प्रारंभ करून वेळेप्रमाणे कमी अधिक वेळात ती संपवावी. श्री रामाष्टोत्तर शतनामावली मिळाल्यास नामागणित एकेक तुळशीपत्र वहावे. महानैवेद्याच्या पूर्वी अध्यात्म रामायणातील बालकांडाचे पारायण नऊ दिवस पूर्ण करण्याच्या बेताने वाचावे. त्यातील श्रीराम हृदय, श्रीरामगीता याचेही पारायण शक्यतेच्या दृष्टीने ठेवावे. त्यानंतर महानैवेद्य दाखवून खालील आरत्या म्हणून आरती करावी. वैदिक ब्राह्मण असल्यास त्या त्या वेळी तो ते ते मंत्र म्हणतोच. काही वेळा वेदोक्त आरती म्हणून झाल्यावर या बाकीच्या आरत्या म्हणाव्यात. (१) साफल्या निजवल्या (२) सुवरवरदायिनी (३) सत्राणे उड्डाणे (४) नाना देही देव (५) सुखसरिता दुःखहरिता (६) ब्रह्माविष्णुहरादिक नंतर मंत्रपुष्प वाहून प्रदक्षिणा नमस्कार करावे. प्रसाद घेऊन कामावर रुजू व्हावे. वेळ नसल्यास १,३,६ आरत्या म्हणाव्यात. वेळेत सर्व बसवावे. कामावरून आल्यानंतर स्नान करून संध्या आटोपावी व अनुदिनी अनुतापे हे एकतरी अष्टक म्हणावे. (१) वंदिला गजानन (२) नाम श्रीराम सुंदर (३) रामदूत वायुसूत (४) श्री समर्थ मुख्य प्राण, निदान या चार सवाया खड्या आवाजात म्हणाव्यात. जोहार सवायानंतर म्हणावयाचा असतो. एवढे झाल्यावर सायंपूजा करावी. नैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा, झाल्यानंतर “वदन सुहास्य” व “त्रिविध ताप हारक हे गुरुपाय” दोन पदे म्हणावीत. यापुढे नवविधा भक्तीचा एकेक समास श्लोक वाचावे. या वाचनापुर्वीचे नमन व नंतर श्रीमद् दासबोध, मनोबोध यांची आरती म्हणावी. संप्रदायिक पुढचे अभंगही वेळ असल्यास म्हणावे. गाण्याचे अंग असल्यास १-२ अभंग म्हणून सायंकाळच्या उपासनेची पूर्तता करून रात्रीच्या भोजनास जावे, साधारण रुपरेषा अशी आहे. वेळेप्रमाणे कमी अधिक करावी, भक्तीभावाने केलेली थोडी फार सेवा श्रीचरणी रूजू होतेच होते, हा विश्वास बाळगावा.
ईशसेवा ही सदैव अभ्युदय नि श्रेयस्कर असते. त्याबद्दल कोण संशय बाळगील ? सर्वतोपरी धन्य व्हा ! श्री गुरुदेवतांचा पूर्ण अनुग्रह होवो. व्यावहारिक आणि तशाच पारमार्थिक जीवनात आघाडी मारून सर्वतोपरी महान सत्कीर्तीचे थोर पुरुष व्हा. तुम्हा सर्वांचेच जीवन पूर्ण असे दिव्य आदर्शत्म होवो. सर्वच कृतार्थ व्हा. “सर्वे जन : सुखिनो भवन्तु”
श्रीधर