Letters

पत्र.क्र. ११३

॥ श्री गुरुवे नमः ॥

चि. लक्ष्मीस आशीर्वाद.

गुरूपदेशितैर्मार्गमन:शुद्धिस्तु कारयेत् । अनित्यं खंडयेत्सर्वं यत्किंचिदात्मगोचरम ।।
(गुरुगीता ११२)

बाळ, तुझे पत्र वाचले. श्रीगुरुसन्निधातुन जाण्याचे दुःख होणे स्वाभाविक आहे. ‘लहान मुले जेव्हा आईला सोडून जातात तेव्हा त्यांची मन:स्थिती काय असते ते तेच जाणोत.’ तू जे लिहिले आहेस ते खरेच आहे. आईला जेव्हा काम असते तेव्हा ती आपल्या बाळाला मोठ्या बहिणीकडे सोपविते. तसेच मी तुला तुझ्या बहिणीकडे काशीला पाठविले. हे पहा बाळ, आत्ताच्या तुझ्या परिस्थितीत ही जागा तुला राहण्यास योग्य झाली नसती, तुला त्याचा त्रास झाला असता. तुझ्या हितासाठीच तर तुला मी तिथे पाठविले. माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी वागलो. त्यातच आपल्या दोघांचेही हित होते. तुला न दुखवता मी मायेने तुला समजावले, एवढेच.

मातेला आपली सगळी मुले सारखीच प्रिय असतात, पण मुलांना ते समजत नाही; मग ती तिला म्हणत राहतात की, ‘तुझे माझ्यापेक्षा अमक्यावर, तमक्यावर फार प्रेम आहे.’ तसेच तूही म्हणत आहेस. पण खरोखर तसे काही नाही. सगळे शिष्यच ना? एकाच गुरूच्या शरणी तुम्ही आले आहात, म्हणजे सगळे मोक्षप्राप्तीसाठीच आले आहात. सर्वांना समान मार्ग दाखवला जातो. आत्मप्राप्तीत भेद होत नाही. गुरू सर्वांना आनंदरूप ब्रह्म मानतो, त्यांचे अज्ञान नाहीसे करून त्यांच्या सत्यस्वरूपात त्यांना ठेवतो. यात तो भेदभाव करीत नाही म्हटल्यावर, एकाला जास्त व दुसऱ्यावर कमी प्रेम करतो असे होत नाही. लाडाने बोलणाऱ्या बाळाला जवळ घेऊन त्याचे लाड केले तरी, ‘बाळ, सारे जण माझीच लेकरे म्हणून आई जशी पाठीवरून हात फिरविते तसेच गुरू ‘पोरांनो, तुम्ही सारेजण मला सारखेच’ असे वात्सल्याने सांगतो.

गुरु सत्य सांगतो त्यामुळे तो सर्वसमान असतो, ही गोष्ट खरीच आहे. बाळ, एका सुषुप्तीचे अनुभव पाहता, आपले स्वरूप म्हणजे केवळ आनंद, हे जाणून त्या अज्ञानातून जागृत-स्वप्नांत नामरूप भाव होईल म्हणून, स्वरूप प्राप्त करायला जागृत-स्वप्नांचे दृश्य, त्यांना कारणीभूत ठरलेल्या अज्ञानाला नाहीसे करून, आपले स्वरूप म्हणजे केवळ आनंदस्वरूप हे जाणून कोणतीही वासना न बाळगता केवळ आनंदस्वरूपात राहणे हेच खरे, हे स्पष्ट होते. यालाच निवृत्तिमार्ग म्हणतात. हाच प्रपंचाचा त्याग. हाच परमार्थ, यालाच ब्राह्मी स्थिती किंवा आत्मस्थिती म्हणतात.

या खऱ्या स्थितीत, स्त्री-पुरुष, उच्च-नीच असे भेदभाव राहत नाहीत असे तू लिहिले आहेस ते तंतोतंत खरे आहे. गुरूही तेच सांगतो. तू तशीच रहा बाळ. तुझे विचार चांगले आहेत.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
( श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img