Letters

पत्र.क्र. ११४

॥ श्री गुरुवे नमः ॥

बाळ,
मी तुला काशीला पाठविले ते तुझ्या हितासाठीच. तेही माझ्या गुरूची आज्ञा घेऊन, देवानेही परवानगी दिली होती. एखाद्या साधकाला एखाद्या वेळी एखादी जागा उपयोगी असते.

उपाया देशकालाद्या: संत्यस्मिन् सहकारिणः । असे पूज्यपाद शंकराचार्यांचे म्हणणे आहे. काशीला ‘अविमुक्त क्षेत्र’ म्हणतात. काशीक्षेत्री राहणाऱ्याला मुक्ती मिळाल्याशिवाय रहात नाही, असा त्याचा अर्थ. ‘अविमुक्तं निषेवेत’ काशीतच वास करावा. ‘अविमुक्तं न विमुञ्चेत ।’ मुमुक्षू झालेल्याने काशी सोडू नये, असा याचा अर्थ. या गोष्टी काशीक्षेत्राचे महत्त्व सांगतात. तुझ्यावर ईश्वरकृपा आहे. तुझा कुलदेवही ईश्वरच आहे. त्याची इच्छा आहे की, तू काशीतच रहावेस. तेथील श्री श्रीधरस्फूर्ति निवास आश्रम माझाच आहे. तेथेही माझे संपूर्ण अस्तित्व आहे. आश्रमाचे मी रक्षणही करतो, शिवाय तुम्हा सर्वांची काळजी घ्यायला, तुमच्यापेक्षा अनुभवी असलेली आक्का माझे प्रतिनिधित्व करते. ‘गुरोराज्ञा प्रकुर्वित’ – तू काशीला जावे. ही जशी माझी आज्ञा होती, तशीच मला माझ्या गुरूची आज्ञा होती, की तुला पाठवावे. तू माझी आजा पाळलीस तशीच मीही माझ्या गुरूची आज्ञा पाळली. आपल्या दोघांचे हित यात आहे, असे तुला वाटत नाही का? यानंतर तू काशीतच राहिलीस तरी तुला कोणतेही कष्ट होणार नाहीत, याची खबरदारी गुरुने घेतली आहे.

‘ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तित्रयविभागिने ।
व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः ॥’ श्री शंकराचार्यांचा हा श्लोक तुला तोंडपाठ आहे. या श्लोकात, ईश्वर, गुरू, आत्मा या रूपात प्रकाशमान असलेल्या, सगळीकडे आकाशाप्रमाणे व्याप्त असलेल्या आनंदघनरूप दक्षिणामूर्तीला ब्रह्मस्वरूप म्हणून आपण नमस्कार करतो.

‘सोऽहं भावो नमस्कारः’ नमस्कार हा ऐक्य दाखवितो. या श्लोकात, हे स्पष्टपणे सांगितले आहे की आपले, ईश्वराचे व गुरूचे स्वरूप हे सर्वत्र पसरलेल्या आनंदघन परब्रह्माचेच प्रतीक आहे, तत्त्वज्ञानाचा परिचय आहे; तेव्हा याविषयी जास्त काही सांगायची गरज नाही. तुझ्या निवृत्तिमार्गात कोणतेही विघ्न न येवो व तु आनंदस्वरूपात स्वत:ला विसरून जीवन्मुक्त होऊन रहा, असा माझा आशीर्वाद तुला आहे.

सर्वे जना: सुखिनो भवंतु ।

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img