॥ श्री गुरवे नमः ॥
आनंदं निर्मलं शांतं करुणावरुणालयम् ।
पर ब्रह्मस्वरूपं तं राघवेन्द्रगुरवे नमः ॥
अजूनही मला आठवते. जवळ जवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती. कानले गावाच्या एका छत्रात राहणाऱ्या कृष्णमूर्तिराव यांना श्री राघवेंद्र गुरूंचा स्वप्नदृष्टांत झाला होता. ते एका भल्या मोठ्या सरकारी हुद्द्यावर काम करीत होते. पावसाळ्याचे दिवस होते ते; खूप जोरात पाऊस पडत होता. वाराही जोरजोरात वाहत होता. सागराला चाललो होतो. तीन-चार दिवस ताप होता अंगात. पण त्याची गय न करता चालत निघालो होतो. कानल्याच्या त्या छत्रापाशी असलेल्या दत्ताच्या देवळाच्या पायरीवर बसलो. अंगावर एका कौपीनाव्यतिरिक्त काही नसायचे.
सकाळचे ७-८ वाजले असतील, सोवळे नेसलेले कृष्णमूर्तिराव जवळ येऊन म्हणाले, “काल रात्री श्री राघवेंद्र गुरूंचा स्वप्नदृष्टांत झाला. ते म्हणाले ‘काल आपल्या इथे एक महात्मा आले आहेत, त्यांना विषमज्वराची बाधा झाली आहे. त्यांची सेवा कर, ती सेवा म्हणजे माझीच सेवा होय.’ अशी आज्ञा करून ते अदृश्य झाले. आपण आज माझी सेवा स्वीकारून मला कृतार्थ करावे.”
कृष्णमूर्तिरावांनी श्री राघवेंद्र गुरूंना आवडेल अशीच सेवा केली. या घटनेने आपल्याला श्री राघवेंद्र गुरूंच्या दयाळू व सर्वात्म स्वभावाचा परिचय होतो.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)