Letters

पत्र.क्र. ११८

॥ श्री गुरवे नमः ॥

श्रीक्षेत्र वरदहळ्ळी २२/३/१९७२

गुरुतत्त्व

श्रीगुरू या शब्दाला समान शब्द नाही. ‘गुरुरेव परब्रह्म’ म्हणजेच सर्वश्रेष्ठ परब्रह्म हा श्री गुरूच आहे. गौरवत्वाद्गुरु: बृहत्त्वात् ब्रह्म । असीम अद्वितीय अशा एका वस्तूची दोन नावे आहेत; तेच ब्रह्म व गुरू. ही नावे निर्गुण, निराकार आहेत. श्रीगुरू म्हणजे एक आनंदरूपी परब्रह्म, तो आपल्या अपार आनंदस्वरूपाने जीवांचा उद्धार करण्यासाठी एक रूप घेतो. त्याला ‘मोक्षपाणि’ व ‘भवरोगवैद्य’ असेही संबोधतात. नाही का?

गुकारश्चांधकारो हि रुकारस्तेज उच्यते । अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः ॥

हा श्रीगुरुगीतेचा ३२ वा श्लोक. गुरुगीता हा साक्षात् ईश्वराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेला ‘श्रीगुरुतत्त्व’ सांगणारा ग्रंथ. गुरू या शब्दातील ‘गकार’ हा अंधकार सूचित करतो, अंधकार म्हणजेच अज्ञान. ‘रुकार’चा अर्थ आहे तेज. म्हणजे अज्ञान दूर करणारा ब्रह्म हाच सद्गुरू यात काही शंका नाही, हे समजल्यावर वरच्या श्लोकाचा अर्थ आपसूकच समजतो.

गुरुरेको जगत्सर्व बृह्मविष्णुशिवात्मकः ।। गुरो: परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरुम् ॥
(गुरुगीता ४१)

विधी, हरि-हररूप असलेला गुरू हा संपूर्ण जगच आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे या जगात काही नसल्यामुळे त्या परात्पर श्रीगुरूची पूजा मनापासून करायला हवी. त्याची आराधना केली पाहिजे..

गुरो: कृपाप्रसादेन ब्रह्मविष्णुमहेश्वराः । समर्थास्तत्प्रसादेन केवलं गुरुसेवया ॥

गुरूच्या कृपाप्रसादामुळेच ब्रह्माविष्णुमहेश्वर इतके समर्थ झाले. एका गुरुसेवेनेच त्यांना हे भाग्य लाभले.

धन्या माता पिता धन्यो गोत्रं धन्यं कुलोद्भवात् । धन्या च वसुधादेवी यत्र स्याद्गुरुभक्तता ॥(गुरुगीता १०८)

जो सद्गुरूची भक्ती करतो त्याचे माता-पिता, त्याचे कुळ, गोत्र, तो राहत असलेली भूमी सगळेच धन्य होऊन जातात.

न गुरोरधिकं न गुरोरधिकम् । न गुरोरधिकं न गुरोरधिकम्
शिवशासनत: शिवशासनतः ।शिवशासनत: शिवशासनतः॥

गुरूपेक्षा श्रेष्ठ असे या जगती काही नसल्यामुळे श्री शिवानेच सांगितले आहे की, ही माझी आज्ञा आहे, की गुरूलाच श्रेष्ठ मानायला हवे.

इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)

home-last-sec-img