चि. लक्ष्मीनारायण यांस आशीर्वाद.
राग आवर.निंदा,हास्य करणाऱ्यावर न रागवता क्षमा करण्यास शिक. जो खरा आहे त्याच्यामागे परमात्मा, श्रीगुरू नेहमीच असतात हे तू जाणून घे आणि धैर्याने जग. निंदा करणाऱ्याचा द्वेष करू नकोस, कोणत्याही गोष्टीचा फारसा विचार न करता सर्वांशी प्रेमाने वाग. तुझ्याने होईल तेवढी मदत कर. प्रसन्न रहा, समाधानी व हसतमुख रहा. दक्षतेने सेवा कर. गुरुभक्ती, जप, आत्मानुसंधान करून, आत्मबळ वाढवून श्रीगुरुंच्या सेवेत येणाऱ्या विघ्नांवर मात कर. त्यांची बाधा होणार नाही अशी तेजस्विता आपल्या अंगी बाणव. दिवसेंदिवस, तुझ्या जीवनात श्रीगुरुंची भूमिका वाढत आहे. त्याच्या सेवेचे महत्त्व सांगून संपणारे नाही, याची जाण मला झाली आहे. सर्वजण समजून घेतात त्या गोष्टी समजून घे, सूचना आल्या आहेत, पण कोणी पाठविल्या हे समजले नाही. सर्वांना माझे आशीर्वाद.
इति शिवम्
श्रीधरस्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)