साधकांना मार्गदर्शन
॥ श्री गुरवे नमः ॥
एका साधकाने दुसऱ्या साधकाला याप्रमाणे जागृत करीत रहावे, श्री गुरूंनी मौनात असताना लिहून ठेवलेले आहे. रात्रीच्या वेळी शेतावर राखण करणारे लोक जसे एकमेकांना धीर देत असतात, तसेच येथेही आपल्याला एकमेकांना धीर द्यायचा असतो व सावध करायचे असते. अविद्या, अधर्म, अज्ञानाच्या अंधारी राज्यात आपल्या जीवनाच्या पिकाची आपण गुरुकृपेच्या माळावर बसून राखण करतो. तेथे उगवलेल्या सत्कर्मी पिकांचा नायनाट करायला काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह हे षड्रिपू टपून बसलेले असतात. आपली नजर चुकवून शेताचे भक्षण करायला टपलेले असतात. ‘अहं ब्रह्मास्मि’ असे ओरडून त्यांना पळवून लावण्याचे काम सतत करावे लागते. दुधाची खीर भरून ठेवलेल्या भांड्यात रॉकेलचा एखादा थेंब पडून, त्याचे जे काही होईल, तेच आपल्यात ‘अहं’ आला की होते. जे काही मिळविलेले असते ते गंगाजळी जाईल. जितकी आपली प्रशंसा केली जाते, तितके आपण निरहंकारी होत जावे. कितीही सत्कार्य केले तरी अजून करायचेच आहे असे वाटायला हवे. अजून खूप करायचे आहे, असे वाटून दुप्पट आनंदाने करावे. कर्तृत्व, भोक्तृत्व यांना जवळपास येऊ न देता कर्तव्य बुद्धीने निष्काम कर्म करणाराच साधक. त्याच्या आचरणात सत्य व शास्त्र यांचा नेहमीच समावेश असायला हवा. ता प्रत्येकाचा विश्वासपात्र व्हायला हवा. त्याचे जीवन इतरांना अनुकरणीय, आदरणीय व्हायला हवे. स्तुतीने फुलून व निंदेने वाकून जाऊ नये. प्राण्यांबद्दल प्रेम असावे. प्रत्येकाशी नम्रतेने वागावे. कुणाविषयी निष्ठरता न बाळगता प्रेमाने जगणे हे महाभागांचे लक्षण होय. निष्कपट प्रेम व मृदुमधुर बोल तसेच वागणे हे जगवशीकरणाचे महामंत्र आहेत. महात्म्यांनी सांगितले आहे की स्वत:च्या चुका शोधून जो आपल्या आपण सुधारतो, पश्चात्तापाने दुःखी होतो, त्याचाच उद्धार होतो,
स्वत:च्या चुका जो शोधतो तोच ‘मुमुक्षु’. इतरांच्या शोधून आपल्या झाकायचा जो हरेक प्रयत्न करतो तो ‘बध्द’. माया ही फसवी असते, कधी कशी मोहित करेल ते काही सांगता येत नाही म्हणून आपल्याला सदैव जागृत असावे लागते.
आपण नेहमी गुरु आश्रमाच्या किंवा संस्थेच्या नियमांप्रमाणे वागायला हवे. तसे केले नाही, तर एकाने केले म्हणून दुसरा तसाच वागतो. मग त्याला अंत राहत नाही, त्याच्या परिणामी त्या संस्थेच्या नियमांचा भंग होतो, शिस्त राहत नाही, कुणाचेही हित होत नाही; शिवाय गुरूचीही आपल्यामळे बदनामी होते. त्यामुळे आपल्याला जे प्राप्त करायचे आहे आपण प्राप्त करू शकत नाही; शिवाय आपल्या उद्धारासाठी स्थापन केलेली संस्थाही बंद पडेल. ऐकून करणाऱ्यापेक्षा जाणून करणारा खरा हुशार. आपण अविवेक केला तर आपल्याला व इतरांनाही त्याचा जाच होतो ना? स्वत:ला व इतरांनाही जो त्रास देत असेल त्याला संस्थेत कोण ठेवून घेणार ? एकामुळे इतरांनाही त्रास होत असेल तर गुरूंनी तरी काय करावे? त्याला दया दाखविली तर इतरांना त्याचा त्रास होईल म्हणून त्याला सहानुभूतिपूर्वक आशीर्वाद देऊन पाठविण्याव्यतिरिक्त ते काही करू शकणार नाहीत. गुरूचे जो ऐकत नाही त्याला गुरू याव्यतिरिक्त आणखी करणार तरी काय? मी जे काही करतोय याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार करूनच आपण आपले काम करायला हवे. आपल्याला समजत नसेल तर पुढच्या वर्गातल्याला विचारावे. समजा, त्यातूनही समाधान झाले नाही तर वेळ साधून गुरूलाच विचारावे. त्यानंतर स्वत:चे शहाणपण न वापरता, कोरडे पाषाण न गिरविता, तोच अखेरचा शब्द मानून त्याप्रमाणे वागावे. गुरु-आज्ञेने आपले कधीच वाईट होणार नाही, भलेच होईल. ब्रह्मनिष्ठ गुरुमुखातून वेदशास्त्रसिद्धांतच बाहेर पडतो. शुद्धांतर्मनाने जे ते सांगतात तेच शास्त्र. त्याला सारेजण समान. तो एकाची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय करतो, असा कदापी विचार करू नये. सारे जण जर त्याचेच रूप असतील तर तो एकाचे हित व एकाचे अहित कसे करेल? असा विचार आपण कधीच करू नये. आपण आपल्या उद्धारासाठी त्यांच्याजवळ आलेले असतो. गुरु आपल्या जवळ असल्याने त्यांचे काय भले होणार आहे? मुलांच्या हातातील विष काढून आई त्यांना आवडेल असे खाणे देते, ते तिच्या स्वार्थासाठी नव्हे, त्यांच्या हितासाठीच! गुरू तर शक्यतो आपल्याला आनंदघन स्वरूपाचा साक्षात्कार देण्याच्या प्रयत्नात असतो. यात त्याचा काही स्वार्थ असतो का? मोबदला न घेता शिकविणारा प्राध्यापक फक्त शिकवितो, आपल्याला त्यातून काय मिळते हे तो पहात नाही. परिशुध्द आनंदरुप गुरू आपला उध्दार करतो, त्यासाठी प्रयत्न करतो, मग आपण त्यांच्यातच दोष शोधायचा म्हणजे, तो मरणाऱ्याला अमृत पाजत असताना ते विष असे समजणे होय. औषध देणाऱ्या वैद्याला रोग्यापासून काही फायदा नसतो. त्याने सांगितलेले पथ्य पाळले नाही तर तो किंवा त्याचे औषध काही करू शकत नाही. गुरूजवळ राहून आपण त्याची सेवा करायला हवी, असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. पण आपल्यासारखेच सगळे असे समजून इतरांना ती संधी मिळवून द्यावी. मी एकट्यानेच सेवा करावी म्हणून हट्ट करू नये. इतरांनी सेवा केली तर त्यातून स्वत: आनंद मिळवावा. असूया करू नये. ‘सेवेची संधी मला न देता त्याला दिली, माझा काय अपराध होता? त्याला संधी देऊन गुरूंनी माझा मुद्दामच अपमान केला. त्यांच्यावर ते जास्त प्रेम करतात. आम्ही सर्वजण घर सोडून आलो असता गुरूने असा भेदभाव का करावा? हे कसले गुरू? हा कसला परमार्थ?’ असे म्हणून काहीजण रागाने बोलतात; तर काहीजण मनातल्या मनात ठेवून घेतात. रागात माणूस काही बोलतो; पण गुरू त्याचे मनावर घेत नाही. त्याला आपल्याविषयी भक्ती नाही, असे समजत नाही. उलट असे समजतो, की याने संयम ठेवला तर तो विवेकी होईल. गुरूच्या या मौनावर आपण रागावू नये. विवकाने रागाला आवर घालणारा खरा हुशार. राग हा वाईट असतो. राग न येणे हे उत्तम, त्यातूनही श्रीगुरूविषयी तर कधीच राग येता कामा नये. कारण तो कधीही कोणतीही चूक करीत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या सहा शत्रूंवर विजय मिळविला तरच आपण परमार्थी होऊ, हो ना?
हे सहा अविवेक म्हणजे विषसमान आहेत. चांगली सेवा करीत असुनही जर गुरूने दुसऱ्याची सेवा घेतली तर त्यात हे लक्षात घ्यावे, की गुरूने आपल्या सुखाकडे लक्ष न देता. कोणतीही अभिलाषा न बाळगता, साधकाच्या उद्धारासाठी त्याला संधी दिली आहे. सर्वांवर समान प्रेम असल्याने ते सर्वांना समान संधी देत आहेत, या वस्तुस्थितीची जाणीव करून घ्यावी. मासळीने पाण्यावर रागवावे तसे जर आपण गुरूवर रागवलो तर ते स्वतः चे अहित करून घेतल्यासारखे होईल. एखाद्या अशक्ताला किंवा आजाऱ्याला गुरूने दूध जास्त दिले तर त्याच्यावर जास्त प्रेम आहे म्हणून तसे केले असे समजू नये. खरा विचारी माणूस असा विचार कधीच करणार नाही. खाण्यापिण्यावरून जर असे भांडत राहिलो तर हे दिसून येईल की, हे परमार्थ्यांचे, नि:स्पृहांचे काम नव्हे. प्रत्येकाची पात्रता पाहून, त्यांचे काम पाहून ते काम सोपवितात; त्यात भेदभाव करावा म्हणून नव्हे. आपल्या वागण्याने, शांतपणाने, विवेकाने, गुरुभक्तीने, विरक्तीने चांगल्या साधकाने काया-वाचा-मनाने आपलेपणा दाखवावा. चांगली गोष्ट आपल्याला व इतरांनाही चांगलीच असते; तसेच वाईट गोष्टही सर्वांना वाईट असते. आपल्याला वाटते, की सर्वांनी आपल्याशी नीति-न्यायाने वागावे, आपल्या सुख-दु:खात सहभागी व्हावे. पण हीच गोष्ट इतरांनाही वाटते, हे लक्षात घ्यावे. जो इतरांशी जसा वागतो तसेच इतरही त्याच्याशी वागतात, आपण जसे बोलतो तसेच इतरही बोलतात हे जाणून घ्यावे. ‘आपण चांगले वागलो तर जगही चांगले वागते’ ही म्हण नेहमी लक्षात ठेवावी. ‘करून करवून घ्यावे, बोलून बोलवून घ्यावे व देऊन दिलेले घ्यावे,’ हा जगाचा न्याय आहे. उडी घ्यायच्या आधी विचार करावा, हातपाय मोडल्यानंतर अक्कल येऊन फायदा नसतो. म्हातारपणी साधना करावीशी वाटली तर ते निष्फळ असते, तसेच हेही. जे पेरतो तेच उगवते ना? आपण हे विसरता कामा नये, की जे रांधले तेच खावे लागते. चांगले करूनही फळ व कीर्तीची अपेक्षा न करता राहू शकतो; पण वाईट करून तसे कधीच राहू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवावे. मोठ्यांकडून काही काम करून घ्यावयाचे असेल तर दीनता, विनय व अनन्य भक्तीने करून घ्यावे. त्यांचे मन दुखवून, हट्ट करून नव्हे. तसे केलेच तर त्यांचे मन दुखावते. शिवाय त्यांचे मन दुखवून किंवा हट्ट करून त्यांच्याकडून काय करून घेतलेच तर ते हितावह होणार नाही. देव, गुरू वा वरिष्ठाना हट्ट, राग यांचा तिटकारा असतो. आपल्यालाही तसेच वाटत नाही का? हट्ट करणे म्हणजे खरे प्रेम व भक्ती नव्हे. श्रेष्ठांचे मन, त्यांचे प्रेम पाहून त्यांना प्रेम व सुख वाटावे असे वागणे हा लहानांचा धर्म आहे. त्यांचे विचार उच्च असतात. आपली पात्रता काय, त्यांची पात्रता काय? ते सांगतील तसे आपण वागलो तर निश्चितपणे आपला उद्धार होईल. एरवी अमृत देणाऱ्यासमोर हट्ट धरून पेज घेतल्यासारखे होईल. गुरू व वरिष्ठ जे देतात ते मोठेच असते. आपली पाळी असता दुसऱ्याने येऊन सेवा मी तर हे असे का झाले असे वाटणे साहजिक आहे. एवढेच नव्हे; काही वेळा ते सेवा करणारे गुरुबंधू आपल्याला यमदूतासारखे वाटतात, जणू ते आपला प्राण न्यायला आले आहेत! खरे तर यातसुद्धा भक्ती व प्रेमच आहे; पण आपली भक्ती ही आत्मदृष्टी असलेली, सर्वात्मभावात्मक व स्वपूर्ण आत्मज्ञानाची असावी असे आपण शिकायला हवे.
श्रीगुरू हे आपलेच निर्गुण-निराकार रूप आहे, हे जाणून घेतले पाहिजे. सेवा करताना, करीत नसतानाही मन एकसारखे असावे, हे शिकायला हवे. हे जाणले तर जागतिक लाभहानीत, सुखदु:खात आपले आनंदघनस्वरूप आहे तसेच आहे, ही धारणा आपल्याला उपयोगी पडते. सेवा करताना किंवा करीत नसताना सगळ्या क्रियांचा मी साक्षीदार आहे, मी निष्क्रिय, आनंदघन ब्रह्मस्वरूप आहे, हे जाणले तर त्याचा उपयोग होतो. सर्वात्मभाव जाणून घ्यायलाही याचा उपयोग होतो. सेवेत सगुण-निर्गुण दृष्टी असते. सेवेची पाळी संपल्यानंतर गुरूचे निर्गुण-निराकार रूप असलेले आपले आनंदघन ब्रह्मस्वरूप हे ध्यान-धारणा करायलादेखील मदत करते. सेवेची पाळी करून सदैव सेवा केल्याने कायम स्वरूपी असणाऱ्या आपल्या अविकार स्वरूपाच्या जाणिवेलाही ते उपयोगी पडते. जागतिक जीवनात नेहमी एकसारखी परिस्थिती नसते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठीच तर वेदांताचा अभ्यास करायचा असतो. आपल्या आनंदघन असलेल्या, नित्य ब्रह्मस्वरूपाच्या साक्षात्कारासाठीच गुरुसेवा करायची असते. आपली सेवेची पाळी असताना जी आत्मनिष्ठा अनुभवली, तिचा अनुभव येईस्तवर तो आनंद लुटून पुन्हा मिळणाऱ्या पाळीकडे आनंदाने डोळे लावून बसावे व नव्या जोमाने पुढची सेवा करावी. सेवेच्या काळात पहाटे तीन वाजता उठायची सवय ठेवावी. त्यानंतर श्रीधर कुटीत किंवा ओढ्याकाठी बसून ध्यान करावे. जी सेवा करायची आहे तींत वेळेचे बंधन ठेवू नये. आश्रमाची, संस्थेची सेवादेखील तेवढ्याच प्रेमाने, आदराने, गुरुसेवा समजून, आळस न करता करावी. पहाटे तीन वाजता ऋषी, मुनी, देवता उठून स्नानाला जातात. तेही ध्यानधारणा, समाधी या अवस्थांचा नित्यनेमाने अभ्यास करतात. आपण साधकांनीही तसेच करावे. ध्यानयुक्त जप तरी करीत बसावे. मुनी, गुरु स्नान करून ध्यान करतात तेव्हा आपण अंथरुणात राहणे बरे वाटते का? पाळीच्या जोडीत बदल करीत रहावा. जोडी कायम ठेवली की त्या गुरुबंधूंमध्ये जास्त प्रेम निर्माण होण्याची शक्यता असते. जोडी बदलली तर मात्र सर्वांचे परस्पर-प्रेम एकसारखे राहते.
‘न गुरोरधिकम् न गुरोरधिकः’ – गुरुगीता
गुरूपेक्षा श्रेष्ठ असे काही नाही, कोणी नाही. हट्टापायी आपलेच त्यांनी ऐकावे असे म्हटले तर त्यांचे उपदेश ऐकून आपला उद्धार कधी व्हायचा? प्राण देईन, अन्नपाणी त्यागेन म्हणून धमकी देऊन काम करून घेण्यात अविवेकीपणा दिसून येतो. आपल्यावर दया दाखवून जर त्यांनी तसे केले, तर त्यामुळे आपले अज्ञान, आपली अल्पबुद्धी, देहप्रेम हे अधिक होतील; शिवाय ज्ञान वाढणार नाही. आपल्या हिताचे जे नाही ते गुरूचे मन दुखवून मिळवून घेण्यात काय अर्थ आहे? म्हणूनच शास्त्र सांगते, की गुरुआज्ञेचे उल्लंघन करणे ही खूप मोठी चूक आहे. श्रीगुरू संतुष्ट झाला तरच मोक्ष मिळतो, मग यापेक्षा मोठे काही असूच शकत नाही.
ध्यानमूलं गुरोमूर्ति: पूजामूलं गुरोः पदं । मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलम् गुरोः कृपा ॥ – गुरुगीता – ७४
याचा अर्थ जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे वागायला हवे ना? श्रीगुरू आपल्याला भवसागरातून पार करतो, तो महासमर्थ आहे, क्षमाशील आहे. त्याला कोणतीही उपमा देता येणारच नाही. तुमची तयारी व्हावी या दृष्टीने मी हे सारे तुम्हाला सांगतो आहे. लाकूड चांगले वाळले तरच व्यवस्थित पेटते, तसेच आपण योग्य परिणती प्राप्त करण्यासाठी असा विचार-विनिमय केला तर श्रीगुरू आनंदघन-ब्रह्मरूप होईल यात कोणतीही शंका नाही.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)