।। श्रीराम समर्थ ॥
साधकांना इशारा
परमानंदप्राप्ती किंवा परमात्माप्राप्ती करून घेऊन जन्ममरणांतून मुक्त व्हायला हवे, असे ज्या साधकाला वाटते, त्याने आपली वृत्ती (मन) बहिर्मुख होऊ नये याकडे लक्ष द्यावे. रात्रंदिनी त्याने याकडे लक्ष द्यावे व निष्प्रपंच, आनंदघन, परमात्मस्वरूपाची ध्यानधारणा करून मन दृढ करून जगण्यासाठी धडपडावे.
‘अंधवत्पश्य रूपाणि शब्दं बधिरवत् शृणु’
आंधळ्याप्रमाणे तू रूप पहात जा. बहिऱ्यासारखे ऐक असे उपनिषद सांगते.
‘अंधवज्जडवच्चापि मूकवच्च महीं चरेत् ।‘
साधकाने अंध, जड व मुक्यासारखे वावरावे.
आशीर्युक्तानि कर्माणि हिंसायुक्तानि यानि च। लोकसंग्रहयुक्तानि नैव कुर्यान्न कारयेत् ।।
म्हणजे कोणत्याही रूपाचा, शब्दाचा परिणाम मनावर होणार नाही अशी आपली अवस्था असली पाहिजे. आशीर्वादयुक्त, अनुग्रहयुक्त व हिंसायुक्त क्रिया आपणही करू नयेत व इतरांकरवीसुद्धा करवू नयेत. परिव्राजक उपनिषदातील पंचउपदेशात नारदांनी तर म्हटले आहे की लोकसंग्रहयुक्त कामदेखील स्वत: करू नयेत, साधकाचे लक्ष यात गुरफटले तर त्याची श्रद्धा नाहीशी होऊन जाईल. त्याची निर्विकल्प आनंदरूपाची ध्यानधारणा खंडित होईल. नसते कल्पनातरंग मनात उठून एकाग्रता भंग होईल. त्याच्यातील निर्विकार आनंदरूप चैतन्य दृष्टी जाऊन विकारी दुःख-भावना दृढ होत जाईल. मन दु:खी होईल व ध्यानाचे सुख त्याला प्राप्त होणार नाही: त्यामुळे पुढची प्रगतीही खुंटेल. म्हणूनच साधकाला जागे करावेसे वाटते. हे फक्त संन्यासी साधकांपुरते नाही, सर्व निवृत्ति-मार्गींना सांगतो. काम, क्रोधादि सहा विकार ज्यांनी त्यागले आहेत, ते सारेजण संन्यासीच होत असे समर्थांनी सांगितले आहे. स्वयं कायेन, वाचा, मनसा तर इतरांना कधीच दुखवू नये.
‘न मंत्र तंत्र व्यापारम्’
मंत्र, तंत्र, जादूटोणा करणे साधकांना शोभत नाही. ते पथ्य पाळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे औषधे देणे, धातूचे सुवर्ण करून गरीबांचे दु:ख दूर करणे या सगळ्यांमुळे लोकांचे जाणे-येणे वाढते; त्यामुळे साधक त्यात गुरफटून जातो. शिष्य-शाखादेखील साधकाने वाढवू नये, शिष्य अज्ञानी असतात. ममत्व, अहंकार, विषय-वासना यांनी ते तुडुंब भरलेले असतात. सांगितलेले ऐकत नाहीत. साधना करीत नाहीत, सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागते. काही निषिद्ध प्रवृत्तीची माणसेही गाठी पडतात, त्यांना कसे सुधारायचे, याची चिंता लागून राहते. मग आपण तोच विचार करीत बसतो. काही जण उद्धट उत्तरे देत सुटतात. मग आपल्या डोळ्यांसमोर सारखे तेच येत राहते. परदु:खात जर आपण रमू लागलो तर आनंदरूपाच्या ध्यानाचे काय? त्याशिवाय, आत्मनिष्ठा तरी कशी मिळणार?
‘स्वरूपानुसंधानं विनान्यथाचारपरो न भवेत्’ स्वरूपानुसंधानाविना क्षणभरही राहता कामा नये, अशी साधकांविषयी उपनिषदामध्ये शिक्षा-दीक्षा सांगितली आहे. अखंड आनंदरूप आत सदैव पहावे. त्याचेच निरूपण ऐकावे. अहर्निशी त्याचेच ध्यान करावे. मी व हे सारे एक आनंदरूप आत्मा आहोत किंवा ब्रह्म आहोत असे समजावे, असा याज्ञवल्क्य ऋषींनी साधकांना उपदेश केला आहे.
काहीजण आपली मते, आपले संस्कार सोडायला तयार नसतात तेव्हा मन दुखावते. काही जण गुरुसेवा म्हणून गुरूला सुख द्यायला धडपडतात व आपापल्या मनाप्रमाणे चवदार पक्वान्ने करून जेऊ घालतात. लोकरीची वस्त्रे देतात. गुरूला झोपायला मऊ मऊ गाद्या, तक्के, लोड आणि गादीही करून देतात. गुरूचे वैभव वाढावे म्हणून सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या चांदीची भांडी देतात. अत्तरे, सुगंधी द्रव्ये लावतात. धूपदीपाने पूजा करतात. मैफली चालतात. स्त्रिया, पुरुष पादसेवा करायला येतात. आपले मन दृढ असेल तर याचा परिणाम होत नाही. कधी कधी आपल्या मनाविरुद्ध वागावे लागते तेव्हा मन दुखावते. भक्तीत हट्ट असल्यामुळे थोडे तरी त्यांचे ऐकावे लागते. पण हे हट्ट पुरवता पुरवता अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. प्रगती खुंटते. वैराग्य दृढ नसेल तर मात्र एका लहानशा अग्नीवर तूप ओतल्यासारखे होऊन, विकार बळावून सारे काही असह्य होते. म्हणूनच साधकाने बाह्म उपाधींकडे फारसे लक्ष देऊ नये.
काही प्रसंगी सर्वांकडूनच परोपकार होत असतो. मनाला रहावत नाही. आपल्या मार्गात जेव्हा एखादा असाहाय्यपणे पाणी मागतो तेव्हा सामान्य माणूसदेखील एखाद्या विहिरीतून किंवा तळ्यातून पाणी आणून देईल. तसे असताना उच्च व त्याग-भावना असणाऱ्या साधकांविषयी सांगायला हवे का? भुकेला माणूस समोर आला तर आपल्या झोळीतील अन्न तो काढून देईल. संकटात असलेल्याने द्रव्य-साहाय्य मागितले तर आपल्याजवळ रोकड असेल तर तो सत्पात्राला देईलच. रस्त्यात एखाद्याने रोग-परिहार विचारला तर औषधही द्यावे. यामुळे उपाधी लागत नाही. पण मंत्र, तंत्र, औषध देण्याचे काम एका जागी बसून केले तर साधकाला निश्चितपणे त्याचा त्रास होतो. कारण माणसाचे अपक्व मन त्यातच मग्न होऊन मोक्षाचा दिशा विसरते. जोपर्यंत निर्गुण, निराकार, केवळ आनंदरूपाची आत्मस्थिती साधता येत नाही तोवर ते मिळविण्यासाठी अंतर्मुख होऊन, कोणत्या प्रसंगी न थांबता, अखंड ध्यान करत रहावे. अनेक जन्मापासून बाणलेल्या मिथ्या संसाराची वासना घालवायची असेल तर सतत अभ्यास व्हायलाच हवा.
वासनाक्षय-विज्ञान-मनोनाशा महामते ।
समकालं चिराभ्यस्ता भवन्ति फलदा मता: ॥
रज-रेतसाच्या संगमात न्हालेल्या या शरीराचे सौंदर्य ते कसले ? त्यांचे सुख ते कसले ? सुखाची भ्रांति निर्माण करणारे, आभासरूप विषयसुख शरधीचे निजरूप लपवून, दुःखाच्या खाईत लोटते, हे नेहमीच लक्षात ठेवावे. विषय-वासनांना दूर ठेवून दिसणारे आपल्या जाणिवांचे रूप म्हणजेच आनंद हेच सत्य समजून विज्ञानाचा अभ्यास करीत, दुसरा कोणताही विचार न करता मनोनाश करीत, अखंड समाधि-स्थितीत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करावा. जे आनंदरूपविरहित आहे ते केवळ जाणिवेचे रूप आहे, हे न समजणेच नामरूपात्मक विषयामध्ये सुखाची भावना कल्पित करते.
‘आनंदो ब्रह्म’ जगत्कारण-रूप असलेले ब्रह्म हेच आनंद-रूप आहे हे न जाणता जीव त्याचा शोध घेत राहतो. मोक्षमार्ग शोधीत असलेल्या साधकाने त्यात असलेले ‘अहं ब्रह्मास्मि’ याचे स्फुरण करीत, ‘देहोऽहम्’ पर्यंत साऱ्या वृत्ती, स्फुरणे सोडून देऊन, निश्चल-निवृत्त जगताचे ज्ञान संपूर्ण आनंदरूप ब्रह्मात ओतून निर्विकल्प आनंदसमाधीत रहावे, असे सौभाग्य श्रीगुरू परमात्मा आपणा सर्वांना देवो.
इति शिवम्
श्रीधर स्वामी
(श्री सद्गुरूबोधामृत या पुस्तकातून)