Letters

पत्र.क्र. १२९

॥ श्री राम समर्थ ॥

साधकहो, सावधान!

निवृत्तिमार्गावर असलेल्यांचे साध्य हे असायला हवे – त्याने आपल्या जीवनातील सुखसोयी कमी करीत आणायला हव्यात. हेच त्या व्यक्तीचे खरे व मोठेपणाचे द्योतक आहे. तसेच त्याने कोणत्याही संस्काराला किंवा नामरूपाला बळी न पडता नेहमी अजित राहून केवळ सर्व कारण असलेल्या पूर्णानंद स्वरूपात निर्विकल्प रहावे. केवळ ब्रह्मरूपे असावे. पहा, मी तरुणपणी ‘सर्वं जितं जिते रसे’ झालो; कारण जिभेवर जय मिळविला तर सर्व इंद्रिये आपल्याला वश राहतात. प्रत्येक गोष्टीवर विजय मिळविता येत नाही म्हणून जिभेवर तरी विजय मिळवायलाच हवा, या हेतूने मधुकरी धुवून तीत षड्रसांपैकी कोणत्याही रसाचे मिश्रण न करता नीरसच खात होतो. अंगावर कोणतेही वस्त्र न घेता सज्जनगडासारख्या थंडीच्या राज्यात आंघोळीनंतर अंग न पुसता ओले कौपीन अंगावर तसेच ठेवायचो. भूमीचे शय्यास्थान असायचे व मुखी सतत रामनामाशिवाय दुजा शब्द निघत नसे. कोणी समोर आले तर माझ्या निर्गुण-निराकाराचा चेहरा, त्याचे स्वरूप पुसले जाऊन, माझ्या हृदयातील त्याची प्रतिमा पुसून जाईल, या भीतीने मी तो चेहरा पाहण्याचे टाळत असे. नेहमी माझी दृष्टी अधोमुखी असायची. दिवाळीच्या वेळी बळे-बळे मला तीन-चारजण मिळून तेल लावून, आंघोळ घालत असत. तेव्हा देहसुखाची चटक लागली तर आत्मविस्मरण होईल म्हणून, या देहाला त्याची सवय लागेल म्हणून तसाच जाऊन धुळीत लोळून यायचो. रात्री झोप लागली तर अज्ञानाच्या वशी जाऊन तोंडात रामनाम उच्चार थांबतील, म्हणून रामनामाला ‘अहं ब्रह्मास्मि’ असा अर्थ देऊन, स्वरूपाच्या अनुसंधानात रात्र जागवी, तसेच स्वकामात क्षणभरही गुंतन राहिलो तर स्वार्थ जागृत होईल व गुरुसेवेसाठी ठेवलेला वेळ आपल्यासाठी खर्च होईल, गुरूच्या अनन्यशरणी जाणे राहून जाईल, या भीतीने लंगोट पिळून टाकण्यातही वेळ घालवीत नसे. तो अंगावरच सुकून जाईल. पहाटे तीन वाजता अंघोळ व्हायची. इतर वेळी थोडा जरी संशय आला तरी तडक जाऊन कंबाळेच्या हिमाच्या पाण्यात डुबकी मारून यायचो. काही ना काही कारणास्तव दिवसाकाठी चार-पाच वेळा आंघोळ व्हायची. सगळे गुरुस्वरूप समजून कुणाशीही निष्ठुरपणे वागत नसे. मठाच्या समोरील प्रदक्षिणामार्गात झाडताना तिथे कोणी थुंकले असल्यास ती थुंकी मी हाताने काढून ती जागा पाण्याने स्वच्छ धुऊन काढीत असे. मीपणा घालविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, असे मला वाटे व त्यात खूप आनंद मिळून जाई. स्वयंपाक करतानाही, हा श्रीराम व श्रीसमर्थ यांचा नैवेद्य आहे. गुरुरूपे येणाऱ्यांच्या मुखी हा प्रसाद पडणार आहे, तेव्हा आपण याचे पावित्र्य अबाधित राखून हा स्वयंपाक केला पाहिजे, हे मी सदैव लक्षात ठेवून घेत असे. हे सर्व पाहता आत्ताच्या साधकांकडे बघून मला असे वाटते, की यांना अशी तळमळ का नाही? मला याचे दु:खही वाटते. तेव्हा मला सतत वाटे, की मी थोडेही आपल्या देहाकडे लक्ष दिले, तर गुरूला वाटेल की हा आपल्यातच रमला आहे, माझ्याकडे याचे सुतराम् ध्यान नाही; मग त्याच्या मनात माझ्याविषयी उदासीनता वाटेल, त्याची अवकृपा होईल. हे संस्कार घालवून तप करायचे असल्यास आपल्याला असे करून चालणार नाही, वगैरे. पण आजकालच्या साधकांमध्ये ही व्याकुळता नसते, हे पाहून माझे मन कासावीस होते. अंगाला साबण लावू नये, चहा, कॉफी यांची व्यसने साधकांना नसावीत, असली तर ती निश्चितपणे लाजिरवाणी आहेत, असे सांगितले तरी त्याचे यांना भान नसते. मी अजूनही साबण वापरीत नाही. प्रयागहून आणलेली मृत्तिकाच मी वापरतो. सज्जनगडात तर मी काहीच वापरत नव्हतो. तिथून पंचवीस वर्षांनंतर मी जेव्हा हिमालयात गेलो होतो तेव्हा तिथे गरम चहा पिण्यावाचून चालत नाही, असे म्हणून काहीजण पीत असत: पण मी कधीच प्यायलो नाही. आताही काहीजण मला कॉफी पिण्याचा सल्ला देत आहेत, मी पीत नाही. माणूस एकदा व्यसनाधीन झाला की तो ती गोष्ट मिळविण्यासाठी नीती, धर्म, मोठ्यांचे बोल, स्वत:ची लाज. आपली जात, शुध्दाशुध्दता, यातना सारे विसरून जातो. कुणाकडेही याचना करीत फिरतो. व्यसनाने तेज हरवते, म्हणूनच मला वाटते, की साधकाला व्यसने नसावीत.

तरुणांनी रात्री दहा वाजता झोपून पहाटे साडेचार किंवा पाच वाजता उठावे. प्रौढांना थोडी झोप कमी असते; त्यांनी साडेतीन-चार वाजेपर्यंत उठावे. जप, ध्यान, समाधी यांचा अभ्यास ब्राह्मी मुहूर्तात करणे इष्ट असते. कारण तेव्हा प्रशांत वातावरण असते. एकादशी व ग्रहण समयी मी पाणीही घेत नसलो तरी आमचे साधक धड-धाकट असूनही रोगी, बालक व म्हातारे यांना मिळणाऱ्या सवलतींचा वापर करतात. एकादशीला तर त्यांना एक-दोनदा नव्हे तर तीन-तीनदा फलाहार लागतो. हे सारे पाहून असे वाटते, की आजकाल मुमुक्षुतेची तीव्रता कमी झाली आहे व लोक मला दोष देत आहेत, की मी जरा जास्तच सवलती देत आहे व आजीचे प्रेमही थोडे जास्त झाले आहे. साधकांचे उज्ज्वल भविष्य माझ्यामुळे लोप पावू नये म्हणून व मी त्यांचा दोषी ठरू नये यासाठी आता थोडे कडक व्हायचा विचार करतो आहे. समर्थांनी सांगितले आहे की साधना न करू देणाऱ्या इंद्रियांचे दमन न करता शिष्यांचा मोह, भीड राखणारे तीन पैशाला मिळत असतील तरी त्यांचा स्वीकार करू नये. काशीत होतो तेव्हा देवेंद्राची कॉफी सुटावी म्हणून मी त्याला सांगितले, की माझी सेवा करायची असेल तर त्याला कॉफी सोडावी लागेल. त्याने तसेच केले व त्याची सवयच मोडली. पण येथे मी अशी काही अट घातली नाही. म्हटले हे आपणहून सोडतील. आता वर्ष होत आले पण अजूनही कोणी कॉफी सोडायच्या तयारीत असलेले दिसत नाही. आता वाटू लागले आहे, की ही सवलत जरा जास्त झाली आहे म्हणून आता कडक नियम करणार आहे. आता सांगा, की यामुळे कोणावर वाईट परिणाम होणार नाही ना? येथे असलेल्यांनी किंवा येणार असलेल्यांनी जर माझ्या सेवेला यायचे ठरविले असेल तर त्यांनी कोणतेही व्यसन न बाळगता यावे. एकदम जर सोडता येत नसेल तर हळूहळू प्रयत्न करावा व नंतरच सेवेला यावे. मागे मी सांगितल्यानंतर काहींनी लगेच व्यसने सोडली होती. गुरूची आज्ञा पालन करायला लागणाऱ्या श्रद्धेतही सामर्थ्य असावे लागते. शेवटी गुरुचरणी एकच प्रार्थना करतो की, त्यांनी साधकांना, भूषण ठरेल असे ज्ञान, वैराग्य, आत्मनिष्ठा, विनय, विवेक, शांती, गुरुभक्ती, समाधान, मुमुक्षुवृत्ती द्यावी. आपल्या गुरू, गुरुबंधू, भगिनी यांच्याविषयी त्यांना प्रेम वाटो. त्यांचे वागणे-बोलणे सद्गुणी माणसासारखे असो. निर्विकार आनंदघनरूपे जगा. आपली वागणूक, बोलचाल, दृष्टी सारे काही त्रिकरणासारखे आदर्श असो.

माझे हे लिखाण थोडे कडक आहे असे वाटते का? पण तुमचेच हित आहे. माझ्या लाडक्या साधकांना असे वाटणार नाही मला खात्री आहे. खरे तर जे केले ते सांगायचे नसते, पण स्फूर्ती देण्यास हे गरजेचे असते; कारण बऱ्याच साधकांना बऱ्याच वेळा सांगूनही समजत नसते. विद्या मिळवायला किती कष्ट करावे लागतात हे त्यांना दाखवावे लागते. जिथे दारिद्रय आहे तिथे जास्त कष्ट लागतात, हे पटविण्यासाठी माझ्या कष्टांची उदाहरणे द्यावी लागतात अति सर्वत्र वर्जयेत्’ म्हटल्याप्रमाणे, अती कष्ट करू नका; पण साधकाने जितके श्रम घ्यायला हवे तितके तरी घ्यायला नकोत का? असे मला वाटते मनावर थोडा संयम हवाच. संयम असला की साधक तेजस्वी बनतो हे खोटे नाही. माझ्यापेक्षा तुम्ही वरचढ व्हायला हवे, असे मला वाटते. मी तुमच्यावर नियम लादतो, पण खाण्यापिण्याविषयी कोणीही, कितीही आग्रह केला तरी तुमचा तोल जाता कामा नये म्हणून. कारण प्रत्येकाची तब्बेत सारखी नसते. मी असे लिहिले म्हणून तुम्ही हिरमुसून जाऊ नका. उलट मी म्हणेन, की तुम्ही जागृत व्हा. सोन्याला सुगंध चढला तर कुणाला नको आहे? जितके तुम्ही चांगले व्हाल तितके कमीच. इतर लोक तुमच्या वर्तनाकडे पाहून तेही तसेच वागतील. म्हणून तुम्हाला त्या जबाबदारीची जाण असायला हवी. मोठ्या माणसांवर श्रद्धा ठेवा. बाह्यसाधना, विनय, गुरुदेवभक्ती, चांगले बोल हे आत्मसात केले असतील तर त्यान स्वत:चे व इतरांचेही भले होईल. मोठी माणसे निर्व्यसनी असतील, त्याच्यात चांगले गुण असतील तर ते आपोआपच आत्मसात होतात; कारण करतात म्हणून आपणही काही विचार न करता करून टाकता. एकच कारण आहे, ते म्हणजे माणूस हा अनुकरणप्रिय आहे. त्यासाठीच आपण आपला अनुकरणीय आदर्श सर्वांसमोर ठेवावा आणि आप इतरांनी मिळून देश-धर्माची सेवा करावी. ‘संसर्गजा दोषगुणा भवन्ति म्हटल्याप्रमाणे, पाण्यासारखा माणूसही चांगल्याच्या संसर्गाने चांगलाच होतो व वाईटाने वाईट. आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नय ठेवून चांगुलपणानेच वागावे. कुणाशीही वागताना दया-दाक्षिण्याने वागावे सत्साधना पारखून घ्यावी. जो इतरांचा गौरव करतो तोच गौरवास पात्र होतो. आपल्यापेक्षा मोठ्यांशी वागताना जसा आपण त्यांचा आदर करतो तसाच आदर लहान व खालच्या लोकांशी वागतानादेखील करावा. अहंकार व ममत्व या विषयांचा त्याग करणे हाच निवृत्तिमार्ग. त्यातूनही संन्यास मार्ग स्वीकारला असेल, तर तो मी अत्युच्च मार्ग समजतो. श्री समर्थ आपल्या महंत-शिष्यांना नेहमीच बोध करीत असत, की बाह्यत: साधकांप्रमाणे राहून आंत मात्र सिद्ध, अचल अशा स्वरूपात निष्ठेने रहावे. सिद्धांना प्रतिष्ठा, मान्यता हे विषासारखे आहेत असे उपनिषदांमध्ये सांगितले आहे. तेव्हा साधकांविषयी वेगळे सांगायला हवे का? साधकांनी याविषयी जरा जास्त सावध असायला हवे; कारण जितका मान मिळतो तितका पुण्यक्षय होतो. त्यासाठी साधकांनी इतरांना उपदेश करणे, पाद्यपूजा करून घेणे यांपासून दूर रहायला हवे. सिद्धांची बाब निराळी असते; कारण, त्यांना गुरु-शिष्य संबंध पारखून घ्यायचे असतात, आपल्या शिष्यांचा अनादर करायचा नसतो; पण हे करून घेत असताना त्यात स्वप्रतिष्ठेची भावना त्यांच्यात रुजत नाही. साधकांमध्ये मात्र ती डोकावते. आजकाल काही साधक आपल्या गुरूचाही आदर न करता समाजात स्वप्रतिष्ठा रंगवून घेताना दिसतात. माझे म्हणणे इतकेच आहे की, कुणातही कोणतीही कमतरता असता कामा नये. यासाठीच तर मी धडपड करतो. फक्त माझा स्वत:चा उद्धार करून घ्यायचा असता तर हिमालयातील एखाद्या गुहेत निर्विकल्प समाधीत बसून दहा-पंधरा वर्षे झाली असती. साधना करायला लागून आज मला जवळ जवळ चाळीस वर्षे झालीत. म्हाताऱ्यांना बरोबर न्यायचे असेल तर भराभर चालता येत नाही, हो ना? असो, मला एक संदेश पूर्ण करायला जायचे आहे. पुन्हा एकदा तुमच्या श्रेयोभिवृद्धीसाठी श्रीगुरूची प्रार्थना करतो व त्याकडे लक्ष देतो.

इति शिवम्
श्रीधर स्वामी

home-last-sec-img