*© श्रीधर संदेश*
*।। श्रीराम समर्थ ।।*
*कुरगुडी,*
*शुक्रवार, भाद्रपद*
*सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥*
*चि. दिनकर यांस आशीर्वाद.*
‘जाते स्थळ ते सांगेना’ अगदी ह्या वाक्याचीच येथे आठवण होईल. स्थळ कळले की ‘येरे माझ्या मागल्या’ असे होईल आणि पुन्हा तिसरीकडेच जाण्याची तयारी करावी लागेल. देव करो आणि असे न होवो . तूर्त पुढच्या सुखस्वप्नाचा उत्साह आणणाच्या आनंददायी कल्पना करीत होईल तितके विवेक विचाराने सेवेचे काम सुव्यवस्थितपणे पार पाडा.
*संघटित कार्यात शांति-समाधान लाभून कोणी एकावरच कामाचे ओझे पडत नाही.*
*योगिनः कर्म कुर्वन्ति । सङ्गं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये ।।*
*आपल्या प्रत्येक कामांतून आत्मसमाधान वाढत गेले पाहिजे.* *ऐशी कळवळयाची जाती। करी लाभाविण प्रीति ।। सर्व प्राणिमात्रांतून आत्मप्रेमाचे मंगल दर्शन कार्य करतांना पावलोपावली समाजांत व्हावयाला पाहिजे . समाजात कार्य करतांना आपली शांति समाधान इत्यादि साधनाने मिळविलेल्या सद्गुणाची कसोटी लागते. आपला अधिकार समजून येतो. शाळेत शिकल्याप्रमाणे समाजांत कार्य करतांना पुष्कळच शिक्षण मिळते. ‘स्वपरउद्धाराचे उदात्त आणि पवित्र आध्यात्मिक जीवन’ म्हणजेच परमार्थ.*
‘देवाच्या मनोगते वर्तावे’ म्हणून मी काही काळ समाजांत येत नाही. बांध फुटल्यामुळे पुढे सर्वच त-हेच्या अनुकूलतेचा पूर कां येऊ नये?
*मनी धरावे ते होते । विघ्न अवघेचि नासते। कृपा केलिया रघुनाथे । प्रचीत येते ।।*
तुमची सेवा परमेश्वर तृप्तिकर होऊन त्याच्या कृपेने तुम्ही सदैव कृतकृत्य असा !!
*- श्रीधर*