Letters

पत्र.क्र. ५१

*© श्रीधर संदेश*

*मंगळूर, २५-११-४५*

*सर्वभावान्तरस्थाय चैत्यमुक्तचिदात्मने।।*
*प्रत्यक्चैतन्यरूपाय मह्यमेव नमो नमः ॥*

*चि. सौ… व…. या सर्वांना आशीर्वाद.*

‘तुम्हासी संसार असे काही । आम्हासी तुम्हाविण नाही’ हे श्रीसमर्थांनी आपल्या एका कुटुंबवत्सल शिष्याला लिहीलेले पत्रातले वाक्य मला ओघाने आठवलें. बरेच दिवस झाले. तुमच्याकडचे पत्र मला मिळाले नाही. ‘घार फिरते आकाशी । तिचे लक्ष पिलापाशी ॥’ ‘जननि जनक माया लेकरूं काय जाणे ।’
आपला पत्ताच मला कळला नाही. शेवटी त्या भक्तवत्सल परमेश्वराच्या अचिंत्य शक्तीवरच सोपवून मला स्वस्थ बसावे लागले. नाहीं तरी कोण काय करणार? परमेश्वरासारखा सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ असा दुसरा कोण आहे ? पुढे मी एकांतस्थळी गेलो.

चि…. चे उत्तर हाती लागले. कसे काय लिहिले आहे म्हणून आशेने पहात असतांना मोठ्या रंगात येऊन चालत असतांना अकस्मात ठेचाळावे त्याप्रमाणे, ‘पण’ ह्या शब्दापासून पुढची हकीगत वाचून वाईट वाटले. दुःखात सुख म्हणतात त्याप्रमाणे त्यांतल्यात्यांत चि…..व … यादोघानांहि बरे आहे : पूर्वीसारखी प्रकृती बनण्यास थोडे दिवस लागतील हे वाचून समाधान झाले. ‘या जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे.’ हे या पत्रातले वाक्य पाहून, लौकिक जीवनाचा जो इतका कंटाळा देव आणतो तो भक्तांना अलौकिक सुख देण्याकरतांच असावा असे मनात आले. एरव्ही ‘देवासी भक्ताची चिंता ।’ ‘शरणागतासी झाला वज्रपंजरू ।।’ अशा सारख्या वाक्यांचा व दयासागर, आपत्बंधु, दीनानाथ, भक्तवत्सल अशा या शब्दांचा अर्थ लावावयाचा कसा?

जगांतल्या जीवनांत ज्या अडीअडचणी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत त्या, ‘सर्व सांडूनि शोधा मजला ।’ ‘अनित्यमसुखं लोकं इमं प्राप्य भजस्वमाम् ।’ हा भगवंताचा उपदेश अनुभवानी पटविण्याकरतांच; असें एका सत्पुरुषाच्या तोंडून मी लहानपणी ऐकिले होते. नाही तर जीवांच्या या भोगभूमीत दुःख, हालअपेष्टा कां दिसाव्यात? ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असे म्हणण्याची बारी कां यावी? ‘कोठे काहीं कोठे काहीं । एक आहे दुसरे नाही।’ अशी ही उणीवच सारखी का भासावी?

‘निःशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते चोखटे । शब्दज्ञाते कामिक ।।’ असे जरी म्हटले असले तरी परमार्थ साधण्याकरतां लौकिकहि सुव्यवस्थित चालावा म्हणून प्रपंचात असतांना वाटणे काही मार्गाला सोडून नाही.

*‘भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्र पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥ स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥* अशी वैदिक प्रार्थना आहे. कानानी समाधानकारक कर्णामृताचे प्रगतीपर बोल ऐकावे, निरतिशय सुखाने तृप्त अशा सर्वतोपरी अंतर्बाह्य समाधानकारक परिस्थितीने नांदणारी जनता डोळे भरून पहावी, सदृढ अवयवानी व आल्हादकारकर शरीरानी उपासनेने उत्तीर्ण होण्याकरिता आम्ही आपले संपूर्ण जीवन सुखाने घालवावे, असा ह्या प्रार्थनेचा भावार्थ आहे. ‘मनी धरावे ते होते । विघ्न अवघेचि नासूनि जातें । कृपा केलिया रघुनाथें । प्रचीत येते ॥’

चि…..ला व….ला अगदी संन्यास घ्यावा वाटतो, असे लिहिलेले आढळले. ‘परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाही तो भिकारी । अरे त्या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥’ । देवपण आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण । हाचि अर्थ पहाता पूर्ण । समाधान धाणे ॥’ ‘बहु जन्माचे शेवटीं । देवा भक्तासी होय भेटी ।।’ संन्यास या शब्दावरून आठवण झाली,
‘यदा मानसि सजातं वैतृष्ण्यं सर्ववस्तुषु । तदैव संन्यसेद्विद्वान् पतित: स्याद्विपर्यये ।। ‘जागतिक सुखसोयीना कंटाळून, इंद्रियसुखाचा का एकदा मनापासून वीट आला म्हणजे विद्वानाने संन्यास घ्यावा. चुकून भोगासक्ती उरली असली तर तो पतित होतोः असे ह्या श्लोकांत सांगितले आहे. संन्याशाच्या भूमिकेच्या माणसाची धारणा कशी असते हे या पुढील श्लोकावरून कळून येईल,
‘अहमेवाक्षरं ब्रह्म वासुदेवाख्यमद्वयम् । इति भावो ध्रुवो यस्य स कैवल्याश्रमे वसेत् ।। ‘ सर्व भूतांच्या ठिकाणी असणारे नित्य (अविनाशी) असें जे वासुदेवाय एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्त्व तें मीच असें ज्याला आपल्याविषयी निश्चितपणे वाटते त्याने तुर्याश्रमी बनावे म्हणजे संन्यास घ्यावा; असें ह्या श्लोकाचे तात्पर्य आहे. असो,

*’शरणागतांची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसे बाळक वाढवी माता । नाना यत्ने करूनि ।।’*

*सर्वारिष्टशान्तिरस्तु॥*

*- श्रीधर*

home-last-sec-img