*© श्रीधर संदेश*
*माघ १८९२*
*जानेवारी १९४४*
*मंगळूर (बंदर)*
*ॐ*
*चि. दिनकर यांस आशीर्वाद.*
उपरी आम्ही चौघे सुरक्षित आहो. येथल्या मंडळींना दर्शन अजुन दिले नाही, अज्ञातवासच आहे. विठ्ठल, व्यंकटराव, भागवत हे आहेत. चिकमंगळूरच्या श्री मछिंदरानी येथल्या मंजनाथ नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली. देऊळ खाली आहे आम्ही राहतो तें स्थळ उंचावर आहे. देवळाला जावयाचे झाल्यास सुमारे ५५ पायऱ्या उतरून जावे लागते. देवळाकडे जाताना उजव्या बाजूस पहिल्या प्रथम गणेशतीर्थ लागते. वर गणेशाची मूर्ति आहे. पाणी कोठून येते तें कांही दिसत नाही. त्या मूर्तीच्या जागेपासून साधारण ३-४ फूट खाली गायमुखांतून पाणी पडते. १/२ इंच रुंद ची धार साधारणपणे असेल, खाली कुंडात बसून अथवा बरेंच वाकून अंगावर धार घेता येते. ३-४ पावले पुढे गेले असता ९ कुंडे आहेत. आठ कुंडे साधारण ९-१० फूट (चौरस) भरतील, या आठ कुंडाच्या पलीकडे या सर्व कुंडाच्या लांबीबरोबर लांबच लांब ९ कुंड आहे. स्नानाला पुष्कळच मंडळी रोज येतात. साधारण ३-४ वाजल्यापासूनच मंडळी स्नानाला येऊ लागतात. या पाण्याने बरेच रोग बरे होतात म्हणून येथल्या मंडळींचा विश्वास आहे. ही नऊ कुंडे म्हणजे नवनाथांच्या धुन्या आहेत. इथे नवनाथ एका काळी एकत्र जमले होते त्यांच्या त्या संमेलनाचे निदर्शक म्हणून त्या नऊ जणांनी मिळून काशीहून लिंग आणवून येथे स्थापन करावे, असे ठरविले. काशीहून योग्य ठराविक मुहूर्ताला लिंग काही आले नाही. सारे हे असे चिंताग्रस्त बसले असता एकदम पाण्यातून एक लिंग प्रगटलें. तेंच हे मंजनाथेश्वराचे लिंग. देऊळ बरेच मोठे आहे. आंत जाऊन अभिषेक असा कोणालाहि करता येत नाही, बाहेरूनच दर्शन. एकंदरीत नवसिध्दांचे हे ठिकाण. आम्ही असलेल्या ठिकाणावरून समुद्र दिसतो. ३-४ मैल अंतरावर तरी समुद्र असेल. असलेल्या ठिकाणावरून साधारण ५०-६० पायऱ्यांवर चढून गेलो की बराच सपाट प्रदेश आहे. बरीच मंडळी येथे फिरावयास येतात. येथून संबंध मंगलूर गांव बहुतेक नारळीच्या व इतरहि झाडींनी आच्छादलेले दिसते. बाकी सर्व क्षेम.
*-श्रीधर*