Letters

पत्र.क्र. ५६

*© श्रीधर संदेश*

*साधकांसाठी उपदेश*

साधकाने *’अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा।’ ‘एकांत मानला ज्याला । सर्वा आधी कळे त्याला ।’ ‘एकांताविण प्राणियासी । बुद्धी कैंची ।।’* अशी एकांताची महति श्रीसमर्थांनी पुष्कळ गायिली आहे. *’एकांते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् ।’* ‘आवडीने एकांतात राहून परमानंदरूप स्वरूपाच्या ठिकाणी सदैव मुरून असावे. कसल्याहि वृत्तीचा स्पंद होऊ देऊ नये’ असे श्रीशंकराचार्यांनी सांगितले आहे.

*’जन कृपा नेत्ष्ठुर्यमुत्सृज्यताम् ।’* साधकाला आपण सर्वांशी चांगले असावे; चांगुलपणा मिळवावा, सर्वांच्या आवडीतले आपण असावे अशी एक भावना उत्पन्न होऊन मर्जी संपादण्याकरिता त्याच्याकडे जा, याच्याकडे जा, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, असे तो करीत सुटतो. जनाच्याकरिता म्हणून साधकाने काही करू नये. जनकृपाहि संपादण्याची हाव धरूं नये तसेच कोणाशी कधी दुर्वचनाने निष्ठुरहि होऊ नये, कामापुरते सर्वाशी अगदी थोडे पण गोड बोलावे. काम नसता सर्वांशी गोड असावे, म्हणून इकडे तिकडे नुसते हिंडत राहू नये. कोणाशीहि अधिक प्रीति वाढवायला जाऊ नये. कोणाचाहि पक्ष घेऊन कोणाचाहि द्वेष करू नये. द्वेष व प्रेम कोणाहि ठिकाणी ठेऊ नये. कोणाशीहि अतिपरिचय ठेऊ नये. त्यांच्या गुणापेक्षाहि त्याचे दोषच अधिक जडतात. साधनाशिवाय इतर कोणते बोलू नये; विचारू नये. विचार एकच एक आत्मरुपाचा असावा. साधनाशिवाय साधकाने एक क्षणहि घालवू नये, गेलेला क्षण वाटेल ते केले तरी परत माघारी मिळवता येत नाही. आयुष्याचा एक क्षणहि फुकट वायफळ गोष्टीत घालवू नये. कोणाकडे जाऊन बसले म्हणजे गप्पा, त्याच्या याच्या उखाळया पाखाळया, तर काही काही गुरूंची निंदाहि करणारे महापुरुष असतात. त्यांचे ते अनिष्ट शब्द कानावर पडून उगीच कोणाविषयीतरी द्वेष, उगीच श्रीगुरुविषयी शंका उत्पन्न होऊन साधकाची उज्वल भूमिका मलीन होऊ लागते. मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास कमीकमी होऊ लागतो.

*’आपणासारखे करिती तत्काळ।’* अत्यंत खालच्या थरातील माणसापासून ते ब्रह्मरूप सद्गुरुपर्यन्तच्या सर्व भूमिकेच्या मंडळीत हे सामर्थ्य असते म्हणून पूर्णत्वाला पोहोचलेल्या विभूतिशिवाय साधकाशीही अतिलगट करू नये. चार चौघे साधक आत्मविचार करीत कोठे बसत असले तर पाहिजे तर श्रवणाला जाऊन बसावे. त्यातूनहि ध्येयाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त एकाग्र होते त्याने चित्त ध्येयाच्या ठिकाणी विलिन करून निर्विकल्पाचा अभ्यासच अधिकाधिक वाढवावा. अशाला श्रवणाचीहि आवश्यकता नाही. आपण आपला अभ्यास आणि आपले राहते ठिकाण याशिवाय अत्यंत जरूरीच्या कामाशिवाय इतरत्र कोठेहि जाऊ नये. पाहिजे वाटल्यास ज्ञानप्रधान ग्रंथ थोडावेळ वाचावेत त्यातूनहि आपल्या अभ्यासाला अनुकूल असेल तोच विषय निवडून वाचावा कशाचेहि चिंतन न करिता, कसली हि गोष्ट न आठविता, कोणतीहि व्यक्ति अंतश्चक्षूपुढे उभी राहू न देता, कशाचीहि आठवण न होऊ देता, व्यक्तिशून्य, निर्विकल्प रहाण्याचा अभ्यास एकांतात राहून अहर्निश करावा. शंका, कुशंका, आशंका या वाउग्या कल्पना आहेत. आपले केवळ असे ज्ञानमात्र, स्वतःसिद्ध, आनंदरूप सदाच निविकल्प, स्वयंप्रकाश निवृत्तिक आहे म्हणून कसलीच वृत्ति उठू न देता ती आपल्यात मुरवून सदैव अद्वितीय, निष्प्रपंच, निर्विकल्प, स्वयंप्रकाश एक आनंदरूप होऊन समाधीत असावे.

साधकाला ‘निरशन करू नये’ म्हणून सांगितले आहे. निरशन आणि अधिक कायाक्लेश योगाभ्यासी साधकाला वर्ज्य आहेत. निरशन म्हणजे काही न खाता रहाणे. कायाक्लेश म्हणजे शारीरिक फार श्रम. या दोन्हीमुळे उष्णता अधिक वाढते. भूक मारू नये.

ध्यानात देहाचे विस्मरण होऊन झोपेप्रमाणे विश्रांति मिळू लागली तर आरोग्याला तेव्हा झोपेची आवश्यकता राहात नाही. अशी स्थिती जोपर्यन्त साधली नसते तो पर्यन्त तरूण साधकाला ४ ते ५ तास विश्रांति पाहिजेच, जागरणाने उष्णता वाढून डोक्यावर म्हणजे मेन्दूवर परिणाम होतो. १० ला झोपून २।। ते ३ ला उठावे. मनोलय सर्वात श्रेष्ठ साधन आहे. जप कमी झाला तरी हरकत नाही.

विटाळ करून घेऊन स्नान करण्यापेक्षा विटाळच होणार नाही ही दक्षता घेणे हा बालसंन्यासमार्ग होय. आपली चूक ओळखणाराच मुमुक्षु तर दुसऱ्याचे दोष पाहून आपले दोष छपविण्याचे निरनिराळे प्रयत्न करणाराच बद्ध.

सद्गुरु उपासना ही निर्गुण, निराकार, निर्विकल्परूपानेच करावयाची असते. मी पणाच्या स्फूर्तीपासून दूर, ज्ञानरूपी स्वस्वरूपात वृत्तीचा लय करणे हेच गुरुंचे ध्यान होय. ह्यालाच ‘ब्रम्हैक्य’ म्हणतात. हीच स्वरूपस्थिती व अशा स्थितीत राहाणे हीच गुरुची अखंड सेवा होय.

*श्रीधरस्वामी*

home-last-sec-img