Letters

पत्र.क्र. ५७

*© श्रीधर संदेश*

*आश्विन १८९४*
*॥ ॐ श्रीराम ।।*
*चैत्र व ॥ १३ शके १८७३*

*चि. दिनकर यांस आशीर्वाद*

पुष्कळ दिवस झाले, तुमच्याकडील खुशाली कळली नाही. श्रीसमर्थकृपेने तुम्ही सर्व गुरुभक्त क्षेम आहात असा मला भरवसा वाटतो. काही कसली अडचण असल्यास कळव. सर्वांच्या क्षेमाविषयी सविस्तर पाकीट घाल. *’उपाधीस विस्तारावे । परी उपाधीत न सापडावे।* क्षणोक्षणी होणाऱ्या वाढत्या उपाधीच्या कष्टाने मन भंडावून जाऊ नये. चढती वाढती अध्यात्मिक उन्नति खंडू नये. प्रत्येक पायरीप्रमाणे जीवनाचा प्रत्येक क्षण उन्नति -कारक व्हावा. दिवसेंदिवस दैवी संपत्तीचे तेज वाढत जावे. उपासनेच्या प्रेमाने उपासनेची कामे होत असतांनाहि मन आत्मरंगात गढून असावे. प्रत्येकाचे जीवन हे स्वपरहिताकरिता आहे ही खूणगाठ प्रत्येकाने आपल्या पदराशी बांधून ठेवावी. मनाच्या ठिकाणी कोणच्याहि प्रकारची संकुचित भावना असू नये. चि.XXX ची आठवण, तो नवीन म्हणून पुनः पुनः होते. त्याचे आरोग्य आता उत्तम असेल. सर्वच तुम्ही उत्कृष्ट परोपकाराची कामे तेजस्वितेने अध्यात्मिक उन्नतीच्या अतिविशाल अशा शेवटच्या परम शांत भूमिकेत श्रीसमर्थसांप्रदायाला अलंकारप्राय असे रामदासी व्हा.

तुर्त मी इथेच आहे. चातुर्मास्याला अजून दीड महिना जास्ती कमी आहे. पुढचे पुढे. ‘ ईश्वरेच्छा बलीयसी !’ योग कुठला असेल तो बघावा.

*’सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’*

*श्रीधर*

home-last-sec-img